– चैतन्य प्रेम
भवसागर पार केलेल्या साधकाला ज्ञान होईल, असा श्रीजनार्दन स्वामींचा एकनाथ महाराजांना आशीर्वाद आहे. हे ‘ज्ञान’ कोणतं आहे हो? तर ते सद्गुरू तत्त्वाचं शुद्ध ज्ञान आहे. जो खरा सद्गुरू असतो तो भक्ताला खरी जीवनदृष्टी देतो. त्याला शुद्ध आचरणाचा पाठ देतो. भौतिकात न अडकता, भौतिकातली कर्तव्यं पार पाडून अंत:करण परम तत्त्वाशी समरस करण्याची कला शिकवतो. नश्वरातल्या ईश्वरी तत्त्वाचं अवधान जागृत करतो. थोडक्यात तो परम तत्त्वापासून कधीही विभक्त न होणारा भक्त घडवतो. आता गेल्या भागाच्या अखेरीस म्हटलं आहे की, भक्ताला सद्गुरू अखंड अभेद दृष्टी देतात. तर त्याची सुरुवातही मोठी व्यापक असते. मुळात कुठे भेद नाहीच. कारण सर्व एकाच शक्तीचं प्रकटन आहे. पण जन्मापासून द्वैतातच वावरलेल्या साधकाच्या मनातलं द्वैत परमार्थाच्या मार्गावर येऊनही प्रथम सुटत नाही. पण सद्गुरू त्याच्या मनातील धारणेला धक्का न लावता ती व्यापक करीत असतात. भगवंत उद्धवाला सांगतात, ‘‘उद्धवा जे मूर्ति ज्या पढियंती। तेचि त्यासी पूज्य मूर्ति। तुवांही अणुमात्र चित्तीं। संदेह ये अर्थी न धरावा।।३६४।। विष्णु विरिचि सविता जाण। शिव शक्ति कां गजवदन। या मूर्तीमाजीं मी आपण। सर्वी समान सर्वात्मा।।३६५।।’’ (‘एकनाथी भागवत’, अध्याय २७). म्हणजे, हे उद्धवा, ज्याला जी मूर्ती प्रिय असते, तीच त्याला पूज्य असते, याबाबत अणुमात्रही, कणमात्रही शंका मनात धरू नकोस. प्रत्यक्षात विष्णु, ब्रह्मदेव, सूर्य, शिव, शक्ती, गजानन आदी सर्वच मूर्तीमध्ये, रूपांमध्ये मी समान आहे, सर्वात्मा आहे. त्यामुळे, ‘‘सर्व प्रतिमांचें पूजन। करितां मज पूजा समान। भक्तांची जेथ प्रीति गहन। तियेअधीन मी परमात्मा।।३६६।।’’ कोणत्याही मूर्तीचं, प्रतिमेचं, रूपाचं पूजन केलं तरी ते माझ्याच पूजेसारखं होतं. भक्तांची जिथे दृढ, गहन प्रीती असते त्याआधीन मी होतो. मग एकनाथ महाराज मोठं बहारीचं रूपक योजतात. ते कृष्णाचा भाव व्यक्त करीत म्हणतात, ‘‘जेवीं बाळकाचेनि मेळें। माता तदनुकूल खेळे। तेवीं भक्तप्रेमाचिये लीळें। म्यां चित्कल्लोळें क्रीडिजे।।३६७।।’’ म्हणजे, माता जशी बालकाच्या कलानं खेळ खेळत असते तसा मी भक्तप्रेमानं लीला करतो आणि त्यांच्या चित्तातील कल्लोळांनुरूप क्रीडा करीत असतो! या प्रक्रियेची सुरुवात किती सूक्ष्म आहे पाहा. सर्वसामान्य माणूस भौतिकात रुतून जगओढीनं जगत असतो. पण कधीतरी एखाद्या क्षणापुरती का होईना, त्याच्या अंत:करणात शुद्ध सद्विचाराची वीज चमकून जाते. आपल्या जीवनाचा अर्थ काय, या प्रश्नाची लाट मनोसागरात उसळून विराम पावते. या सूक्ष्म शुद्ध क्षणिक तळमळीतून निर्माण झालेल्या कळकळीच्या प्रश्नाला तो परमात्मा- प्रार्थनेचं रूप देतो! एखाद्या संवेदनशील मुद्दय़ाला वाचा फोडणाऱ्या तक्रारीला न्यायालय जसं कधी याचिकेचा दर्जा देतं ना, तसं! मग या प्रार्थनेला दाद देत तो सामान्य माणसाच्या जीवनात सद्भावनेचं बीज पेरतो.
chaitanyprem@gmail.com