चैतन्य प्रेम

जीवाचं जगाकडे वाहात जाणारं प्रेम भगवंत चोरतो, हे गोकुळातील दह्य़ा-लोण्याची मडकी फोडून बालकृष्णानं दाखवलं आणि म्हणूनच नाथ म्हणतात की, ‘‘ब्रह्म आणि चोरी करी।’’ परब्रह्म असून या अवतारानं तुच्छ जीवाच्या प्रेमाची चोरी केली! पुढे म्हणतात, की ‘‘देवो आणि व्यभिचारी!’’ देव असूनही त्यानं ‘व्यभिचार’ केला! आणि कृष्णचरित्रातील अनेक प्रसंग हे सर्वसामान्य माणसाला तसे वाटतात. मग तो गोपींची वस्त्रं चोरणारा कान्हा असो की ब्रजगोपिकांसमवेत रासलीला करणारा नंदलाला असो. पण या प्रसंगांचे गूढार्थ लक्षात घेतले तर त्यांचं दिव्यत्व उमगू लागेल. या गोपी होत्या कोण? तर मागेच सांगितल्याप्रमाणे प्रभू राम जेव्हा चित्रकूट पर्वतावर सीतामाईंसोबत राहात होते तेव्हा त्यांचं मधुर आणि परिपूर्ण प्रेम पाहून या ऋषीमुनींना वाटलं की, या दिव्य प्रेमाचा आपल्यालाही अनुभव यावा. भगवंतानं सांगितलं की, ही इच्छा कृष्णावतारात पूर्ण होईल. त्याप्रमाणे हे महातपस्वी ऋषीमुनी गोपी म्हणून गोकुळात जन्मले. पण जन्मापासून आपलं मूळ स्वरूपच ते विसरले आणि स्वत:ला गोपालक मानून जगू लागले. मग त्यांचं मन त्या दही-दूध-लोण्यातच अडकून राहिलं. ते दूध-दही मथुरेच्या बाजाराकडे विकावं आणि आपला प्रपंच चालवावा, एवढंच जीवन उरलं. म्हणून मथुरेच्या वाटेवर जाणाऱ्या गोपींची अडवणूक करावी, त्यांची मडकी फोडावीत, असा उद्योग बालकृष्ण आणि त्याच्या सवंगडय़ांनी सुरू केला होता. तरीही या गोपींना गतजन्माचं स्मरण होणं शक्य नव्हतं तेव्हा एकदा त्या स्नानासाठी नदीत उतरल्या असताना बालकृष्णानं त्यांची वस्त्रं  चोरली आणि तो लपून बसला. जेव्हा ही गोष्ट गोपींना कळली तेव्हा त्या बालरूपातील कृष्णासमोर येण्याचीही स्वाभाविक लाज त्यांना वाटू लागली. मग कृष्णानं त्यांची वस्त्रं त्यांना परत दिली, मात्र त्याच्या स्पर्शानं ती वस्त्रं दिव्य होऊन गेली होती. त्यामुळे या गोपींना आपल्या मूळ स्वरूपाचं स्मरण झालं आणि त्या क्षणापासून त्यांचं आंतरिक जीवन दिव्य झालं. रासलीलेच्या वर्णनात म्हटलं आहे की, प्रत्येक गोपीबरोबर कृष्णही स्वतंत्र रूपात अवतरला होता. तेव्हा ही रासलीला म्हणजे आत्मा-परमात्मा ऐक्याची परिसीमा आहे. भक्त अगणित असतात, देव एकच असतो. तरीही प्रत्येक भक्ताबरोबर त्याचा देव असतोच! तो आणि भगवंत, या दोघांचंच जणू ऐक्य असतं. जगात अन्य काही नसतंच. रासलीलेचं खरं रूपदर्शन असं आहे. रामावतार एकपत्नीव्रती होता, तर कृष्णानं सोळा हजार एकशे आठ स्त्रियांशी विवाह केला होता. आणि तरीही नाथ सांगतात, ‘‘पुत्र कलत्र आणि ब्रह्मचारी।’’ हा कृष्ण ब्रह्मचारी होता! यातूनच कृष्णचरित्र असं सांगतं की, प्रपंचातील कर्तव्यं पार पाडणारा भक्तही ब्रह्मचारी राहू शकतो.  म्हणजेच देहानं कर्तव्यरत राहून अंत:करण जर परमतत्त्वाशी एकरूप असेल, तर तेच ब्रह्मतत्त्वात विचरण आहे. कृष्णचरित्रात नारदांना बोध म्हणून कृष्णांच्या ब्रह्मचर्याची एक कथा आहेच. मग नाथ सांगतात की,  ‘‘अधर्मे वाढविला धर्म।’’ कृष्णानं अधर्माच्या योगानं धर्म वाढवला. महाभारताचं युद्ध होईपर्यंतच्या अनेक टप्प्यांवर कौरवांकडून अधर्माचरणच झालं आहे आणि प्रभूंनी ते त्याच क्षणी थांबवलं नाही. इतकंच नव्हे, तर शिशुपालालाही शंभर अपराध करण्याची संधी देत त्याला जमवता येतील तितके आपले शत्रू गोळा करण्याची संधीही दिली. पण या सर्वाची अखेर धर्मजयातच होईल, हे त्यानं पाहिलं.

Story img Loader