ऋषीपुत्राच्या शापाचा मोठय़ा आनंदानं स्वीकार करून राजा परीक्षिती गंगेच्या किनारी मोक्षदायक असं भगवंताचं रहस्य ऐकायला बसला आहे. गंगा म्हणजे लोककल्याणार्थ स्वर्गातून अवतरलेली आणि जी पेलवण्याचं सामर्थ्य पृथ्वीत नसल्यानं शिवानं जिला प्रथम आपल्या मस्तकी धारण केलं ती ही गंगा! किती मनोहर प्रतीक आहे हे! गंगा म्हणजे विशुद्ध ज्ञानाचा प्रवाह. तो धारण करणं सामान्य जिवाच्या आवाक्यात नाही. जो शिव म्हणजे ‘स: ईव’ अर्थात परमात्ममय झाला आहे, तोच तो प्रवाह आपल्या मस्तकी धारण करू शकतो. परीक्षितीची आंतरिक स्थिती कशी होती? नाथमहाराज सांगतात, ‘‘अंगीं वैराग्यविवेकु। ब्रह्मालागीं त्यक्तोदकु। तया देखोनि श्रीशुकु। आत्यंतिकु सुखावला।।१६५।।’’ अंगामध्ये विवेक आणि वैराग्य, ब्रह्मप्राप्तीसाठी सर्वस्वावर उदक सोडलेलं, म्हणजे सर्वस्वाचा त्याग केलेला अशा त्या परीक्षितीला पाहून शुकांना अत्यंत आनंद वाटला. जो खरा ज्ञानी असतो, त्याला सर्वाधिक आनंद कधी वाटतो माहीत आहे? खऱ्या ज्ञानाचा वारसा ज्याच्याकडे देता येईल, असा कुणी जेव्हा त्याला भेटला ना, तर आणि तेव्हाच खऱ्या ज्ञान्याला अत्यंत आनंद वाटतो. परीक्षितीची अंतरंग वैराग्य आणि विवेकपूर्ण स्थिती पाहून शुकांना म्हणूनच आनंद वाटला. कारण आपण जे ज्ञान देऊ ते तो केवळ शब्दार्थानं ग्रहण करणार नाही, तर अनुभवानं जगण्यात उतरवील, याची खात्री त्याला होती. ‘चतु:श्लोकी भागवता’त भगवंतानं त्याची प्राप्ती कोणा-कोणाला होऊ शकत नाही, ते सांगितलं आहे. त्यात म्हटलं आहे की, ‘‘सत्य कापुसाचीं वस्त्रें होतीं। परी कापूस नेसतां नागवे दिसती। तेवीं शब्दविज्ञानस्थिती। त्यां शाब्दिकां अंतीं अपरोक्ष कैचें।।’’ म्हणजे कापसापासूनच वस्त्रं तयार होतात, हे खरं. पण म्हणून एखाद्यानं कापूसच अंगाला लगडण्याचा प्रयत्न केला, तर त्याला नागवंच म्हटलं जाईल. तो कापूस काही त्याच्या अंगावर टिकणार नाही ना? अगदी त्याचप्रमाणे शाब्दिक ज्ञान हे खऱ्या ज्ञानाचा संकेत असलं, त्या ज्ञानाच्या प्रांतात नेणारी एक पायरी असलं, तरी केवळ शाब्दिक ज्ञानानं स्वत:ला लपेटून कुणी ज्ञानी होऊ शकत नाही! ते शाब्दिक ज्ञान म्हणजे काही प्रत्यक्ष अनुभवगर्भित ज्ञान नव्हे. प्रत्यक्ष ज्ञान नव्हे. ते अपरोक्षच आहे. कुणीतरी सांगितलेलं आणि मी घोकून ते पाठ केलेलं आहे. त्याला ज्ञानाचा दर्जा नाही. मग अंगाला चिकटवलेला कापूस जसा टिकणार नाही, तसं ते शाब्दिक ज्ञानही प्रसंग येताच टिकणार नाही. आव्हानात्मक प्रसंगात शाब्दिक ज्ञानाचा डोलारा कोसळून जाईल. ज्ञानाच्याही काही व्याख्या नाथांनी ‘चतु:श्लोकी भागवता’त केल्या आहेत. त्यात एक व्याख्या अशी : ‘‘शास्त्रव्युत्पत्ती व्याख्यान। जालिया वेदांतश्रवण। त्यावरी उठी जें जाणपण। त्या नांव ज्ञान शास्त्रोक्त।।’’ म्हणजे शास्त्रात काय म्हटलं आहे, अमक्यात काय-तमक्यात काय म्हटलं आहे, त्याची व्युत्पत्ती काय आहे, यावरची व्याख्यानं ऐकली, वेदांताचं श्रवण केलं, त्यानंतर जी जाण निर्माण होते, तीच फक्त ज्ञान आहे! आगीला हात लावल्यानं चटका बसतो, हे पाठ केलं, पण प्रत्यक्ष आग दिसताच तिला हात लावला, तर त्या ऐकीव ज्ञानाचा उपयोग झाला नाही. पण तरीही चटक्याचा अनुभव आल्यानं जाण वाढली आणि पुढच्या खेपेस आगीला हात लागला नाही, तर आगीला स्पर्श केला, तर चटका बसतो, याचं ज्ञान खऱ्या अर्थानं झालं, असं म्हणता येतं.
– चैतन्य प्रेम