चैतन्य प्रेम

प्रत्येक फुलातला मध गोळा करणारा, पण फुलाच्या रंगरूपाला जराही धक्का न पोहोचविणारा भ्रमर म्हणजे मधुकर हा अवधूताचा बारावा गुरू आहे. या गुरूचं वर्णन करणारी पहिली ओवी आपण पाहिली ती अशी की, ‘‘भ्रमरू रिघोनि पुष्पामधीं। फूल तरी कुचंबो नेदी। आपुली करी अर्थसिद्धी। चोखट बुद्धि भ्रमराची।।९२।।’’ (‘एकनाथी भागवत’, अध्याय आठवा). या ओवीत आणखी एक मोठा अर्थ लपला आहे. तो कोणता? तर फुलाचं रूप न पालटता त्या फुलातला मध जसा भ्रमर काढतो, त्याप्रमाणे सत्पुरुषही माणसाचं बाह्य़रूप, बाह्य़स्थिती न पालटता त्याच्यातील सद्गुण तेवढा फुलवतात. म्हणजे काय? तर दुर्गुणांनी युक्त माणसातील दोषांवर बोट ठेवणं, ही फार सोपी गोष्ट आहे हो. ते कोणीही करू शकतं. पण एखाद्यातला गुणच पाहणं आणि तो विकसित करायला प्रोत्साहन देणं, हे फक्त सत्पुरुषच करू शकतो. शारदा माता विचारत की, ‘‘मोडतोड कोणीही करू शकतो, पण घडविणे किती लोकांना जमते? एखाद्याची निंदा कुणीही करू शकतो, पण त्याला सुधारू कोण शकतो?’’ तेव्हा दुर्गुणी माणसाला त्याच्यातले दुर्गुण नुसते सांगून किंवा त्या दुर्गुणांवर टीका करून सुधारता येत नाही. आपले दुर्गुण आपल्याला का कळत नाहीत? कळत असतातच, पण त्यातून सुटका कशी करावी, ते समजत नसतं. बरेचदा तर आपण आपल्या अवगुणांचं समर्थनसुद्धा करत असतो. त्याच वेळी दुसऱ्यातील अवगुणांवर सतत टीकाही करत असतो. श्रीगोंदवलेकर महाराजांचं एक मार्मिक वचन आहे. ते म्हणतात की, ‘‘अवगुण युक्तीने काढण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपण दुसऱ्याला फार दोष ठेवतो. हा प्रथम अवगुण आहे!’’ दुसऱ्याला आपण दोष देतो, हाच पहिला अवगुण आहे, हे आपल्या लक्षातही येत नाही. तेव्हा भ्रमर जसा फक्त मधच गोळा करतो त्याप्रमाणे सत्पुरुष हा दुसऱ्यातील गुणच ग्रहण करतो. तो दुर्गुणी माणसाला तात्काळ सद्गुणी करण्यासाठी धडपडत नाही. पण त्याला सद्गुणी बनविण्याची प्रक्रिया सुरू करतो. आता फुलातील मध गोळा करण्याचा हा एक अर्थ आहे. तो मूळ पोथीत या अर्थानं नाही, पण तरीही तो ध्यानात ठेवला पाहिजे. मूळ ग्रंथात भ्रमराचं गुरुत्व अवधूतानं दोन अंगांनी मांडलं आहे. गुणग्राहक आणि त्रास न देता कार्यभाग साधणं ही भ्रमराची चांगली बाजू आहे; तर सूर्यास्तानंतर कमळ मिटताच त्यात अडकलेला भ्रमर हतबल होतो, बंधनात पडतो, ही भ्रमराची उणी बाजू आहे. या दोन्ही अंगांनी भ्रमराचं रूपक अवधूतानं मांडलं आहे. राजानं करआकारणी कशी करावी, हे सांगताना कौटिल्यानंही भ्रमराचं उदाहरण दिलं होतं. भ्रमर जसा फुलाच्या सौंदर्याला धक्का न देता मध गोळा करतो, तसं प्रजेच्या सुबत्तेला बाधा न आणता राजानं कर गोळा करावा, असं कौटिल्य सांगतात. इथं भिक्षेवर जगत असलेल्या योग्यासाठी हे रूपक अवधूत प्रथम वापरतो. तो म्हणतो, ‘‘तैशीच योगियांची परी। ग्रासमात्र घरोघरीं। भिक्षा करूनि उदर भरी। पीडा न करी गृहस्थां।।९३।। प्राणधारणेंपुरतें। योगी मागे भिक्षेतें। समर्थ दुर्बळ विभागातें। न मनूनि चित्तें सर्वथा।।९४।।’’ (‘एकनाथी भागवत’, अध्याय आठवा). म्हणजे, फुलाला बाधा न आणता भ्रमर जसा मध गोळा करतो, त्याचप्रमाणे योग्याने घरोघर भिक्षा मागताना गृहस्थांना ती डोईजड होणार नाही इतपत घासभरच मागावी. गृहस्थ श्रीमंत आहे हे पाहून भिक्षा अधिकही घेऊ नये. आपल्या गरजा न वाढवता देहधारणेपुरतीच भिक्षा घ्यावी! यात अपरिग्रहाचा मोठा बोध आहे.

Ants in a box of rice
Kitchen Hacks: तांदळाच्या डब्याला मुंग्या लागल्यात? ‘हे’ सोप्पे उपाय मुंग्यांना पळवून लावतील
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Farmers in Washim district are cultivating chia crop along with traditional crops
वाशीम जिल्ह्यात पीक लागवडीच्या नव्या वाटा; ‘या’ पिकाला मिळतोय चांगला भाव
Where skeleton flowers grow best
‘ही’ दुर्मिळ फुले पावसाच्या पाण्यात दिसतात आरशाप्रमाणे पारदर्शी; असे का? जाणून घ्या…
Sharad Pawar , Ajit Pawar, Sharad Pawar latest news,
शरद पवार आणि अजित पवार उद्या एकाच व्यासपीठावर?
tabebuia rosea flowers Mumbai
निसर्गलिपी : बहराचा उत्सव
Conditional possession to eligible tenants on comprehensive list decision of MHADA Vice Chairman
बृहतसूचीवरील पात्र भाडेकरुंना सशर्त ताबा, म्हाडा उपाध्यक्षांचा निर्णय
NG Acharya Udyan, Butterfly Festival, Mumbai,
मुंबई : एन. जी. आचार्य उद्यानात फुलपाखरू महोत्सवाला सुरुवात
Story img Loader