अभावग्रस्त जीव परमभावाचा स्रोत असलेल्या सद्गुरूपाशी गेला आणि अभावाचाच अभाव झाला! अर्थात तो पूर्ण झाला. आधी भक्त संदेहग्रस्त होता तो नि:संदेह अशा सद्गुरूपाशी गेला आणि त्याच्या मनातला संदेहच निमाला. सद्गुरूतत्त्वाबाबतचा विस्मयही लोपला. ‘अशक्य ते शक्य करतील स्वामी,’ असा सद्गुरूबद्दलचा अनुभव आला. या जगातली सर्वात अशक्य गोष्ट म्हणजे मनाच्या सवयींचा पालट! तो आपल्या अंतरंगात घडून येताना शिष्याला दिसून आलं. आपण आपल्यातच बदल घडवू शकतो, यापेक्षा जगातला मोठा चमत्कार नाही. त्यामुळे आधी सद्गुरूंच्या व्यापकतेबद्दल, सर्वसाक्षित्वाबद्दल, सर्वात्मकतेबद्दल, सर्वज्ञतेबद्दल जो विस्मय वाटत होता तो उरला नाही. बरं हे सगळं सद्गुरू करतात ते बाजार मांडण्यासाठी नाही. बाजार मांडण्यासाठी आणि वाढविण्यासाठी जे अशा लीलांचा आभास निर्माण करतात त्यांचं खरं स्वरूप उघड झाल्याशिवाय राहात नाही. खऱ्या सद्गुरूला लोकप्रियतेची आणि लोकरंजनाची लेशमात्र आवड नसते. त्यामुळे तो आपल्या सर्वात्मकतेचा अनुभव शिष्याला देतो तो त्याच्या आत्मविकासाला आवश्यक असेल तेवढाच असतो. शिष्याला तो अनुभव पचवता आला नाही, तर मग तसा अनुभव परत दिला जात नाही. तेव्हा  ‘‘अभावो भावेंशी गेला। संदेह नि:संदेहेशी निमाला। विस्मयो विस्मयीं बुडाला। वेडावला स्वानंदु।। ’’  ही स्थिती होते आणि मग.. ‘‘तेथ आवडीं होय भक्तु। तंव देवोचि भक्तपणाआंतु। मग भज्य भजनांचा अंतु। दावी उप्रांतु स्वलीला।। ८५।।’’ मग परस्परांची आवड हीच भक्त बनते! भक्त देवाचा भक्त असतोच, पण देवही भक्ताचा भक्त होतो!! भक्ताच्या आतमध्ये देवच व्याप्त असतो आणि तो भक्ताच्या माध्यमातून आपली भक्ती करण्याच्या निमित्ताने भक्तावरच कृपेचा आणि वात्सल्याचा अखंड वर्षांव करीत त्याची भक्ती करू लागतो! ‘जेथे जातो तेथे तूं माझा सांगाती, चालविसी हाती धरूनिया,’ ही स्थिती होते याचं कारण देवालाच भक्तावाचून करमेनासं होतं. त्यामुळे जिथं जिथं भक्त जातो तिथं तिथं पावलोपावली देवही धावत असतो. त्याचा हात धरून त्याला चालवत असतो. म्हणजे त्याचं सर्व कर्तेपण आपल्याकडे घेऊन आपण श्रमून त्याची वाटचाल निर्धोक करीत असतो. काय रसाळ आंतरिक भावस्थिती आहे! मग भजन, भजन करणारा आणि ज्याचं भजन आहे तो असा काही भेदच उरत नाही. कोण कुणाला भजत आहे, कोण कुणाचं भजन करीत आहे, काहीच कळेनासं होतं. भक्ताचं सर्वस्व भगवंतच होतो आणि हा भगवंत मग या उपरांत स्वलीला घडवत असतो. भक्ताच्या चरित्रात होणारी प्रत्येक लीला हा भगवंताच्याच लीलाचरित्राचा अभिन्न भाग होऊन जातो. प्रल्हादानं भगवंताची भक्ती केली त्या विष्णूचं चरित्र प्रल्हादाच्या कथेत आहे का हो कुठे? पण प्रल्हादाच्या जीवनातला एकतरी प्रसंग विष्णूच्या स्मरणाशिवाय आहे का? प्रल्हादाच्या जीवनातले प्रसंग ऐकताना भगवंताच्या स्मरणाचा प्रवाहच अखंड वाहता असतो ना? तेव्हा भक्ताच्या जीवनात भगवंत भरून असतो. भक्ताच्या जीवनातल्या प्रत्येक प्रसंगात भगवंताचीच शक्ती विलसत असते. या ऐक्याचं परमोच्च दर्शन घडवताना एकनाथ महाराज सांगतात, ‘‘देवो देवपणें दाटला। भक्तु भक्तपणें आटला। दोहींचाही अंतु आला। अभेद जाहला अनंतु।। ८९।।’’

चैतन्य प्रेम

Story img Loader