चैतन्य प्रेम chaitanyprem@gmail.com

विरक्त योगी शुक हे परीक्षितीला जी कथा ऐकवणार आहेत आणि जी मनाच्या मस्तकावर पाय देऊन आणि कान अंतर्मुख करून तो ऐकणार आहे ते आहे कृष्णावताराचं लीलाचरित्र! या लीलेचं विलक्षण वेगळेपण नाथांनी दहा ओव्यांत मांडलं आहे. हे दहा ओव्यांतलं कृष्णचरित्रच आहे म्हणा ना! या ओव्या अशा : ‘‘बहुतीं अवतारीं अवतरला देवो। परी या अवतारींचा नवलावो। देवां न कळे अभिप्रावो। अगम्य पहा हो हरिलीला।। १८७।। उपजतांचि मायेवेगळा। वाढिन्नला स्वयें स्वलीळा। बाळपणीं मुक्तीचा सोहळा। पूतनादि सकळां निजांगें अर्पी।। १८८।। मायेसि दाविलें विश्वरूप। गोवळां दाविलें वैकुंठदीप। परी गोवळेपणाचें रूप। नेदीच अल्प पालटों।। १८९।।  बाळ बाळियांतें मारी। अचाट कृत्यें जगादेखतां करी। परी बाळपणाबाहेरी। तिळभरी नव्हेचि।। १९०।। ब्रह्म आणि चोरी करी। देवो आणि व्यभिचारी। पुत्र कलत्र आणि ब्रह्मचारी। हेही परी दाखविली।। १९१।। अधर्मे वाढविला धर्म। अकर्मे तारिलें कर्म। अनेमें नेमिला नेम। अति नि:सीम निर्दृष्ट।। १९२।। तेणें संगेंचि सोडिला संगु। भोगें वाढविला योगु। त्यागेंवीण केला त्यागु। अति अव्यंगु निर्दोष।।१९३।। कर्मठां होआवया बोधु। कर्मजाडय़ाचे तोडिले भेदु। भोगामाजीं मोभपदु। दाविलें विशदु प्रकट करूनि।। १९४।। भक्ति भुक्ति मुक्ति। तिन्ही केलीं एके पंक्ती। काय वानूं याची ख्याति। खाऊनि माति विश्वरूप दावी।।१९५।। त्याचिया परमचरित्रा। तुज सांगेन परमपवित्रा। परी निजबोधाचा खरा। या अवतारीं पुरा पवाडा केला।।१९६।। ’’ भगवंताचे अनेक अवतार झाले, पण या अवताराची नवलाई काही वेगळीच आहे. या अवताराचं रहस्य देवांनाही कळत नाही इतकी ही हरिची लीला अगम्य आहे. तो उपजला तोच मायेपासून वेगळा झाला. म्हणजे देवकीनं जन्म दिला, पण तात्काळ जन्मदात्या मायेला त्यागून तो यशोदेच्या घरी आला! तिथं तो आपल्याच लीलाबळानं वाढला. इतकंच नाही, तर पुतना आदि राक्षसांना त्यानं मोक्षाचा सोहळा भोगावयास दिला. त्यानं आपल्या मुखात यशोदेला विश्वरूपाचं दर्शन घडवलं, गोपाळांना थेट वैकुंठाचंच सुख दिलं आणि तरीही आपलं गवळीपणाचं रूप यत्किंचितही ढळू दिलं नाही. हाच बालकृष्ण कंसाचा मृत्यू आहे हे कळल्यावर आणि त्याला नेस्तनाबूत करणं ही तर अगदी तुच्छ गोष्ट आहे, या भावनेनं त्याला मारण्यासाठी जे जे बलाढय़ राक्षस विविध अक्राळविक्राळ रूपं घेऊन आले त्यांना या बालरूपातील कृष्णानं पुरतं नामोहरम केलं. त्यांच्या प्राणांचंही हरण केलं. एवढी अचाट कृत्यं जगासमोर उघडपणे करूनही त्यानं आपलं बाळपणाचं रूप काही सोडलं नाही! साक्षात परब्रह्म अशा या कृष्णानं गोपींच्या घरी दही-लोणी चोरलं, देव असून व्यभिचारी असल्याचं भासवलं, बायकामुले असूनही ब्रह्मचारी असल्याचंही सिद्ध केलं, अधर्माच्या वाटेनं धर्म वाढवला, अकर्मी असूनही कर्माना आधार दिला, त्याच्या संगानं सर्वसंगपरित्याग साधला, भोगानं योग वाढविला, त्यागाशिवाय अत्यंत अव्यंग, निर्दोष असा त्याग साधला.. अहो या प्रत्येक ओवीला कृष्णचरित्रात अनेक प्रसंगांचा आधार आहे आणि या प्रत्येक ओवीचं चिंतनही करावं तेवढं थोडंच आहे. पण आपल्याला कालमर्यादा आहे.

 

Story img Loader