– चैतन्य प्रेम

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मनाची गुढी उभारायची असेल, तर साधकानं मन संपूर्णपणे आवरलं पाहिजे, असं संत एकनाथ महाराज म्हणतात. आता मन आवरायचं म्हणजे काय करायचं? तर मुळात आपलं मन कसं, कुठे, किती आणि का विखुरलं आहे, ते जाणून घ्यायचं. मन कुठे विखुरलं आहे? तर जगात विखुरलं आहे. का विखुरलं आहे? तर ‘मी’ आणि ‘माझे’च्या भ्रामक धारणेतून त्या ‘मी’च्या सुखाचा आधार जग आहे, या कल्पनेनं ते जगात विखुरलं आहे. किती विखुरलं आहे? तर जी जी व्यक्ती, जे जे स्थान माझ्या देहबुद्धीप्रेरित स्वार्थाला पोषक भासतं, त्या त्या व्यक्ती, वस्तू, स्थान आणि परिस्थितीत मन विखुरलं आहे. ही प्रक्रिया अखंड सुरूच आहे. पण जसा ‘मी’ स्वार्थकेंद्रित आहे आणि स्वार्थप्रधान आहे, तसाच जगातला प्रत्येक जण आहे. त्यामुळे हे जग मला खरं अक्षय सुख, अखंड समाधान देऊ शकत नाही. मग हे समाधान कुठे मिळेल? तर, ‘‘एका जनार्दनीं शरण, मनें होय समाधान,’’ असा उपाय एकनाथ महाराज सांगतात! याचाच अर्थ, जगात विखुरलेलं मन एका परमतत्त्वापाशी, परमात्म्यापाशी केंद्रित करायचं आहे. या परमतत्त्वाचं मनुष्यदेहात प्रकट झालेलं रूप म्हणजे खरा सद्गुरूच आहे! एका वाचकानं विचारलं की, ‘‘तुम्ही वारंवार ‘खरा सद्गुरू’ असा उल्लेख का करता? सद्गुरू खराच असतो ना?’’ तर होय हो! सद्गुरू खराच असतो, पण अध्यात्माचा बाजार झाल्यापासून स्वयंघोषित गुरूही अनेक झाले आहेत आणि पुढेही होतील. त्यापासून सावध करण्यासाठी ‘खरा सद्गुरू’ असं म्हणावं लागतं. तर खऱ्या सद्गुरूंना शरण गेलं पाहिजे. आता ‘शरण’ हा शब्द काहींना खटकतो, अपश्रद्धेला बळ देणारा वाटतो (अंधत्वाला हीन मानणारा ‘अंधश्रद्धा’ हा शब्दच मला गैर वाटतो, त्यामुळे दुसऱ्याला हानिकारक ठरेल अशा धारणेला अपश्रद्धा हा शब्दच योग्य आहे). पण प्रत्यक्षात आपण भौतिकाला ‘शरण’ असतोच ना? ज्यांच्या आधारावर आपला स्वार्थ साधला जातो, त्यांच्या कलानं वागणारी लाचारी पत्करतोच ना? मग ज्याला माझ्या खऱ्या हिताशिवाय अन्य कोणतीही इच्छा नाही, जो सदैव परमात्मामय आहे, मला भावनिकदृष्टय़ा खच्ची करील अशा भ्रम-मोह आणि आसक्तीच्या गुंत्यातून सुटण्याचा बोध जो सांगत आहे, त्या कृतीसाठी बळ देत आहे अशा खऱ्या सद्गुरूला शरण जाण्यात गैर काय? ते शरण जाणं म्हणजे भ्रामक मोहासक्तीतून उद्भवलेला आंतरिक रणसंग्राम शांत करणं आहे. नव्या जीवनदृष्टीनं जीवन घडवणं आहे. मनानं स्वतंत्र होऊन शुद्ध कर्तव्यपालन पार पाडणं आहे. आपलं आणि इतरांचं जीवन आनंदी करणं आहे. तेव्हा सद्गुरूला शरण जावं. तो प्राप्त झाला नसेल, तर ‘एकनाथी भागवत’सारख्या सद्ग्रंथाला शरण जावं! त्या ग्रंथाचं वाचन साधकाच्याच दृष्टीनं सतत करावं, म्हणजे ते ग्रंथही बोलू लागतात, शिकवू लागतात. ‘ज्ञानेश्वरी’ वाचताना दुसऱ्या अध्यायात ओवी आली. निराश झालेल्या अर्जुनाला कृष्ण विचारतो, ‘‘तूं कवण हें कायी। करीत आहासी।।’’ म्हणजे, ‘‘अरे, तू कोण आहेस आणि काय करतो आहेस?’’ हा प्रश्न माझ्याच मनात रुतला. मी साधक आहे ना? मग मी काय करतोय? कसं जगतोय? साधकाला साजेसं जगतोय का? उत्तर ‘नाही’च आलं! सद्ग्रंथ असं जागं करतात. त्यामुळे या ग्रंथांना शरण जाऊन तरी जीवनाभ्यास केला पाहिजे. तेव्हा मन आवरण्याची प्रेरणा सद्ग्रंथही देतील. ‘एकनाथी भागवता’कडे त्या दृष्टीनं पाहिलं तर स्वसुधारणेची सुरुवात नेमकी कुठून करावी, याची थोडी जाणीव होईल.

मराठीतील सर्व एकात्मयोग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta ekatmayog article 458 abn