नारायण म्हणजे नरदेहारूपी गृहात प्रकटलेला सद्गुरू. माणूस घरात राहातो, पण घर म्हणजे माणूस नव्हे. अगदी त्याचप्रमाणे मनुष्यदेहात आत्मतत्त्व राहाते, पण ते निर्लिप्त आत्मतत्तव म्हणजे देह नव्हे. पण माणूस मात्र स्वत:ला देहच मानतो आणि देहभावानंच वावरत असतो. अशा देहबुद्धीशी एकरूप झालेल्या माणसाला आत्मबुद्धीकडे वळविण्यासाठी त्याच नरदेहात सद्गुरू प्रकटतात. पण तो देह म्हणजे सद्गुरू नव्हे. सद्गुरूचं बाह्य़रूप म्हणजे सद्गुरू नव्हे. तर असा जो नरदेहरूपी अयन म्हणजे घरात प्रकटलेला नारायण अर्थात सद्गुरू आहे, त्याच्या अपरंपार भक्तीमध्ये बुडालेल्या नारदांनी व्यासांना भगवंताचं हृदगत्च असं भागवत रहस्य सांगितलं. त्या व्यासांनी ते भागवत शुकदेवांना ऐकवलं. शुक हा योग्यांचा योगी होता. हे शुद्ध परमज्ञान ऐकताच त्याची आंतरिक भावदशा कशी झाली? नाथ सांगतात, ‘‘तेणें शुकही सुखावला। परमानंदें निवाला। मग समाधिस्थ राहिला। निश्चळ ठेला निजशांती।। १५७।।’’ ते विशुद्ध ज्ञान ऐकून शुकही सुखावला. परमानंदानं त्याचं अंत:करणही निवालं. मग समाधी स्थिती ही त्याची सहजस्थिती झाली. त्यात तो मुरून गेला. अर्थात समत्व हाच त्याच्या धारणेचा पाया झाला. निश्चल अशी निजशांती त्याला प्राप्त झाली. समजा पर्वताच्या माथ्यावरून पाण्याचा झरा उमग पावला, तर तो त्याच जागी थांबून राहू शकत नाही. तो सतत पुढे पुढेच वेगानं प्रवाहित होत जातो. तसा शुद्ध ज्ञानाचा हा प्रवाह नारदांकडून व्यासांकडे आणि व्यासांकडून शुकांकडे जाऊन थबकला नाही. प्रवाह त्याची वाट शोधून काढतो आणि निर्माण करतो. जिथं त्या पाण्याला वाव असतो तिथं तो प्रवाह वळतो. तशी ज्याची मनोभूमिका शुद्ध आणि ज्ञानग्रहणासाठी तयार झाली होती, अशाकडे हा प्रवाह वळणं स्वाभाविकच होतं. मग शुकाच्या अंतरंगातून शुद्ध ज्ञानाचा तो प्रवाह आत्मज्ञान प्राप्तीसाठी खरी आंतरिक तळमळ असलेल्या राजा परीक्षितीकडे वळला. राजा परीक्षितीचा अधिकार एकनाथ महाराज सांगतात की, परीक्षिती हा धर्मराजापेक्षाही धैर्यवान होता. कारण कृष्ण असेपर्यंत धर्मराजा राहिला, पण कृष्णाच्या अवतारसमाप्तीनंतर कलीच्या भयानं तो पळून गेला. उलट परीक्षितीनं कलीचीच कोंडी करून राज्य केलं. रूपकार्थानंही या ओव्यांचा विचार करता येतो. सद्गुरूचं अस्तित्व जोवर अंतरंगात उरतं, तोवर कलीचा प्रभाव म्हणजेच अशाश्वताच्या ओढीचा प्रभाव टिकू शकत नाही. ते अस्तित्व संपताच खरा धर्मही अस्तंगत होतो. कारण मग अधर्मालाच धर्माचं रूप येतं. म्हणूनच तर भगवान श्रीकृष्णांनी आपल्या अवताराचं एक कारण ‘धर्मसंस्थापनार्थाय’ असं सांगितलं आहे! इथं धर्म म्हणजे विशिष्ट नामरूपाचा धर्म नव्हे, तर माणसाची धारणा शुद्ध करणारा धर्मच सद्गुरू पुनरूज्जीवित करतात, हा अर्थ आहे. तर सद्गुरू बोध म्हणजेच शाश्वताचा बोध धर्माच्या चौकटीतूनही जेव्हा ओसरतो तेव्हा धर्मातही अशाश्वत गोष्टींचीच महती वाढते. तो कलीप्रवृत्तीला शरण जातो, पण जो परीक्षिती असतो, जो सार काय आणि नि:सार काय, सत्य काय-असत्य काय, शाश्वत काय-अशाश्वत काय, हा शुद्ध विवेक करतो तो धर्मापेक्षा धैर्यवान ठरतो! कारण तो खरा धर्मच मांडत असतो!!
३९. धर्म आणि परीक्षिती
उलट परीक्षितीनं कलीचीच कोंडी करून राज्य केलं. रूपकार्थानंही या ओव्यांचा विचार करता येतो.
Written by चैतन्य प्रेम
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 22-02-2019 at 03:02 IST
मराठीतील सर्व एकात्मयोग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta ekatmyog article number %e0%a5%a9%e0%a5%af