– चैतन्य प्रेम

मनाचा निश्चय जोवर होत नाही, तोवर कोणतीही गोष्ट निर्धारानं केली जात नाही, हा आपला व्यवहारातलाही अनुभव आहे. अध्यात्मातही तोच लागू आहे. परमार्थ साधायचा, हा मनाचा निश्चय झाला तरच माणूस खऱ्या परमार्थाकडे वळतो. भौतिक जीवन विनाअडथळा जगता यावं, या इच्छेनं अनेक जण देवाचं काही तरी करतात. डॉ. श्रीकृष्ण देशमुख यांनी यावर एक मार्मिक प्रश्न विचारला आहे. तो असा की, ‘‘आपण देवाचं काही करतो, हे खरं की देवच आपलं काय ते करतो, हे खरं?’’ तर, खरंच आपलंच काही करण्याचं सामर्थ्य जिथं आपल्यात नाही, तिथं आपण देवासाठी काय करणार हो! पण देवानं आपल्या भौतिकातील इच्छांचं रक्षण करावं, यासाठी आपण देवाचं म्हणून काही पूजापाठ, पारायणं, उपासतापास, व्रतवैकल्यं आदी गोष्टी करतो. हे सगळं प्रत्यक्षात देवाचं नसून भौतिकाचंच असतं. तेव्हा जर परमार्थ करायचाच असेल, तर त्यामागचा हेतू शुद्ध हवा. एकनाथ महाराजही सांगतात की, ‘‘मुख्य साधावया परमार्था। अवश्य पाहिजे गा शुचिता।।’’ (‘एकनाथी भागवत’, अध्याय तिसरा, ओवी ३८०). परमार्थ साधायचा असेल, तर शुचिता म्हणजे शुद्धपणा, पावित्र्य हवंच. ही शुचिता म्हणजे काय? तर ‘मी’पणात आसक्त होऊन साधना होता कामा नये. ‘मी’च्या जोपासनेसाठी परमार्थ नाही. भौतिकातील प्रगतीसाठी परमार्थ नाही. त्यासाठी स्वत:च कष्ट आणि प्रयत्न केले पाहिजेत. त्यामुळे परमार्थ करताना भौतिकातील बदलांकडे लक्ष नको. समजा, घरात खूप अडचणी आहेत आणि अशात आपण शाळेत प्रवेश घेतलाय, तर या अडचणी आणि आपलं शिक्षण यांचा या घडीला काही संबंध जोडतो का आपण? मी एवढं शिकतोय, तरी घरातल्या अडचणी का संपत नाहीत, असा प्रश्न तरी मनात येतो का? मग तो परमार्थाच्या बाबतीतच का यावा? एक निश्चित की, शिक्षण सुरू असताना परिस्थिती बदलण्यासाठी त्याचा उपयोग नसला, तरी शिक्षण पूर्ण झाल्यावर चांगली नोकरी वा व्यवसाय सुरू होतो आणि मग परिस्थिती बदलते. तसं साधना खोलवर रुजू लागली तर परिस्थिती नेमकी कशी बदलावी, त्यासाठी आवश्यक प्रयत्न कोणते, हे उमगू लागेल. त्याहून मोठी गोष्ट म्हणजे, परिस्थितीचा स्वीकार करण्याची शक्ती लाभेल आणि सकारात्मक वृत्तीनं जगणं शक्य होईल. हे मनानं मनाची गुढी उभारणं आहे. मन उन्नत, उदात्त करायचं आहे आणि ते कोणत्याही परिस्थितीत शक्य आहे! उलट अनेकदा अनुकूल परिस्थितीत जगणारा माणूस अत्यंत संकुचित असू शकतो, तर अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत जगणारा माणूस मनानं विशाल असू शकतो. तेव्हा परिस्थिती कशीही असो, मनानं मनाची गुढी उभारायची आहे. म्हणजेच विचार, कल्पना, भावना, धारणा उदात्त करायच्या आहेत. हे कधी शक्य आहे? तर, ‘‘पावोनि गुरूकृपेची गोडी’’! गुरूकृपेचं जीवनातलं अस्तित्व आणि मोल उमजलं, तर गुरूबोधानुसार जीवन जगण्याचा अभ्यास करता येईल. श्रीनिसर्गदत्त महाराज म्हणत की, ‘‘तुम्ही विश्वासानं पहिलं पाऊल टाका, उरलेली पावलं तुम्ही अनुभवानं टाकाल!’’ तसं आहे हे. बोध आचरणात आणण्याचा कृतीयुक्त प्रयत्न केला, तर अनुभव येईल. अनुभव आला की दुसरं पाऊल टाकावंसं वाटेल. मग त्या वाटचालीत गोडी वाटू लागेल. तर, ‘‘मन मनासी होय प्रसन्न। तेव्हां वृत्ति होय निरभिमान।।१।। पावोनि गुरूकृपेची गोडी। मना मन उभवी गुढी।।२।।’’ इथवर साधलं की नाथ म्हणतात, ‘‘साधकें संपूर्ण। मन आवरावे जाण।।३।। एका जनार्दनीं शरण। मनें होय समाधान।।४।।’’

Loksatta chaturang article Free of mobile mind result Counselor
सांदीत सापडलेले…! अवधान
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Loksatta chaturang article English playwright Christopher Marlowe Dr Faust plays journey of life
मनातलं कागदावर : स्वर्ग की नरक?
chaturang loksatta
जिंकावे नि जगावेही : शब्द शब्द जपून ठेव…
Marathi Rangbhoomi Divas , Marathi Theatre Day, 5th November
विश्लेषण : रंगभूमी दिन ५ नोव्हेंबरला का असतो? यंदा अद्याप साजरा का झाला नाही?
inconvenient to carry dead bodies due to no road at Alibagh Khawsa Wadi
रस्ता नसल्याने मृतदेह झोळी करून वाडीवर नेण्याची वेळ…
Book Self discovery in space Science
बुकरायण: अंतराळातला आत्मशोध