– चैतन्य प्रेम
खऱ्या सद्गुरूंशी खऱ्या भक्ताचं ऐक्य कसं असतं? ‘श्रीभावार्थ रामायण’ हा संत एकनाथ महाराज यांचा आणखी एक सुविख्यात ग्रंथ आहे. यात मारुतीराया सीतामाईंचा शोध घ्यायला जाणार असतानाचा प्रसंग आहे. त्या वेळी मारुतीराया प्रभू श्रीरामांना विचारतात की, ‘‘हे स्वामी! आम्ही सीतामाईंना ओळखावं कसं? त्यांचं वर्णन करा, त्यांची लक्षणं सांगा!’’ त्यावर प्रभू जे उत्तर देतात त्यात या ऐक्यभावाचं परमोच्च दर्शन घडतं. प्रभू सांगतात, ‘‘श्रीराम गोडी सीता साकर। श्रीराम रस सीता नीर। श्रीराम घृत सीता क्षीर। चिदचिन्मात्र श्रीरामसीता।।’’ (किष्किंधा काण्ड, अध्याय १३). म्हणजे- मी गोडी तर सीता साखर आहे, मी रस तर सीता जल आहे, मी घृत म्हणजे तूप, तर सीता क्षीर म्हणजे दूध आहे. म्हणजे दुधाचं सारतत्त्व तूप आहे. साखर व गोडी अभिन्न आहे. रस व जल एकत्र होताच अभिन्न होतात, त्याचप्रमाणे खरा सद्गुरू व खरा भक्त एक होताच अभिन्नच होतात. आता इथं ‘साखर आणि गोडी’ हे जे रूपक आहे त्याचं सद्गुरू व भक्तामध्ये वेगळंच साम्य आहे. साखरेत संपूर्णपणे गोडी भरून असते त्याप्रमाणे सद्गुरूंच्या हृदयातलं प्रेम, वात्सल्य, करुणा, परहिताची कळकळ खऱ्या भक्ताच्या वर्तणुकीतही भरून असते. चैतन्य महाप्रभू यांचे शिष्य होते निताई. त्यांना नामप्रेमाचा प्रसार करण्याची गुरुआज्ञा होती. बंगालातील नवद्वीप या भागात तेव्हा जगाई आणि मधाई या दोन भावांनी सज्जनांना जगणं नकोसं करून सोडलं होतं. बरेचदा हे दोघं मद्याच्या नशेत असत, पण त्या अवस्थेतही पापभीरू माणसं त्यांच्या नजरेतून सुटत नसत. त्यांना त्रास देण्यात या दोघा भावांना आसुरी आनंद मिळत असे. एके रात्री हे दोघे नशेत धुत्त असताना निताई भक्तिप्रेमाच्या आनंदात नामसंकीर्तन करीत रस्त्यानं निघाले होते. दोघा भावांनी त्यांना अडवलं. नामघोष जोरात करीत असल्याबद्दल निताईंना ते वाईट भाषेत बोलू लागले. तसं निताई त्यांना भगवंताच्या नामाचं प्रेम कसं असतं आणि ते प्राप्त करण्यात जीवनातला खरा आनंद कसा आहे, हे समजावू लागले. त्यावर अधिकच संतापून त्यांनी एक मातीचा घडा निताईंच्या डोक्यात फोडला. निताईंच्या कपाळातून रक्ताची धार वाहू लागताच निताईंचे भावसर्वस्व असे चैतन्य महाप्रभू तिथं प्रकटले आणि अत्यंत कोपानं त्या भावांकडे पाहू लागले. तत्काळ महाप्रभूंनी उजव्या हाताची तर्जनी उंचावताच आकाशातून सुदर्शन चक्र खाली वेगानं येऊ लागलं. जगाई-मधाईंची नशेची धुंदी खाडकन उतरली. सुदर्शन चक्रानं आपला शिरच्छेद होणार, हे जाणवताच ते गयावया करू लागले. तोच निताई प्रभूंच्या चरणांना मिठी मारत म्हणाले, ‘‘भगवान! या दोघांवर कृपा करा. ते त्यांच्या वृत्तीनुसारच वागले. यात जर कुणाचा दोष असेलच, तर तो माझा आहे. भगवंताचं नाम रसमय असूनही त्याची गोडी मी लावू शकत नसेन, तर मीच आज्ञापालनात कसूर केली असली पाहिजे. तेव्हा शिक्षा द्यायची तर मलाच द्या.’’ सद्गुरूचा करुणाभाव अनन्य शिष्यातही कसा उतरतो, याचा हा दाखला आहे. तेव्हा ऐक्य होणं म्हणजे विचार, भावना, आवड, प्रेरणा, कल्पना, धारणा एक होणं! ऐक्य म्हणजे एक होणं. अनन्य म्हणजे अन्य कुणीच नाही, असं होणं. अशाला परम भक्ती लाभते, असं नमूद करताना भगवंत म्हणतात, ‘‘अनिवार अनन्यगती। सर्वस्वें ज्यासी माझी प्रीती। तो लाहे माझी परमभक्ती। जेथोनि कल्पांतीं च्यवेना।।’’ (‘एकनाथी भागवत’, अध्याय १८). अनिवार अनन्यतेनं ज्याची माझ्यावर प्रीती जडते त्याला माझी अशी परमभक्ती लाभते, ज्या स्थितीपासून तो कल्पांतीही ढळत नाही.