माणूस इतरांसमोर आपले अवगुण झाकत असला किंवा त्या अवगुणांचं समर्थन करीत असला, तरी त्याला आपल्या अवगुणांची जाणीव असतेच. मात्र त्यातून बाहेर पडण्याचा उपाय त्याला उमगत नाही. उमगला तरी व्यवहार्य वाटत नाही. दुर्योधनालाही आपल्यातले दोष समजत होते; खरा धर्म कोणता आणि अधर्म कोणता, हे जाणवत होतं; पण धर्माचरणाची वृत्तीच नव्हती. ‘जानामि र्धम न च मे प्रवृत्ती’ असा त्याचा पवित्रा होता. आपलीही हीच अवस्था असते. धर्माचरण कोणतं, आसक्ती कशी घातक आहे, मोह कसा सोडला पाहिजे, हे सगळं माहीत असतं. बोलताही येतं. पण ते आचरणात काही उतरत नाही. ‘बोल बोलता वाटे सोपे करणी करता टीर कांपे’ अशी गत असते. याच भावनेनं व्यथित होऊन संत तुकाराम महाराज म्हणतात की, ‘‘माझे मज कळों येती अवगुण। काय करूं मन अनावर।।१।। आतां आड उभा राहें नारायणा। दयासिंधुपणा साच करीं।।धृ.।। वाचा वदे परी करणें कठीण। इंद्रियां अधीन जालों देवा।।२।। तुका म्हणे तुझा जैसा तैसा दास। न धरीं उदास मायबापा।।३।।’’ हे सद्गुरो, माझे अवगुण कोणते, कोणत्या अवगुणांमुळे तुझ्या-माझ्यात दुरावा आहे, अंतराय आहे, हे मला उमगत का नाही? पण काय करू, माझं मन अनावर झालं आहे. भगवंताच्या कृपेनं इतका धडधाकट देह लाभला आहे; पण काय करावं, त्या देहाचा चालक असलेलं मन अनावर झालं आहे. त्यामुळे सगळी इंद्रियंही उच्छृंखल झाली आहेत. भगवंतानं त्याचं नाम घेण्यासाठी, त्याच्या स्तुतीसाठी बोलण्याची क्षमता असलेलं मुख, जिव्हा दिली आहे. तिचा वापर भलताच सुरू आहे. एकनाथ महाराज एका अभंगात म्हणतात, ‘‘नामाविण मुख सर्पाचें तें बीळ। जिव्हा नव्हे काळसर्प आहे।।’’ म्हणजे भगवंताचं गुणगान वा नामजप जर होत नसेल, तर ते मुख म्हणजे सापाच्या बिळासारखं आहे. या बिळात काळसर्परूपी जिव्हा वळवळत आहे! काळसर्पाच्या विळख्यात जो जीव सापडतो त्याचं भवितव्यच संपलेलं असतं. तशी गत इंद्रियाआधीन असलेल्या जीवाची झाली आहे. म्हणून काकुळतीनं श्रीतुकाराम महाराज सांगतात की, ‘‘माझे मज कळों येती अवगुण। काय करूं मन अनावर।।’’ मला माझ्यातले दोष समजतात, पण हे गुरुराया! मी काय करू? माझं मन अनावर आहे. मग यावर उपाय एकच आहे. तो म्हणजे, ‘‘आतां आड उभा राहें नारायणा। दयासिंधुपणा साच करीं।।’’ हे नारायणा, म्हणजे नररूपी देहात प्रकटलेल्या हे सद्गुरुराया, आता हे अवगुण आणि मी यांच्या मधे तू उभा राहा! अवगुण उफाळून येताच तूही मला दिसावास! त्या अवगुणांना केवळ तूच थोपवू शकतोस, तूच नष्ट करू शकतोस. या रीतीनं तू दयासिंधु आहेस, हे वचन सत्य कर. हे गुरुराया, अवगुण किती वाईट आहेत, हे मला का कळत नाही? मीसुद्धा कित्येकांशी गप्पा मारताना अवगुण किती वाईट हे बोललो आहे. ते दूर केले पाहिजेत, असं ठासून सांगितलं आहे. पण, ‘‘वाचा वदे परी करणें कठीण। इंद्रियां अधीन जालों देवा।।’’ बोलणं सोपं असतं, पण कृतीची वेळ आली की आपण किती इंद्रियाधीन आहोत, हे समजतं. पण हे सद्गुरो, कसा का असेना मी तुझा आहे, आता माझ्याबाबत उदास राहू नकोस! (‘‘तुका म्हणे तुझा जैसा तैसा दास। न धरीं उदास मायबापा।।’’). तर जीव विषयासक्तीमुळे स्वत:चा कसा घात करून घेतो, हे अवधूत आमिषाला लागलेल्या माशाच्या उदाहरणावरून शिकला. त्यामुळे तो त्याचा गुरू झाला. आता पुढचा ‘गुरू’ मोठा विलक्षण आहे. हा गुरू म्हणजे देहविक्रय करणारी स्त्री.. पिंगला!
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा