आत्मस्वरूपाला विन्मुख होऊन देहतादात्म्यात रमलेला माणूस असो की मोह, भ्रमानं भारलेला देवांचा राजा इंद्र असो; तो आत्ममरणातच जगत असतो. आत्मस्वरूपाला विन्मुख होणं म्हणजे आपल्या मूळ शुद्ध स्वरूपाची जाण न राहणं. आपल्या अस्तित्वामागचं कारण न उमजणं वा विसरणं. आपण मूळ कोण आहोत? तर व्यापक, परम अशा चैतन्य तत्त्वाचा अंश आहोत. पण आपलं जगणं व्यापक नाही, परम नाही. त्यानंतर आपण माणूस आहोत, पण आपलं वागणं सदोदित माणुसकीला सुसंगत नाही. मग आपण आपल्या प्रपंचात अनेकानेक नात्यांनी वावरत आहोत. पण त्या प्रत्येक नात्यातील परस्परकर्तव्यापेक्षा आपल्या स्वार्थाला, मानसिक ओढीला आपण प्राधान्य देतो. त्यामुळे या सामान्य पातळीवरही आपण आपल्या भूमिकेशी विसंगत जगतो. तीच गत देवलोकातील इंद्राचीही आहे. कुणी तपश्चर्या सुरू केली, तर इंद्राला आपलं पद जाण्याची भीती वाटते. का वाटावी? पदाचा मोह, आसक्ती आणि आपण सदोदित या पदावर राहणार आहोत, या भ्रमामुळेच ना? पुराणांचा सच्चेपणा असा की त्यांनी अशा अनेक कथा सांगितल्या ज्यात देवांचा अहंकार, मोह त्यांना कसा भोवला, हे स्पष्टपणे मांडलं आहे. आणि जेव्हा जेव्हा देवांचा अहंकार वाढला तेव्हा तेव्हा परमात्म्यानं असुरांचं सामर्थ्य, महत्त्व वाढवून देवांना पाठ शिकवला! रावणानं सगळे देव बंदिवासात टाकले होते तेव्हा अखेर परमात्म्याची आळवणी त्यांना करावी लागली. पण हा परमात्मा आहे कुठे, त्याला भेटावं कसं, हेदेखील देवांना माहीत नव्हतं! तुलसीदास लिहितात, ‘‘बैठे सुर सब करहिं बिचारा। कहँ पाइअ प्रभु करिअ पुकारा।। पुर बैकुंठ जान कह कोई। कोउ कह पयनिधि बस प्रभु सोई।।’’ (रामचरित मानस, बालकाण्ड). म्हणजे सर्व देव बसून विचार करू लागले की, परमात्म्याला शोधावं तरी कुठे? पुकारावं तरी कुठे? मग कोणी म्हणालं, वैकुंठाला जाऊ, कोणी म्हणालं, क्षीरसमुद्रात जाऊ, तिथे प्रभु निवास करतात! अखेर शिवशंकरानं समजावलं की, ‘‘जाके हृदयँ भगति जसि प्रीती। प्रभु तहँ प्रगट सदा तेहिं रीती।।’’  ज्या हृदयात जशी भक्ती आणि प्रेम असतं तिथं प्रभु प्रकट होतात! मग धावा सुरू झाला आणि तो सकाम होता म्हणून प्रभु प्रकटले नाहीत, पण त्यांची आकाशवाणी झाली! ‘‘तुम्ही सकळ सुरवर। वेगीं व्हावें वानर।’’ (भावार्थ रामायण, अध्याय पहिला), असं परमात्म्यानं फर्मावलं! त्यानुसार या देवांनी आपल्या अंशाकरवी वानर व अस्वल अवतार धारण केला. जे देवलोकात समस्त सुखोपभोगात राहात होते त्यांना वानरदेह धारण करून जंगलात राहण्याची वेळ आली! ब्रह्मदेवांनी अंशाद्वारे जाम्बुवंत, इंद्रानं वाली, सूर्यानं सुग्रीव, कुबेरानं गंधमादन, अग्निदेवानं नील, विश्वकम्र्याने नल, वरुणानं सुषेण, अश्विनी कुमारांनी मैन्द आणि द्विविद आदी वानर रूपांना प्रकट केलं. तेव्हा आपली मूळ सुखरूपता, पूर्ण स्वरूप प्राप्त करून घेण्यासाठी देवांना भगवंताची भक्ती, सेवा करण्याची संधी मिळवावी लागली. आत्ममरण दूर करून भगवद्इच्छेनुसार कर्मरत व्हावं लागलं. तेव्हा आत्ममरण हेच दु:खाचं कारण आहे. आत्मजागृतीशिवाय खऱ्या सुखाची प्राप्ती करून देणारी साधना अशक्य आहे, हे वास्तव पिंगलेला उमगलं. पण आणखी एक विलक्षण गोष्ट घडली. ज्ञान झाल्यानं माणसाचा ज्ञातेपणाचा अहंभाव वाढू शकतो, पण पिंगला त्या ज्ञानानं सोहंभावातच रममाण झाली!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा