संग्रहाची लालसा ही अखेर संग्रह करणाऱ्याचाच घात करते. गरजेपुरता संग्रह अनाठायी नाही. इतकंच नव्हे, तर प्रापंचिक साधकानं तर गरजेपेक्षा थोडा अधिक संग्रह करायला आणि राखायलाही काहीच हरकत नाही; पण त्यात सत्कर्म व धर्म या दोन गोष्टींचं भान सुटता कामा नये. अवधूताच्या माध्यमातून एकनाथ महाराज सांगतात की, ‘‘आचरावें सत्कर्म। संग्रहावा शुद्ध धर्म। हेंचि नेणोनियां वर्म। धनकामें अधम नाशती।।११७।।’’ (‘एकनाथी भागवत’, अध्याय आठवा). म्हणजे सत्कर्माचं आचरण करीत शुद्ध धर्माची जोड असलेला संग्रह साधावा, हे वर्म सुटल्याने केवळ ऐहिक संपदेची लालसा असलेल्या धनकामी अधमांचा नाश होतो! या अनुषंगानं एक गोष्ट आठवते. आपल्याला ती माहीत असेलही. एकदा एक राजा एका माणसावर प्रसन्न झाला. त्याला विस्तीर्ण भूप्रदेशाकडे घेऊन गेला. म्हणाला, ‘‘सूर्यास्त होईपर्यंत तू जेवढं अंतर कापशील तेवढी जमीन तुझी!’’ तो माणूस हरखूनच गेला आणि पळू लागला. दुपार झाली, भूक लागली, तहान लागली तरी थांबेचना! खाण्यापिण्यात वेळ गेला, तर तेवढीच जमीन कमी मिळेल, या विचारानं धावणं थांबवलं नाही. अखेर हृदयात कळ आली आणि खाली कोसळला. ज्या जमिनीचा मालक होणार होता त्याच जमिनीवर गतप्राण होऊन कोसळला. तर अशी अति लालसा आपला घात करीत असते. म्हणून सत्कर्म आणि धर्माची जोड हवी. आता ‘सत्कर्म’ आणि ‘धर्म’ यांमधला फरक मात्र लक्षात घेतला पाहिजे. सत्कर्माचा संबंध स्थूलाशी आहे, तर धर्माचा संबंध सूक्ष्माशी आहे. धर्म म्हणजे धारणा, जीवनदृष्टी. त्या धारणेनुसारच आपण जगात वागत असतो, म्हणजेच कर्म करत असतो. आपली जीवनदृष्टी, धारणा ही देहबुद्धीवर पोसली असल्यानं आपण त्या देहबुद्धीला सुखावणारी र्कम, त्या देहबुद्धीच्या सुखाचीच इच्छा गोवलेली सापेक्ष सत्र्कम आणि काही वेळा देहबुद्धी ज्यांची वकिली करू शकते अशी दुष्र्कमदेखील करीत असतो. पण शुद्ध धारणा आणि त्यातून घडणारी शुद्ध निरपेक्ष सत्र्कम वेगळीच असतात. इथं आपण धनसंग्रहापुरता विचार करू. मग जाणवेल की, धनसंग्रह करणाऱ्याची धारणा शुद्ध हवी आणि धन कमविण्यासाठीची र्कमही शुद्ध हवीत, हे नाथांना अभिप्रेत आहे. आता आधीच वर सांगितलंय की, संन्याशाप्रमाणे प्रापंचिकाला काही जगता येणार नाही. त्यामुळे प्रापंचिक साधकानं तर गरजेपेक्षा थोडा अधिक संग्रह करायला आणि राखायलाही काहीच हरकत नाही. नाथांच्या काळी संग्रहित संपत्ती केवळ दृश्य रूपातच असे. म्हणजे घरदार, नाण्यांचे हंडे, शेतीवाडी, गायीगुरं आदी. सोन्या-चांदीचे दागदागिनेही संपत्तीचा भाग होते, पण या सगळ्या गोष्टींकडे ‘गुंतवणूक’ म्हणून पाहण्याची दृष्टी नव्हती. आज सूक्ष्म रूपात गुंतवणुकीच्या माध्यमातून किती तरी उपायांनी धन संग्रहित करण्याचे मार्ग विकसित झाले आहेत. भावी काळात धनप्राप्तीची हमी असलेले मार्गही आहेत. तेव्हा आजच्या गरजेपेक्षाही अधिक रक्कम निर्माण करण्याचे वा राखण्याचे पर्याय साधकाला उपलब्ध आहेत. त्याचा अवश्य लाभ घेतला पाहिजे. पण त्या धडपडीतच रुतून जाऊ आणि आपलं मन केवळ त्याच विचारांमध्ये गुरफटून जाईल, इतका त्याचा व्याप नसावा. दुसरी आणखी एक गोष्ट नीट लक्षात घ्या, इथं धनातील आसक्तीला विरोध आहे, धनाला किंवा श्रीमंतीला नव्हे. प्रारब्धानं आणि स्वकष्टानं श्रीमंतीत असलो, तर त्यात वाईट काहीच नाही. पण अशा धनानं मनाची श्रीमंती मात्र उणावत नाही ना, याकडेही लक्ष पाहिजे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा