चैतन्य प्रेम
माणसाचं जीवनच घात-अपघातांनी भरलेलं आहे. माणसाला जीवनात तीन प्रकारच्या घातांना तोंड द्यावं लागतं. अवधूत आणि यदुराजा यांच्यातील संवादाच्या माध्यमातून हे तीन घात कोणते, हे एकनाथ महाराजांनी सांगितलं आहे. ते म्हणतात, ‘‘अर्थसंग्रहें जीवघातू। स्त्रिया आसक्तीं अध:पातू। रसनलोलुप्ये पावे मृत्यू। त्रिविध घातू जीवासी।।१७१।।’’ (‘एकनाथी भागवत’, अध्याय आठवा). धन, काम आणि अन्न या तीन गोष्टींतली आसक्ती हेच मानवी जीवनातले त्रिघात आहेत. सर्वसामान्य माणसाच्या जीवनात खरं तर या तिन्ही गोष्टींचं महत्त्व वादातीत आहे, पण त्यांच्यातील आसक्तीचं प्रमाण तितकंच घातक आहे. धन आवश्यक आहे, कारण जगाचे सगळे व्यवहार त्या आधारावरच चालतात. पण धन म्हणजे जीवनसर्वस्व नव्हे. माणसानं पैशाला जन्माला घातलं आहे, पैशानं माणसाला नव्हे! त्या पैशाला जीवनविचारावर अतिक्रमण करण्याचा अधिकार असता कामा नये. जी गोष्ट धनाची तीच कामाची. काम हा चराचरांतील जीवनपरंपरा प्रवाहित ठेवणारा महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळे जीवसृष्टीत त्याचं स्थान महत्त्वाचं आहे. सर्व इंद्रियं ज्यात तन्मय होऊन तादात्म्यतेचं कणभर सुख अनुभवतील, अशी कामभोगाची सोय भगवंतानंच केली आहे. त्यातल्या क्षणिक का होईना, पण सुखाच्या अनुभूतीनं जीव त्यात रमावा आणि जीवसृष्टीची जन्मसाखळी अभंग राहावी, हा त्यामागचा हेतू आहे. म्हणूनच मनुष्य वगळता सर्व प्राणिमात्रांत प्रजननापुरता कामव्यवहार घडतो. माणसालाच फक्त तरल कल्पनाशक्ती, विचारशक्ती लाभली आहे. त्यामुळे कामसुखात तो अधिकच गुंततो. ओशो म्हणतात त्याप्रमाणे, प्रजनन हा अन्य प्राणिमात्रांच्या कामव्यवहाराचा प्रधान हेतू असतो, तर माणसात कामसुख हाच मुख्य हेतू असतो. त्यातून जन्मणारी मुलं हा त्याच्या दृष्टीनं दुय्यम भाग असतो. म्हणूनच तर मुलं होऊ न देता कामसुख अनुभवण्याचा उपाय केवळ माणसानंच शोधून काढला आहे. तर धन आणि काम यांचं मानवी जीवनव्यवहारातलं स्थान महत्त्वाचं असलं तरी, त्यात प्रमाणशीरता अभिप्रेत आहे. ते भान सुटल्यास, त्यातली आसक्ती घातच नव्हे, तर अध:पातही साधणारी आहे. घात झाला, तर माणूस सावरू शकतो; पण अध:पात झाला, तर सावरणं आणि पुन्हा वर येणं कठीण असतं. हा घात आणि अध:पातही परवडला, पण मृत्यूच ओढवला तर? एकनाथ महाराज बजावतात, ‘रसनलोलुप्ये पावे मृत्यू!’ रसनालोलुपता म्हणजे अगदी साध्यासोप्या शब्दांत सांगायचं, तर ‘खादाडपणा’ हा जिवावर कसा बेततो, हे एकनाथ महाराज एका रूपकाद्वारे फार मार्मिक शब्दांत सांगतात. ते म्हणतात, ‘‘रसना आमिषाची गोडी। लोलुप्यें मीनु गिळी उंडी। सवेंचि गळु टाळु फोडी। मग चरफडी अडकलिया।।१७३।।’’ म्हणजे, आमिषाच्या गोडीनं मासा गळ तोंडात पकडतो, पण तो त्याच्या तोंडात टोचतो, अडकतो. मासा तडफडत मरण पावतो. अगदी त्याचप्रमाणे मिष्टान्नाची गत आहे. ‘‘पाहतां रस उत्तम दिसत। भीतरीं रोगांचे गळ गुप्त। रस आसक्ती जे सेवित। ते चडफडित भवरोगीं।।१७४।।’’ वरकरणी उत्तम रसयुक्त अन्न दिसतं, पण त्यात रोगांचे गुप्त गळ असतात! आसक्तीपोटी जो प्रमाणाबाहेर खात राहतो तो त्या गळात अडकतो आणि जन्मभर अनेक रोगांनी ग्रस्त होऊन चडफडत राहतो! गळाला लागलेला मासा जसा जोवर जिवंत असतो तोवर चडफडतच असतो, तसा हा माणूस जिवंत असेपर्यंत जीवनाचा खरा आनंद उपभोगू शकत नाही!