अवधूतानं आत्मज्ञानाच्या वाटेवर याच सृष्टीतले चोवीस गुरू केले. त्यांची माहिती तो यदुराजाला सांगत आहे. त्यात कपोत पक्षी हा त्याचा आठवा गुरू आहे. आपली प्रिया व पिल्लांच्या मृत्यूनं खचलेल्या आणि त्यामुळे स्वत:चंही जीवन निराशेच्या भरात संपवणाऱ्या कपोत पक्ष्याच्या निमित्तानं जीवनमाहात्म्याचा पाठ शिकता येतो. त्यामुळे हा अवधूताचा एक गुरू आहे! अनंत जन्मांच्या चक्रातून मुक्त होण्याची संधी मनुष्यजन्माच्या प्राप्तीनं हाती आलेली असते. हा परमस्वार्थ तो गमावतो, हे मांडताना अवधूत सांगतो, ‘‘नवल नरदेहाची ख्याती। रामनामाच्या आवृत्तीं। चारी मुक्ती दासी होती। तो देहो वेंचिती विषयासी।।६४१।।’’ ज्या नरदेहानं रामनाम जपत चारी मुक्ती पदरी नांदतात, त्या नरदेहाच्या जोरावर आसक्तीच्या बंधनात पडून माणूस विषयांचं दास्य पत्करतो व त्यापायी जन्म-मृत्यूचं चक्र अबाधित राखतो, असं अवधूत म्हणतो. प्रत्यक्षात ‘नरदेह’ हाही अवधूताचा चोविसावा गुरू आहे. त्याच्या विवरणात आपण हा मुद्दा परत पाहणार आहोतच. पण इथं ‘रामनामाच्या आवृत्ती’च्या अनुषंगानं थोडा विचार करू. माणूस जन्मभर स्वत:चा नावलौकिक वाढावा यासाठी धडपडत असतो. माझ्या सद्गुरूंनी पहिल्या भेटीत मला, ‘‘तुम्ही कोण?’’ म्हणून विचारलं. मी माझं नाव सांगितलं! इतकं आपल्या नावाशी आपण तादात्म्य पावलेलो असतो बघा! तेव्हा मी वयाची पस्तिशी पार केली होती. सद्गुरूंनी माझं नाव घेत विचारलं, ‘‘साठ वर्षांपूर्वी तुम्ही कुठे होतात?’’ मला उत्तर सुचेना. मी फक्त उद्गारलो, ‘‘नाही माहीत!’’ मग त्यांनी पुन्हा विचारलं, ‘‘साठ वर्षांनी तुम्ही कुठे असाल?’’ मी पुन्हा म्हणालो, ‘‘नाही माहीत!’’ त्यावर हसून ते म्हणाले, ‘‘मग मधल्या साठ वर्षांसाठी तुम्ही जे ‘मी म्हणजे अमुक’ या ओळखीला घट्ट धरून बसला आहात, ते विसरायचं. एवढंच अध्यात्म आहे!’’ पुढे म्हणाले, ‘‘जगासमोर वावरताना ही ओळख विसरायची नाही! व्यवहारात ती ठेवायचीच, पण आतून विसरायची.’’ काय सूत्र आहे पाहा! जे नाव जगानं मला दिलंय, जे मी निवडलेलं नाही, जे नाव मरेपर्यंतच माझ्याबरोबर राहणार आहे, पुढच्या जन्मी ते आठवणारही नाही, त्या नावात मी किती रुतून आहे! मग भगवंताच्या नामाच्या लौकिकाचं वेड मला कसं उमगावं? लौकिकातलं नावही एकवेळ गळून पडतं, पण स्वलौकिकाचा मोह फार सूक्ष्म असतो बरं. लौकिकातलं नाव मागे पडलं, पण ‘चैतन्य प्रेम’ या नावाचं प्रेम निर्माण झालं! त्यात एक दिव्यत्वाची भावना होती, श्रीमहाराजांनी ते दिल्याचा भाव होता. सद्गुरूंनी दीक्षानाम म्हणून हेच कायम ठेवलं, पण म्हणाले, ‘‘दीक्षानाम म्हणजे ध्येयनाम असतं. ‘चैतन्य प्रेम’ म्हणजे केवळ चैतन्य तत्त्वावर प्रेम! तुमची आज ही स्थिती नाहीये! ती स्थिती हे तुमचं ध्येय असलं पाहिजे. त्यासाठी हे दीक्षानाम!’’ हे सांगण्याचा हेतू एवढाच की, मूळ नावाचं प्रेम कमी झालं तरी मग टोपण नाव किंवा दीक्षानामाच्या प्रेमात अडकण्याचा धोका असतोच. ते अडकणंही पुन्हा मायेच्या खेळात खेचणारं ठरतं. तेव्हा स्वनावाचं प्रेम आणि मोह फार खोलवर असतो.
चैतन्य प्रेम chaitanyprem@gmail.com