चैतन्य प्रेम
मनुष्य जन्माची प्राप्ती, यासारखी भाग्याची गोष्ट नाही. कारण केवळ माणसाला सूक्ष्म बुद्धीचं वरदान लाभलं आहे. सूक्ष्म बुद्धी अशासाठी की, ती सूक्ष्माशी सहज जोडली जाऊ शकते. सूक्ष्म तत्त्वाचं आकलन करू शकते. इतकंच नव्हे, तर स्थूल, दृश्य अशा गोष्टी अथवा वस्तुमात्राच्या मुळाशी जे सूक्ष्म, अदृश्य तत्त्व आहे, ते उकलू शकते. सर्वच प्राणिमात्रांमध्ये बुद्धीचा कमीअधिक वावर असतो, पण तो देहरक्षण आणि प्रजननापुरता. देहरक्षणात निवारा शोधणं वा तयार करणं, अन्न वा भक्ष्य मिळवणं, मृत्यूपासून बचावाचा प्रयत्न करणं, या गोष्टींचा समावेश आहे. प्रजननासाठी आवश्यक कामभाव प्राणिमात्रांमध्ये ठरावीक काळी आणि ठरावीक काळापुरताच निर्माण होतो. आपला जन्मच का झाला, या चराचरामागची चालक शक्ती कोणती, ईश्वर आहे का, त्याची प्राप्ती होऊ शकते का, यांसारखे प्रश्न मनात उत्पन्न करणारी आणि त्यांच्या शोधासाठी प्रवृत्त करणारी व साह्य़ करणारी सूक्ष्म बुद्धी काही त्यांच्या ठायी नाही. माणसाला मात्र हे प्रश्न पडतात आणि हे प्रश्न त्याला अंतर्मुखही करू शकतात. आपल्या जीवनाकडे नव्या दृष्टीनं पाहण्याची प्रेरणा देतात. आपल्या जीवनाचे स्तर दोन. स्थूल-दृश्य आणि सूक्ष्म-अदृश्य. स्थूल जीवन हे भौतिक आहे आणि जोवर देह आहे तोवर कोणत्या ना कोणत्या भौतिकाच्या स्वीकारावाचून गत्यंतर नाही. तपस्वी बनून जंगलात जरी गेलात तरी किमान देह झाकणारी वस्त्रं, वल्कलं लागतील, देह पोसणारी फळं, कंदमुळं लागतील, देहरक्षणासाठी गुंफेसारखा तरी निवारा लागेल. म्हणजेच भौतिकाचा संग काही सुटणारा नाही आणि हा संग जर मनात खोलवर असेल, तर एखाद्या लक्षाधीशाला असलेलं महागडय़ा वस्तूचं प्रेम आणि एखाद्या भिक्षेकऱ्याला असलेलं कटोऱ्याचं प्रेम यांतील आसक्त भावात काही विशेष फरक नसेल! तेव्हा भौतिकात राहूनही त्याची आसक्ती मनाला चिकटू न देणारी सूक्ष्म बुद्धी माणसाला लाभली आहेच. ज्ञानेश्वर माउलींनी तिचं महत्त्व वर्णिताना म्हटलं आहे की, ‘‘जैसी दीपकलिका धाकुटी। परि बहु तेजाते प्रकटी। तैसी सद्बुद्धी ही थेकूटी। म्हणो नये।।’’ दिव्याची ज्योत लहानशी असली तरी ती संपूर्ण खोली उजळू शकते, तशी सद्बुद्धी सूक्ष्म असली तरी आयुष्य उजळवून टाकू शकते. तेव्हा त्या सद्बुद्धीच्या आधारावर माणसाला भौतिकाचं महत्त्व आणि मर्यादा व धोका उमजू शकतो. त्यातील आसक्तीचा धोका उमगू शकतो. पण तरी माणूस त्या सूक्ष्म बुद्धीचा उपयोग स्वार्थ साधण्याचे निरनिराळे उपाय शोधण्यात आणि योजण्यात करीत राहतो. अवधूत यदुराजाला सांगतो की, ‘‘मनुष्यदेहीं गृहासक्तु। तो बोलिजे ‘आरूढच्युतु’। कपोत्याचे परी दु:खितु। सिद्ध स्वार्थु नाशिला।।६३९।।’’ (‘एकनाथी भागवत’, अध्याय सातवा). मनुष्यजन्म मिळताच जो ‘मी’ आणि ‘माझे’रूपी घरात आसक्त होतो, तो अश्वावर आरूढ होताच तोंडघशी पडलेल्या स्वारासारखा असतो! एखाद्या गोष्टीचा आरंभ करावा आणि तात्काळ हार मानावी, अशी त्याची गत असते.
chaitanyprem@gmail.com