या जगात अशी कोणती गोष्ट आहे जी माझा गुरू देऊ शकत नाही? मला काही वर नको, असं उत्तर विश्वेश्वर शंकरानं कधी ऐकलंच नव्हतं! तो आग्रहानं म्हणाला, ‘‘काही तरी मागच. मी असाच जाणार नाही.’’ संदीपकाच्या भोळ्या मनात आलं, आपल्याला काही नको. पण गुरुजींचं प्रारब्ध नष्ट झालं तर? त्यांचा त्रास तरी वाचेल! तो म्हणाला, ‘‘थांब, मी माझ्या गुरुजींची परवानगी घेऊन येतो.’’ धावतच तो सद्गुरूंकडे गेला. जे घडलं ते सांगितलं आणि मनातला विचारही सांगितला, मात्र गुरुजी खवळले. म्हणाले, ‘‘म्हणजे तुला सेवेचा त्रास होतोय किंवा कंटाळा आलाय तर. म्हणजे शेवटी तुझ्या सोयीचं तेच मागून वर माझ्यासाठी मागत आहेस असं दाखवतोस? अरे या जन्मी हे प्रारब्ध टळेल, पण तेवढय़ासाठी पुन्हा जन्मावं लागेल त्याचं काय?’’ दीपक कळवळला. गुरुजींचे पाय धरून स्फुंदत म्हणाला, ‘‘चुकलं माझं. हे माझ्या लक्षातच आलं नाही.’’ तसाच परत गेला आणि विश्वेश्वराला म्हणाला, ‘‘मला काही नको.’’ त्या रात्री ब्रह्मा-विष्णु आणि महेश यांच्यात दीपकाच्या गुरुभक्तीची चर्चा रंगली. त्या तिघांनी प्रकट होऊन दीपकाला वर मागायला सांगितलं. तरीही दीपक ढळला नाही. अखेर त्यांचा आग्रह पाहून म्हणाला, ‘‘माझ्याकडून अखेरच्या श्वासापर्यंत गुरुसेवेत कुचराई होणार नाही, असा वर द्या!’’ या मागण्यानं त्रिदेवच प्रसन्न झाले असं नव्हे, तर सद्गुरूही प्रसन्न झाले. त्यांचं दे दुखणं कुठल्याकुठे पळालं. त्यांचा देह पूर्वीसारखाच कांतिमान झाला. तेव्हा कथा त्याच असतात, आपली दृष्टी बदलली की त्यांचं मोल कळू लागतं. त्या कथा, भक्तांची ती चरित्रं आपल्या चित्तावर संस्कार करू लागतात. ते भक्त आपला आदर्श बनतात. तसे आपण होऊ शकत नाही, हे खरं. पण तसं व्हावं, अशी इच्छा तर निर्माण होते! स्वामी स्वरूपानंदही म्हणत ना? की ध्येय हे नेहमीच दूरवर दिसत असावं आणि त्या ध्येयपथावर चालण्यात आनंद वाटावा! हे ध्येयपथावरचं जे चालणं आहे ना, तेदेखील ध्येयप्राप्तीइतकंच महत्त्वाचं आहे. कारण त्यात निष्ठेचा कस आहे, अंतरंगातील भावनेचं पोषण आहे, चित्तशुद्धीचा संस्कार आहे, ज्ञानदृष्टीचा विकास आहे, आत्मजाणिवेचा प्रत्यय आहे. ध्येयपथावरचे हे सर्व संस्कार देव आणि सद्गुरू करीत असतात. देव आणि सद्गुरु यांच्यातलं नातं फार गूढमनोहर आहे. नाथ सांगतात, ‘‘देवो गुरुआज्ञा स्वयें मानी। तंव गुरु देवासी पूज्यत्व आणी। एवं उभयतां अभिन्नपणीं। भावार्थियांलागोनी तारक।। ४९६।।’’ देव स्वत: सद्गुरूंचा शब्द खाली पडू देत नाहीत आणि सद्गुरूही देवाची महती वाढवत असतात. याप्रकारे दोघं अभिन्नपणे भक्तांमध्ये भावसंस्कार करीत त्यांना तारत असतात. पण याच ध्येयपथावर असेही काही जण असतात, ज्यांच्या अंतरंगात खरी शुद्ध भक्ती नसते, नव्हे तिची त्यांना इच्छादेखील नसते. त्यांचं काय होतं? नाथ सांगतात, ‘‘सद्भावो नाहीं अभ्यंतरीं। बाह्य़ भक्ति भावेंचि करी। ते भावानुसारें संसारीं। नानापरी स्वयें ठकती।।४९७।।’’ अंत:करणात सद्भाव नसताना जे बाहेरून भक्तीचं सोंग वठवतात ते आपल्या खऱ्या अशाश्वत प्रपंचाच्या ओढीत गुंतलेल्या भावनेला अनुसरून स्वत:च स्वत:ची फसवणूक करीत राहातात. या जगात गटांगळ्या खात राहातात! म्हणजे चाकरी कामाची करतात, पण पगार रामाकडे मागतात, अशांना राम पगार का देईल? त्यांचं मागणं का पुरवील?
चैतन्य प्रेम