देव आणि भक्ताची परमोच्च विलोभनीय अभेद स्थिती एकनाथ महाराज उलगडत आहेत. ते म्हणतात, ‘‘देवो देवपणें दाटला। भक्तु भक्तपणें आटला। दोहींचाही अंतु आला। अभेद जाहला अनंतु।। ८९।।’’ देव सर्वत्र दाटला आहे. दशदिशांना व्यापूनही उरला आहे. तर भक्त हा भक्तपणानं आटून गेला आहे! अखेर ‘देव’ आणि ‘भक्त’ या दोन्ही वरवर दिसणाऱ्या भेदांचाही अंत होऊन जो अनंत आहे तोच अभेदपणे व्यापला आहे! मग एकनाथ महाराज म्हणतात, की अशी ज्या भक्ताची परमात्म्याशी एकरूप स्थिती होते त्याच्याच भक्तीला, शिव होऊन शिवाची भक्ती करावी, आदी म्हणणं शोभतं! एकनाथ महाराज म्हणतात : शिवें शिवूचि यजिजे। हें ऐशिये अवस्थेसि साजे। एऱ्हवीं बोलचि बोलिजे। परि न पविजे निजभजन।।९२।। याच भक्ताला खऱ्या निजभजनाची गोडी प्राप्त असते. बाकीचे नुसते भक्तीचं शाब्दिक वर्णन करीत असतात. मग असे भक्त कोण कोण होऊन गेले? तर नाथ महाराज नारद, शुकसनकादिकांची नावे घेतात. ते म्हणतात, ‘‘ये अभिन्नु सुखसेवेआंतु। नारद आनंदें नाचत गातु। शुकसनकादिक समस्तु। जाले निजभक्तु येणेंचि सुखें ।। ९३।।’’ या भक्तीच्या अभेद सुखसेवनात नारद आनंदानं नाचत आणि गात आहेत. याच सुखानं शुकसनकादिक निजभक्त तृप्त आहेत. समुद्र आणि नदी यांचं पाणी पाहू जाता एकच आहे, पण तरीही नदीचा सागराशी संगम होतो तिथली शोभा काही विशेष असते. त्याचप्रमाणे देवच भक्तामध्ये विराजमान आहे, तरीही भक्त जेव्हा भजनयोगानं परमात्म्याशी ऐक्य पावत असतो, त्या ऐक्यतेचं दर्शन मोठं मनोहर असतं. मग नाथ सद्गुरू जनार्दन महाराजांच्या कृपेचा आधार कसा आहे, हे सांगतात. भक्त होण्याची माझी काय पात्रता? पण जनार्दन महाराजांनी मला सर्वस्वी आपलं मानून मला भक्त बनवलं आहे, तरी प्रत्यक्षात माझ्या देहानं, वाणीनं आणि मनानं होणारी प्रत्येक क्रिया तोच करवीत आहे! तेवीं आपुलेपणाचेनि मानें। भक्त केलों जनार्दनें। परी कायावाचामनें। वर्तविजे तेणें सर्वार्थी।। ९७।। मग या सद्गुरूनंच हा ग्रंथ लिहवून घेतला आणि त्याचं सुरुवातीलाच कौतुकही केलं, असं नाथ सांगतात. मग हा ग्रंथ प्राकृतात आहे, पण म्हणून काही तो कमी प्रतीचा होत नाही, कारण हरिकथा कोणत्याही भाषेतली असो ती दिव्यच असते, पावनच असते, असं ते सांगतात. ‘‘आतां संस्कृता किंवा प्राकृता। भाषा झाली जे हरिकथा। ते पावनचि तत्त्वता। सत्य सर्वथा मानली।।’’ आता पुरणपोळीला परभाषेतल्या नावानं उल्लेखलं तर तिची गोडी कमी होते का? तशी हरिकथा कोणत्याही भाषेत असो ती मधुरच असते. थोडक्यात भक्तीला भाषेचं बंधन नाही, हेच नाथ सांगतात. मग आपले पूर्वज भानुदास यांचं स्मरण नाथ करतात. त्या निमित्तानं समस्त वैष्णवांचंही स्मरण करतात. या भानुदासांची विठ्ठलभक्ती अनन्य होती. विठ्ठल त्यांच्या दृष्टीनं सर्वस्व होता. भानुदासांनी एका अभंगात म्हटलं आहे, ‘‘जैसा उपनिषदांचा गाभा। तैसा विटेवरी उभा।। वेदशास्त्राचें सार। तो हा विठ्ठल विटेवर।।’’ विठ्ठल म्हणजे जणू उपनिषदांचा गाभा आहे, वेदशास्त्रांचं सार आहे! ‘‘वेदीं सांगितलें श्रुतीं अनुवादिलें। तें ब्रह्म कोंदलें पंढरीये।।’’ वेदांनी जे सांगितलं आणि श्रुतींनी ऐकवलं ते परब्रह्मच पंढरपुरीला ओतप्रोत व्यापून आहे. तर अशा भानुदासांच्या भक्तीवारशाचे नाथ स्मरण करीत आहेत.
चैतन्य प्रेम