खरं पाहता सामान्य माणूस हा जन्मापासून जगाचाच भक्त असतो. दृश्य जग त्याला नि:संशय खरं वाटतं आणि त्यामुळे या जगावर त्याचा विश्वास असतो. या जगाचा मानसिक, भावनिक आणि शारीरिक आधार घेत तो जगत असतो. त्याच्या या खेळात मग खऱ्या सद्गुरूच्या रूपानं तो परमात्माच सहभागी होतो! आता इथं ‘एकनाथी भागवत’ या सद्ग्रंथातील ओवीचं बोट आपण पकडणार आहोत. ही ओवी म्हणते, ‘‘सर्व प्रतिमांचें पूजन। करितां मज पूजा समान। भक्तांची जेथ प्रीति गहन। तियेअधीन मी परमात्मा।।३६६।।’’ (अध्याय २७). वरकरणी पाहता विविध दैवतांच्या पूजनाच्या संदर्भात ही ओवी आहे, असं जाणवतं. पण ज्यांच्या मनात जगाचीच भक्ती आहे, तसंच ‘मी’ आणि ‘माझे’च्या परिघातील आवडत्या व्यक्तींचं ‘पूजन’ ज्यांच्या मनात अखंड सुरू असतं, त्यांनाही ही ओवी लागू आहे! आता या आवडत्या व्यक्ती म्हणजे आपल्या स्वार्थास पूरक आणि पोषक व्यक्तीच असतात. परमात्म्याचाच अंश असलेल्या जीवाची जगावरची प्रीती फार चिवट असते. ती सहजी तोडता येत नाही. त्यासाठी त्याच्या या खेळात खऱ्या सद्गुरूच्या रूपानं तो परमात्माच सहभागी होतो! एकनाथ महाराज सांगतात, ‘‘जेवीं बाळकाचेनि मेळें। माता तदनुकूल खेळे। तेवीं भक्तप्रेमाचिये लीळें। म्यां चित्कल्लोळें क्रीडिजे।।३६७।।’’ आता, माणूस दुसऱ्यावर प्रेम करतो ते कशासाठी? तर तो अशाच माणसांवर अधिक वा विशेष प्रेम करतो, जी व्यक्ती त्याला भासणारी उणीव भरून काढत असते. प्रत्येक माणसाला आर्थिक वा भौतिकच नव्हे, तर मानसिक, भावनिक व बौद्धिक पातळीवरही आपल्यातील अपूर्णत्वाची जाणीव होत असते. ज्या व्यक्तीत याबाबतीत अपूर्णता नाही, असं त्याला वाटतं अशा व्यक्तीशी नातं जोडायला, मैत्री करायला माणूस उत्सुकच असतो. म्हणजे पूर्णत्वावर त्याचं खरं प्रेम असतं. माणसाला जीवनात पूर्ण समाधान, पूर्ण सुख, पूर्ण शांती हवी असते. पण अपूर्ण माणूस दुसऱ्या अपूर्ण माणसाला पूर्ण करू शकत नाही. पूर्णत्व हा केवळ भगवंताचाच गुण आहे. हे हळूहळू उमगू लागलं की एका भगवंताचीच आस लागते. पण ही अतिशय दीर्घ व कठीण प्रक्रिया पार पाडताना सद्गुरूला आईच व्हावं लागतं. आई जशी बालकाच्या कलानं खेळते, तसं भक्ताला पचेल, पटेल, रुचेल, पेलेल अशा पद्धतीनं सद्गुरू जीवनातील प्रत्येक बऱ्या-वाईट प्रसंगात भक्ताला अशाश्वताच्या ओढीतली घातकता जाणवून देत असतो आणि शाश्वताकडे वळवत असतो. सद्गुरूनं ज्याला आपलं मानलं त्याला तो पूर्णत्वाचा वारसा दिल्याशिवाय राहात नाही; मग तो माणूस कसाही असो! नाथांचा एक अभंग आहे; ते म्हणतात, ‘‘संतांचे ठायीं नाहीं द्वैत-भाव। रंक आणि राव सारिखा चि।। संतांचे देणें अरि-मित्रां सम। कैवल्याचें धाम उघडें तें।। संतांची थोरीव वैभव गौरव। न कळे अभिप्राय देवासी तो।। एका जनार्दनी करी संत-सेवा। पर-ब्रह्म ठेवा प्राप्त झाला।।’’ सद्गुरूंकडे दुजेपणाचा भाव, भेददृष्टी नाही. त्यांना दरिद्री आणि श्रीमंत सारखेच आहेत. त्यांचं देणंही सर्वाना सारखंच आहे. त्यांच्यापाशी कोणी प्रेमभावानं जावो की द्वेषभावानं जावो; दोघांशी त्यांचा व्यवहार सारख्याच वात्सल्याचा असतो. त्यांची थोरवी, महत्त्व, वैभव देवालादेखील माहीत नाही. एकनाथ महाराज म्हणतात, अशा सद्गुरूंच्या बोधाचं सेवन आणि आचरण जो करतो त्यालाच हा एकात्मयोग साधतो. त्या अखंड ऐक्य जाणिवेनंच आत्मस्वरूपाचं खरं भान येतं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

– चैतन्य प्रेम

– चैतन्य प्रेम