– चैतन्य प्रेम
आळस आणि विलंब हे साधकाच्या आत्माभ्यासातले दोन मोठे अडसर आहेत. त्यामुळे दक्षता टिकत नाही आणि साधनेनं जो आत्मलाभ व्हायचा तो वेळेवर होत नाही. यानंतर उत्तम साधकातला चौथा गुण म्हणजे निर्ममता. म्हणजे जे आहे अथवा नाही त्याची आसक्ती न उरणं. जो देहभावातच चिणला आहे, त्याला देह आणि देहाशी संबंधित, देहाला अनुकूल ते सर्व आपलं वाटतं, हवंसं वाटतं. मात्र देहच जिथं नश्वर, तिथं त्याच्याशी जोडलेल्या वस्तू, व्यक्ती कशा शाश्वत असतील? हे जाणून जो त्यांच्याप्रति असलेल्या कर्तव्यांत चुकत नाही, पण आसक्तीत अडकत नाही, त्याच्यात हे लक्षण दृढ होतं. प्रेम, कारुण्य, वात्सल्य हे भाव उदात्त आहेत. ते अवश्य असावेत, पण आसक्ती नसावी, अपेक्षा नसावी, हाच अभ्यास विनाआळस, विनाविलंब करायचा आहे. पाचवा गुण खरा आप्त कोण, हे ओळखता येणं! हा खरा आप्त म्हणजे आपल्या हिताशिवाय अन्य विचारही ज्याच्या अंत:करणात नसतो तो खरा सद्गुरूच! एकनाथ महाराज म्हणतात, ‘‘गुरूपरिचर्या नित्यकर्म। गुरूसेवा हाचि स्वधर्म। गुरू तोचि आत्माराम। सुहृदसंभ्रम सद्गुरूसी।।१९२।।’’ (‘एकनाथी भागवत’, अध्याय दहावा). गुरुपरिचर्या म्हणजे गुरूंची देखभाल हेच नित्यकर्म! आता ‘देखभाल’ म्हणजे काय? तर आपलं कोणतंही कर्म त्यांच्या बोधाला विपरीत होऊ नये, याची काळजी घेणं. आपल्या प्रत्येक कृतीत त्यांचा लौकिक सांभाळणं. भालप्रदेश म्हणजे कपाळ. या कपाळावर आठय़ा पडल्या की समजावं- आपली कृती योग्य नाही! तेव्हा प्रत्येक कृती करताना, ‘हे महाराजांना आवडेल का?’ हा प्रश्न स्वत:ला विचारणं हेदेखील नित्यकर्मात गुरुपरिचर्या जपणं आहे. सेवा म्हणजे सेवन! स्थूल कृतीत जसं गुरुबोधाला अनुरूपता टिकवायला हवी, तसंच सूक्ष्म कृतीतही- म्हणजेच मनन, चिंतन, विचार यांत तो सद्बोधच प्रधान होणं हे खरं सेवन आहे. गुरू हाच आत्माराम आहे, अंत:स्थ परमतत्त्व आहे, ही जाणीव वाढली पाहिजे. पुढे म्हणतात ‘सुहृदसंभ्रम सद्गुरूसी’! या स्वार्थकेंद्रित जगात कुणी कुणाचा खरा सुहृद होऊ शकतो का? सुहृद म्हणजे हृदयाशी एकरूपता. तरी आपण अनेकांना सुहृद मानतो, हा संभ्रम! जो खरा आपला आहे तो परका वाटतो. मग हाच संभ्रम सद्गुरूंशी जोडून त्यांना आप्त मानू लागणं आणि अखेर अनुभवानं ते पटणं नाथांना अभिप्रेत आहे. यापुढचा उत्तम साधकातला सहावा गुण आहे- अंत:करणाची निश्चलता! नाथ म्हणतात, ‘‘ज्यासी हृदयीं चंचळता। तो शिष्य नव्हे निजस्वार्था। ज्याचे अंतरी ‘निश्चळता’। तोचि परमार्था साधकु।।१९७।।’’ ज्याच्या अंत:करणात चंचलता आहे, त्याला खरा निजस्वार्थ साधणारच नाही. देहभावातून प्रसवणाऱ्या सामान्य स्वार्थामुळेच तर चित्त चंचल बनतं. भौतिकातल्या हवं-नकोपणानं दोलायमान मनच तर चंचल असतं. पण ज्याचं अंत:करण एका सद्गुरुबोधावर स्थिर झालं, तोच खरा परमार्थ साधू शकतो. श्रीगोंदवलेकर महाराज म्हणत की, ‘‘जे अस्थिर आहे ते स्थिर करण्याच्या धडपडीत, जे स्थिर आहे ते आपण अस्थिर करीत असतो.’’ म्हणजे दृश्य जग सतत बदलतं आहे, ते स्थिर करण्यात आपण आपली शक्ती वाया घालवत असतो; पण परमतत्त्व आणि परमबोध स्थिर आहे, ते आपल्या अंत:करणात आपणच अस्थिर करीत असतो. जो निश्चळ असतो त्यालाच खरा लाभ होतो. नाथ म्हणतात, ‘‘जैसा दीपु दीपें लाविला। लावितांचि तत्समान झाला। तैसा निश्चळास गुरू भेटला। तो तत्काळ झाला तद्रूप।।१९९।।’’