सद्गुरू ज्या जिवाकडे कृपादृष्टी टाकतात त्याचं भवसंकट ओसरतं आणि त्याच्या डोळ्यापुढे सद्गुरू रूपात परमतत्त्व प्रकाशमान होतं. त्यानं नित्य निज उल्हासानं त्याचं अंत:करण भरून राहातं. मग अशाला साधनचतुष्टय़ाची आटाआटी करावी लागत नाही. शास्त्रार्थ जाणून घेण्याची धडपड करावी लागत नाही. केवळ सद्गुरूवर एक विश्वास पुरेसा असतो. त्यानं ते शिष्यालाही स्वयंप्रकाशित करतात! (ते पाहती जयांकडे। त्यांचें उगवे भवसांकडें। परब्रह्म डोळियांपुढें। निजनिवाडें उल्हासे।। तेथें साधनचतुष्टय़सायास। न पाहती शास्त्रचातुर्यविलास। एक धरिला पुरे विश्वास। स्वयें प्रकाश ते करिती।। ४०-४१।।) आता सद्गुरूंची कृपादृष्टी म्हणजे काय? त्यांचं पाहणं कसं असतं? ‘अभंगधारा’त त्याचंही विवेचन येऊन गेलं आहे. त्यात आरशाचं एक उदाहरण होतं. समजा आपल्याला आपला चेहरा स्वच्छ आहे की नाही, हे पाहायचं असेल, तर आपण आरशात पाहतो. जर चेहऱ्यावर कुठे काही डाग लागला असेल, तर तो आरशात पाहून पुसतो. खरं पाहता, आपण आरशात पाहात असतो, पण आरसा पाहात नसतो! आरशात आपण आपल्यालाच पाहात असतो. त्यावेळी आरशाचं पटल, त्याची चौकट हे सगळं दिसत असूनही दिसत नसतं. अगदी त्याचप्रमाणे सद्गुरूही शिष्याला पाहातात ते स्वत:लाच पाहातात! मग आरशात पाहून आपण आपल्या चेहऱ्यावरचा डाग जसा दूर करतो, तसं आपल्याला पाहताना ते आपल्यातला दोष दूर करतात! तेव्हा ते ज्यांच्याकडे पाहातात त्यांचं भवसंकट दूर होतं. कारण ते ज्याच्याकडे पाहातात त्याच्यातलं अज्ञान, भ्रम, मोह नष्ट करून टाकतात. मग संकट कुठून उरलं? ‘मी’ आणि ‘माझे’ हाच सर्व आसक्तीचा आणि त्यामुळे संकटांचा, दु:खांचा उगम आहे. त्याचाच निरास होऊ लागणं म्हणजे भवसागरच ओसरू लागणं. एकदा अज्ञान ओसरू लागलं, अज्ञानाची पकड सुटू लागली, त्याचा प्रभाव कमी होत गेला की मग सद्गुरूचं खरं व्यापक रूप जाणवू लागतं. हेच उघडय़ा डोळ्यानी होणारं परब्रह्माचं दर्शन! मग जेव्हा मन, चित्त, बुद्धी हे सारं सद्गुरू बोधाशी एकरूप होऊ लागतं तिथं आनंदाशिवाय काय उरणार? मग वेगळ्या साधन खटाटोपाची काय गरज उरली? शास्त्रचर्चेत डोकं घालण्याची काय गरज उरली? केवळ एकावर विश्वास साधला तर आत्मप्रकाशही पसरू लागतो. हे सज्जन अर्थात सद्गुरू कसे आहेत? त्याचं वर्णन करताना नाथांची प्रेमप्रतिभा अगदी ओथंबून आली आहे. ते तापत्रयानं त्रस्त आणि संतप्त जनांना निवविण्याकरिता स्वानंदाची अविरत वृष्टी करणारे चिदानंदाचे घनच आहेत. (आतां वंदूं ते सज्जन। जे कां आनंदचिद्घन। वर्षताती स्वानंदजीवन। संतप्त जन निववावया।। ३५।।). सद्गुरूंच्या कारुण्यमूर्ती स्वरूपाचं वर्णन करताना नाथांची शब्दकळा अधिक हळवी होते आणि ते म्हणतात, ‘‘कीं ते भूतदयार्णव। कीं माहेरा आली कणव!’’ ते दयेचे सागर आहेत, एवढंच सांगून नाथ थांबत नाहीत. तर कणव जणू तिच्या माहेरी आली आहे, असं ते सांगतात! म्हणजेच ती कणवच जर इतकी सर्वव्यापी असेल, तर ती तिच्या माहेरी, तिच्या मूळ स्थानी किती विराट, उदात्त असेल, याची कल्पना करा! या संतसज्जनांची अर्थात सद्गुरूंची सर्वात मोठी ओळख कोणती? नाथ सांगतात, ‘‘सूर्य सदा प्रकाशमान। अग्नि सदा देदीप्यमान। तैसे संत सदा सावधान!’’ ही ओळख आहे सावधानता!
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा