चैतन्य प्रेम
जो दान करतो त्याला आणि ते स्वीकारतो त्यालाही दानाचा लाभ आहे. याचकाला धनप्राप्ती होते आणि दात्याला पुण्य मिळतं, असा दानाचा ढोबळ लाभ आपण गृहीत धरतो. पण दानाचा खरा लाभ याहीपलीकडचा आणि अतिशय सूक्ष्म आहे. दानाचा उभय बाजूंनी जो खरा लाभ आहे तो ‘भिक्षुगीते’नं सांगितला आहे. गेल्या भागात आपण तो पाहिलाच आहे. दान, स्वधर्म पालन म्हणजे जन्मजात वाटय़ाला आलेली कर्तव्यर्कम पार पाडणं; नियम, यम, वेदाध्ययन म्हणजेच संकुचिताच्या जाळ्यातून सोडवणारं आणि व्यापक करणारं शुद्ध ज्ञान आत्मसात करून आचरणात आणणं; सत्कर्म म्हणजे इतरांचं हित साधणारी र्कम निरपेक्ष भावनेनं करणं आणि आत्मसंयमाचं श्रेष्ठ व्रत; या सर्व गोष्टींचं अंतिम फळ मन एकाग्र होणं, हेच आहे, असं हा श्लोक स्पष्टपणे सांगतो (दानं स्वधर्मो नियमो यमश्च, श्रुतं च कर्माणि च सद्व्रतानि। सर्वे मनोनिग्रहलक्षणान्ता:, परो हि योगो मनस: समाधि:।।४६।।). म्हणजे इथं पहिल्याच पायरीवर सांगितलं आहे- ते दान आणि हे सारं कशासाठी आहे? तर मनाच्या एकाग्रतेसाठी आहे! यामागे फार सूक्ष्म अर्थ आहे बरं. आपल्या जन्माचं मूळ कारण काय हो? श्रीतुकाराम महाराज म्हणतात, ‘‘जन्माचे ते मूळ पाहिले शोधून। दु:खासी कारण जन्म घ्यावा!’’ आपल्या जन्माचं कारण दु:खं भोगणं, हेच आहे! आता नकारात्मक अंगानं हे घेऊ नका बरं. आपल्या जगण्याचं थोडं निरीक्षण करा. आपल्या मनात इच्छेचा जन्म का होतो? तर जे आपल्यापाशी नाही आणि जे मिळाल्यानं ‘मी’ सुखी होईन, असं वाटतं ते मिळवावं, हेच इच्छेचं मूळ आहे. दु:ख लाभावं यासाठी तर कुणी कोणतंही कर्म करीत नाही! तेव्हा सुखाची आशा, हेच इच्छेमागचं एकमेव कारण असतं. पण प्रत्येक इच्छा काही पूर्ण होत नाही. गंमत अशी की, पूर्ण झालेल्या इच्छांच्या तृप्तीपेक्षा, सुखापेक्षा अपूर्ण इच्छांची अतृप्ती, दु:खच फार मोठं असतं. त्या अपूर्त इच्छाच पुन्हा जन्माचं कारण बनतात. आधीच अपूर्त इच्छांच्या दु:खाचं ओझं असताना नव्या जन्मांत नव्या अनंत इच्छांचा पसारा मांडला जातो. तर असा हा खेळ आहे आणि त्याच्या मुळाशी आहे सतत काही ना काही हवं असण्याची वृत्ती, अर्थात हाव! श्रीगोंदवलेकर महाराज यांची व्याख्या आहे की, ‘‘ज्याचं हवेपण अधिक तो गरीब!’’ किती खरं आहे पाहा. एखाद्या कोटय़धीशाची हावही शमत नसेल तर तो समाधानाच्या बाजूनं गरीबच आहे हो! अशी जन्मजात हाव असलेलं मन एकाग्र होणं सोपी का गोष्ट आहे? अहो, जे आपल्यापाशी नाही त्याच्या प्राप्तीसाठी जीव सतत तळमळत असताना मन एकाग्र होईल का? तर, निश्चित नाही. ते एकाग्र करायचं असेल, तर ती हाव, ती तळमळ ओसरली पाहिजे. अशा तळमळत असलेल्या मनाच्या एकाग्रतेसाठी पहिली पायरी आहे दान! पण त्यासाठी दानाचा आणि दातृत्वाचा खरा अर्थही समजला पाहिजे. खरा दाता आणि खरं दातृत्वही समजलं पाहिजे. खरा दाता भगवंतच आहे. कारण त्यानं जन्म दिला आहे. त्याच्याहीपेक्षा मोठा दाता आहे तो सद्गुरूच! कारण त्यानं जगायला शिकवलं आहे!! श्रीतुकाराम महाराज म्हणतात, ‘‘दाता तो एक जाणा। नारायणा स्मरवी।।’’ नारायणाचं स्मरण घडविणारा सद्गुरूच खरा एकमेव दाता आहे. आता या ‘नारायणा स्मरवी’च्या दोन अर्थछटा आहेत बरं! ज्याच्या रूपात नारायणाचं स्मरण होतो तो आणि जो माझ्यातील नारायणाचं स्मरण करून देतो तो; असे हे दोन अर्थ आहेत.