पिंगलेच्या मनात  ज्ञान, वैराग्य दोन्ही प्रकटलं. पण त्यामुळे तिला ज्ञाते झाल्याचा अहंकार जडला नाही! त्या ज्ञानानं अहंभाव गळून पडला आणि सोहंभाव उमलू लागला. एकदा तिला वाटलंही की, पूर्वजन्मीचं काही भाग्य, काही सुकृत निश्चितच असलं पाहिजे की ज्यायोगे मला हा परम लाभ झाला. ती म्हणते, ‘‘ये जन्मीचें माझें कर्म। पाहतां केवळ निंद्य धर्म। मज तुष्टला पुरुषोत्तम। पूर्वजन्मसामग्रीं।।२५६।।’’ (एकनाथी भागवत, अध्याय आठवा). म्हणजे, या जन्मीचं माझं कर्म निंदा करावी, असंच आहे. परंतु गेल्या जन्मीचं काही भाग्य असल्यानं पुरुषोत्तम माझ्यावर प्रसन्न झाला आहे. मग लगेच तिचं मन म्हणालं की, ‘‘मज कैचें पूर्वजन्मीं साधन। ज्याचें नाम पतितपावन। कृपाळु जो जनार्दन। त्याचे कृपेनें हें घडलें।।२५७।।’’ ती म्हणते की, माझं या जन्मीचं हीन जगणं पाहता मी पूर्वजन्मी काही साधना केली असेल आणि त्याचं पाठबळ आता लाभत असेल, असं वाटत नाही. पतितपावन अशा कृपावंत जनार्दनाच्याच कृपेनं हे घडलं आहे. आता इथं एकनाथ महाराज मोठय़ा भावयुक्त अंत:करणानं ‘जनार्दन’ शब्द उच्चारतात तेव्हा भगवंताशी एकरूप सद्गुरूंशिवाय सामान्य भक्तांवर कुणीच कृपा करीत नाही, हेच सूत्र अध्याहृत असतं. पिंगला मग म्हणते, ‘‘जरी असतें पूर्वसाधन। तरी निंद्य नव्हतें मी आपण। योनिद्वारा कर्माचरण। पतित पूर्ण मी एक।।२५९।।’’ जर पूर्वजन्मांच्या साधनेची जोड असती, तर मी या जन्मी निंद्य ठरले नसते, निंद्य कर्माच्या जोरावर जगले नसते! ही आत्मनिंदा आहे, आत्मग्लानी, आत्मपीडन आहे. माणसाची दुटप्पी वृत्ती पहा! समाजाच्या दृष्टीनं पिंगला निंद्य होती, पण तिच्याकडे जाणारे प्रतिष्ठित होते! समाज त्यांची निंदा करीत नव्हता. त्यांच्याकडे तिरस्कारानं पहात नव्हता. असो. पिंगलेचं मन भगवंताच्या कृपेच्या जाणिवेनं उदात्त झालं होतं. तिला वाटलं, दु:खाचे डोंगर कोसळू लागताच अभागी लोकांचं मन संसाराला विटून विरक्त होत नाही. उलट तो क्रोधित होतो आणि त्यामुळे विचारांचे डोळेही मिटतात. पण, ‘‘दु:ख देखतांचि दृष्टीं। ज्यासी वैराग्यविवेकेंसीं उठी। तेणें छेदूनि स्नेहहृदयगांठी। पावे उठाउठी निजसुख।।२६४।।’’ दु:ख नुसते दृष्टीस पडताच ज्याच्या अंत:करणात विवेक आणि वैराग्य जागं होतं तो ममतेची गाठ तोडून आत्मसुखाला तत्काळ प्राप्त होतो. मग पिंगलेनं आळवणी केली की, ‘‘एवं दु:खकूपपतितां। हृदयस्थु भगवंतुचि त्राता। धांव पांव कृष्णनाथा। भवव्यथा निवारीं।।२८५।।’’ दु:खाच्या खोल विहिरीत पडलेल्या जीवाचा त्राता त्याचा हृदयस्थ भगवंतच आहे! तेव्हा हे हृदयनिवासी कृष्णा, तू आता धाव घे आणि मला पाव! दु:खाची विहीर कुठली आहे हो? तर भगवंतविन्मुख असलेलं आपलं अंत:करण हीच ती दु:खरूपी विहीर आहे, तोच भवसागर आहे! जेव्हा आपण भगवंतसन्मुख होऊ तेव्हाच ते अंत:करण आनंदानं व्याप्त होईल. ‘आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदचि अंग आनंदासी,’ हा अनुभव येईल. मग पिंगला त्या आत्मसुखात मग्न झाली. त्या हरिचरणाचं स्मरण वगळता, आता जाणण्यासारखं काही उरलंच नाही. काय करायला हवं, ते सत्य गवसलं होतं. संत तुकाराम महाराजांनी वर्णन केल्याप्रमाणे, ‘जाणावें ते काय नेणावें ते काय, ध्यावे तुझे पाय हें चि सार,’ हे पूर्णपणे उमगलं होतं. अनेक वर्ष भक्ती करून, ज्ञान कमावून, कर्माचरणात मग्न होऊनही नेमकं काय करावं, याबाबत गोंधळ असतो. अशांना तुकाराम महाराजांनी हे उत्तर दिलंय.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

– चैतन्य प्रेम

– चैतन्य प्रेम