चैतन्य प्रेम
समूळ मावळल्या अभिमान, कैंची बुद्धि कैंचें मन? या एकाच चरणात किती खोल अर्थ दडला आहे! अहंभाव आहे म्हणूनच तर मन आहे! मनाला ‘मनपण’ आहे! त्या मनानं स्वतला देहात चिणून घेतलं आहे. त्या देहाची जी ‘मी’ म्हणून ओळख आहे त्या ओळखीत, त्या प्रतिमेत हे मन पूर्णपणे मिसळून गेलं आहे. मग संपूर्ण जन्म हा त्या स्वप्रतिमेच्या जपणुकीत, संवर्धनात, रक्षणात आणि समर्थनातच सरत आहे. या देहाशी, देहभावाशी तादात्म्य पावलेली जी बुद्धी आहे तीच देहबुद्धी आहे. हे मन आणि बुद्धी समरसून गेली आहे. त्यामुळेच या देहाची गैरसोय ती स्वतची गैरसोय वाटते. या देहाचा मान म्हणजे माझा मान आणि या देहाचा अपमान तो माझा अपमान वाटू लागतो. म्हणूनच समर्थ म्हणतात ना? ‘न होता मनासारिखे दुख मोठे’! मनासारखं न घडणं हेच माणसाचं मोठं दुख आहे. पण एकदा हा अहंभाव गेला की, ‘‘समूळ मावळल्या अभिमान। कैंची बुद्धि कैंचें मन। बुडे चित्ताचें चित्तपण। ब्रह्म परिपूर्ण कोंदाटे॥११४॥’’ ही अवस्था येते. मनाचं संकुचित ‘मी’ प्रतिमेशी जखडलेलं मनपण, देहभावाशी एकरूप देहबुद्धी, संकुचित ‘मी’प्रतिमेच्या चिंतनात बुडालेल्या चित्ताचं चित्तपण हे सारं मावळून एक सोहंभाव प्रकटतो! मग मनाचं सुमन होत उन्मनी अवस्था होते. चित्ताचं सुचित्त आणि बुद्धीची सुबुद्धी होऊन खरी आंतरिक सुधारणा म्हणजे जे ‘सु’ अर्थात सर्वार्थानं मंगल, शुभ, परम आहे त्याचीच धारणा होते. त्या अवस्थेचा प्रत्यय संतांच्या आणि भक्तांच्याही चरित्रात येतो. भाऊसाहेब केतकर होते ना? तर एकदा त्यांच्याशी कुणी नातेवाईक वाद घालू लागला. भाऊसाहेब अगदी शांतचित्त होते. त्यामुळे आणखीनच चिडून त्या नातलगानं त्यांचा उल्लेख ‘थेरडा’ असा केला. बाबा बेलसरेंना राहवलं नाही. त्यांनी भाऊसाहेबांकडे आपल्या मनातली वेदना प्रकट केली. त्यावर भाऊसाहेब मोठय़ा प्रेमळ शब्दांत समजावत म्हणाले, ‘‘अहो, मी बराच म्हातारा नाहीये का? त्यामुळे त्यांचं बोलणं चुकीच नाही!’’ आपल्या जीवनावर एका सद्गुरूचीच सत्ता आहे, आपला मान-अपमान, लाभ-हानी ते पाहून घेतील, या दृढ भावाशिवाय असं सहज वागलं जाणं अशक्य आहे. हा भाव सोऽहं भावाशिवाय शक्यच नाही. आणि एकदा का हा सोऽहंभाव जगण्याचा स्थायी भाव झाला की मग ‘ब्रह्म परिपूर्ण कोंदाटे,’ ही स्थिती होते. ब्रह्म म्हणजे सर्वव्यापक, परम असं जे तत्त्व ते. तेच तत्त्व सद्गुरू म्हणून साकार रूपात प्रकटतं आणि याला ‘गुरुगीते’चा दाखला आहे! तर, जेव्हा शिष्याच्या मनाचं उन्मन होतं, चित्ताचं सुचित्त आणि बुद्धीची सुबुद्धी होते तेव्हा जीवनात ब्रह्म म्हणजे सद्गुरू पूर्णपणे भरून जातो. कोंदाटतो म्हणजे प्रत्येक कोना-कोनात दाटतो! तर, सोऽहंभावानं सद्गुरूमय झालेल्या जीवनाचा असा प्रत्यय अनेकानेक सत्शिष्यांच्या चरित्रातही येतो. मग अंतरीक्ष राजा जनकाला सांगतो, ‘‘‘एकधा’ विभाग अंतकरण । त्याची उणखूण निजलक्षण। राया सांगितलें संपूर्ण । आतां ‘दशधा’ लक्षण तें ऐक ॥११५॥’’ एक विभाग जो अंत:करण त्याची खूण साकल्यानं सांगितली, आता जे दहा भाग आहेत त्यांची माहिती ऐक. मग तो म्हणाला, ‘‘दशधा इंद्रियें अचेतन। तयांतें चेतविता नारायण। दशधारूपे प्रवेशोन। इंद्रियवर्तन वर्तवी॥ ११६॥’’ ही दहा इंद्रियं प्रत्यक्षात अचेतन आहेत, पण या दहांमध्ये नारायणाची चतन्य शक्ती प्रवेशते आणि इंद्रियांकरवी वर्तन करवते!