– चैतन्य प्रेम
सद्गुरूशी ऐक्य म्हणजे विचार, भावना, धारणा, कल्पना आणि कृतीतही एकरूपता व समानता. जणू बिंब-प्रतिबिंब! आता, या ऐक्याची गरज काय हो? सद्गुरूचा विचार आणि माझा विचार यांत ऐक्य का व्हावं? कारण माझा विचार हा देहभावाला धरून असल्यानं तो अविचारातही परावर्तित होत असतो. जी गत विचारांची तीच भावना, धारणा, कल्पनेची. देह आसक्तीमुळे माझी भावना कुभावनेत, धारणा कुधारणेत आणि कल्पना कुकल्पनेत पालटू शकते. आता विचार, कल्पना, धारणा, वासना, भावना या अतिशय सूक्ष्म गोष्टी आहेत आणि त्यांची कृती स्थूल- म्हणजे डोळ्यांना दिसणारी, इंद्रियांना अनुभवता येणारी आहे. असं असलं, तरी प्रत्येक कृतीचं मूळ हे सूक्ष्मातच असतं. सूक्ष्म विचार, भावना, कल्पना, धारणा, वासना यांतच असतं. त्यामुळे सूक्ष्म विचारादी हे देह आसक्तीत जखडलेले असतात तेव्हा कृतीही विपरीत होत असते. मग आपण बोलू नये ते बोलून जातो, वागू नये ते वागून जातो. त्यातही गंमत अशी की, आपल्याला बोलू नये ते बोलण्याची आणि वागू नये ते वागण्याचीच उबळ असते. पण स्वार्थाला धक्का पोहोचेल, या भीतीनं आपण ती दडपतो. कधी कधी मात्र तसं बोलून वा वागून झाल्यावर स्वार्थपूर्ती धोक्यात येण्याच्या भीतीमुळेच आपल्याला तसं वागलं-बोललं गेल्याची खंत वाटू लागते. थोडक्यात, विचारांपासून कृतीपर्यंत आपल्यात एकवाक्यता कुठेच नाही. त्यामुळे विचार आणि आचारशुद्धीसाठी सद्गुरूबोधाचीच कास धरली पाहिजे. संत एकनाथ महाराज सांगतात, ‘‘निजस्वार्थालागीं सावधान। गुरूवचनाचें अनुसंधान। अविश्रम करितां मंथन। ब्रह्मज्ञान तैं प्रकटे।।३४४।।’’ (‘एकनाथी भागवत’, अध्याय दहावा). निजस्वार्थ म्हणजे खरा स्वार्थ. ‘स्व’चा खरा अर्थ जाणून नि:शंक, निर्भय होणं हाच खरा स्वार्थ आहे. जो स्वरूपस्थ आहे अशा सद्गुरूच्या आधारावरच खरा स्वार्थ, खरं आत्महित उमजू शकतं. त्यासाठी सद्गुरूसंगामध्ये सावधान झालं पाहिजे. स+अवधान.. म्हणजे अवधानपूर्वक तो बोध ग्रहण केला पाहिजे. मग त्या बोधाचं अनुसंधान साधलं पाहिजे. अनुसंधान म्हणजे सदोदित त्या बोधाचं स्मरण राहून व्यवहारात वावरत असताना त्या बोधानुरूप आचरणाचा अभ्यासही झाला पाहिजे. त्या बोधाचं ‘अविश्राम मंथन’ झालं पाहिजे. म्हणजे त्या बोधाचं मनात सतत मंथन होत राहिलं पाहिजे. मंथन म्हणजे अनेक बाजूंनी विचार करीत करीत त्यातलं सारतत्त्व निवडलं पाहिजे. अशा प्रक्रियेनं मग ‘ब्रह्मज्ञान’ प्रकट होईल. ब्रह्मज्ञान म्हणजे असीम असं सद्गुरू तत्त्वाचं ज्ञान. सद्गुरूंचा खरा सत्संग लाभला आणि तो अंत:करणात ठसला की जाणवतं, ‘‘बंधमुक्तीचा वळसा। तेचि अज्ञानाची दशा।’’ (एकनाथ महाराज कृत ‘आनंद लहरी’). याचा अर्थ स्वबळावर बंधनातून सुटून मुक्ती प्राप्त करून घेण्याचे सर्व प्रयत्न म्हणजे मोठा वळसा आहे, अज्ञानाचीच दशा आहे.
chaitanyprem@gmail.com