खरं शाश्वत समाधान हे जर आपलं ध्येय असेल, तर त्याचा आधारही शाश्वतच असला पाहिजे. मग ते अखंड समाधान जो मला देऊ शकतो त्याच्यापाशीच मला जायला हवं. ते समाधान मिळविण्याचा मार्ग त्याच्याकडून समजून घ्यायला हवा. तशी कृती साधायला हवी. हे सारं खऱ्या सद्गुरूच्या सहवासाशिवाय शक्य नाही. त्या सद्गुरूशी ऐक्य कसं साधावं, याची चाचपणी गेली दोन वर्ष आपण केली. त्यासाठी आधारभूत होता तो ‘एकनाथी भागवत’ हा ग्रंथ. या ग्रंथाच्या प्रत्येक ओवीचं चिंतन करायचं तर एक तपसुद्धा लोटेल! त्यामुळे हा मागोवा परिपूर्ण नव्हताच. पण भगवंतासमोरच्या प्रसादपात्रातला एखादा कण ग्रहण करता आला तरी मन तृप्त होतं, तसा हा प्रसाद-कण आपण गोड मानून घ्यावा. महाराष्ट्रात विपुल संतसाहित्य आहे. नामदेवरायांचा अभंग विख्यात आहे. ‘‘ज्ञानराज माझी योग्यांची माउली। जेणें नियमवल्ली प्रकट केली।।’’ सद्गुरूभक्तीचा योग सांगणाऱ्या ज्ञानदेवांना योग्यांची आई म्हटलंय! या भक्तीची सूत्रं त्यांनीच ‘हरिपाठा’त प्रकट केली. माउलींनी आपल्या ग्रंथांतून ब्रह्मानंदलहरी प्रसवली, चैतन्यदीप उजळवला, भवसागरातील नौका जणू निर्मिली. आता नदी पार करायची आहे, नौकाही आहे, पण तिचा वापर केला पाहिजे ना? ‘भगवद्गीता जशी आहे तशी’च्या लाखो आवृत्त्या निघाल्या आहेत, पण गीतेनं जसं सांगितलं आहे तसं जगण्याची इच्छा असणारा एक तरी हवा ना? म्हणून याच अभंगात पुढे म्हटलंय की, ‘‘नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी। एक तरी ओंवी अनुभवावी!’’ सद्ग्रंथ खूप आहेत, पण कपाटबंद आहेत! या ग्रंथांची पारायणं अवश्य करावीत, पण आपण खरं परायण व्हावं, ही संतांची कळकळ आहे. त्या ग्रंथांतून एक तरी ओवी हृदयाला अशी भिडावी की आंतरिक जीवन बदलून जावं, अशी तीव्र प्रेरणा व्हावी! ‘सद्गुरू’ हे त्या प्रेरणेला भगवंतानं दिलेलं उत्तर आहे! त्या सद्गुरूमयतेचं माहात्म्य श्रीकृष्ण-उद्धव संवादाच्या निमित्तानं जनार्दनमय एकनाथांनी गायलं. पण हे सारं त्या एका सद्गुरू सत्तेचंच कार्य आहे, हा त्यांचा अढळ भाव आहे. या प्रक्रियेचे तीन टप्पे फार विलक्षण आहेत. ते म्हणतात, ‘‘धरोनि बालकाचा हातु। बाप अक्षरें स्वयें लिहिवितु। तैसा एकादशाचा अर्थु। बोलविला परमार्थु जनार्दने।।४९६।।’’ (‘एकनाथी भागवत’, अध्याय ३१). बापानं मुलाचा हात धरून लिहवून घ्यावं तसा हा ग्रंथ जनार्दनानं लिहवून घेतला! पण मूल लिहू लागलं की त्याला ज्ञातेपणाचा भ्रम होऊ शकतो. म्हणून मग, ‘‘जनार्दनें ऐसें केलें। माझें मीपण नि:शेष नेलें। मग परमार्था अर्थविलें। बोलवूनि बोलें निजसत्ता।।५००।।’’ माझा ‘मी’पणा सद्गुरू माऊलीनं पूर्ण नेला आणि मग आपल्या विराट सत्तेनं माझ्या माध्यमातून परमार्थ प्रकट केला. अखेर काय? तर, ‘‘खांबसूत्राचीं बाहुलीं। सूत्रधार नाचवी भलीं। तेवीं ग्रंथार्थाची बोली। बोलविली श्रीजनार्दनें।।५०१।।’’ कळसूत्री बाहुलीला जसं आपण नाचतोय की लढतोय, काही माहीत नसतं; तसा मी त्यांच्या वात्सल्याधीन झालो, माझ्या जीवनाची सूत्रं हाती घेऊन त्यांनी परमार्थ बोलवून आणि करवून घेतला! आपण जन्मापासूनच पराधीन आहोत. स्वाधीन व्हायचं असेल तर अधीन कोणाच्या राहायचं- प्रारब्धाच्या की परमार्थाच्या, हे ठरवावंच लागेल! हे उत्तर आपल्याला आणि मला शोधता येवो आणि तसं जगता येवो, ही करुणाब्रह्म सद्गुरू माऊलीच्या चरणीं प्रार्थना! आपला निरोप घेतो. जय जय रामकृष्णहरी!!             (समाप्त)

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा