भ्रम आणि मोहासक्तीतून निर्माण झालेला अशाश्वताचा जो पसारा आहे तो आवरण्याचं कार्य सद्गुरू करतात आणि म्हणून परमात्म्याचं त्यांच्यावर प्रेम आहे. सद्गुरूंच्या या विराट कार्याचं रहस्य आणि त्यामुळे परमात्म्याच्या त्यांच्यावरील प्रेमाचं रहस्य एकनाथ महाराजांनी एका अभंगात मनोज्ञपणे मांडलं आहे, असं गेल्यावेळी सांगितलं आणि तो अभंगही आपण वाचला. हा अभंग असा आहे : संत देवाचा लाडका। देव तेणें केला बोडका।। १।। अर्थ पाहतां सखोल असे। बोडका देव पंढरी वसे।। २।। संत लाडका देव बोडका। म्हणे जनार्दन लाडका एका।। ३।। सद्गुरू देवाचा लाडका आहे. का? तर त्यानं देवाला बोडकं केलं आहे! बोडकं म्हणजे डोईवरचा केशसंभार काढून टाकणं. अन् अशाश्वतात अडकून क्लेश भोगत असलेल्या जिवांच्या मनातला अशाश्वताच्या ओढीचा पसारा आवरून एकप्रकारे परमात्म्याच्या डोईवर हा क्लेशपसारा आवरण्याची जी जबाबदारी होती, तीच सद्गुरूंनी दूर केली आहे आणि म्हणून ते त्या भगवंताचे लाडके आहेत! आता ‘संत देवाचा लाडका, देव तेणें केला बोडका,’ ही ओळ नुसती वाचून कळणारी नाही आणि म्हणूनच एकनाथ महाराजही सांगतात की, ‘अर्थ पाहतां सखोल असे!’ फार खोल अर्थ आहे हो.. वर वर वाचून पाहू नका, वर वर वाचून हा सखोल अर्थ कळणार नाही.. आणि हा अर्थ किती खोल आहे, हे गेल्या भागापासून आपण पाहात आहोतच. मग हा जो ‘बोडका’ झालेला देव आहे तो आहे कुठे? तर तो पंढरीत आहे! कमरेवर हात ठेवून तो निश्चलपणे उभा आहे. कमरेवर हात ठेवणं म्हणजे काय? तर कर्तेपणा सोडून नुसतं कौतुकानं न्याहाळणं! एखाद्या कामावर देखरेख ठेवणारा माणूस कसा असतो? तसा जणू हा पंढरीराया आहे. अनंत जिवांना भ्रममोहाच्या ओझ्यातून मुक्त करण्याचं जे विराट कार्य अनंत काळापासून सद्गुरू अनंत रूपांद्वारे करीत आहेत, ते कार्य हा पंढरीराया मोठय़ा प्रेमादरानं न्याहाळत आहे! त्या पंढरीरायाची भक्तीपताका फडकावत अनेकानेक जनांना भक्तीपंथावर आणणारी संतांची मांदियाळीही पंढरीतच नांदते. पंढरीरायाच्या चरणांपाशी येणाऱ्या माणसाच्या अंतरंगातलं जे दु:खं आहे ते आपल्या बोधामृतानं निवळण्याचं कार्य हे संत करीत आहेत. आणि म्हणूनच पांडुरंग नामदेवांबरोबर त्याच्या बालपणापासून खेळले, पण तरीही नामदेवांना त्यांनी सद्गुरू विसोबा खेचरांकडेच जायला सांगितलं! नामदेवही तेव्हा म्हणाले होते की, ‘‘तुझं दर्शन व्हावं यासाठी सद्गुरू करतात आणि तुझं दर्शन तर मला होतच आहे. मग सद्गुरूची गरज काय?’’त्यावर विठोबा हसून म्हणाले होते की, ‘‘तू मला बालपणापासून पाहतोस खरं, पण जाणत नाहीस! ती जाणीव सद्गुरूंशिवाय शक्य नाही!’’ माउलीही सांगतात ना, ‘गुरूविण अनुभव कैसा कळे!’ आपल्याला पदोपदी अज्ञानजन्य दु:खाचा अनुभव येत असतो, पण तो अज्ञानानुभव तरी कळतो कुठे? जीवनातल्या अज्ञानाचा अनुभव सद्गुरू आधी आकळून देतात आणि मग त्या अज्ञानातून मुक्त होण्याची इच्छा निर्माण करतात. त्यामुळे हे सद्गुरूस्वरूप त्या परमात्म्याचंही लाडकं आहे आणि एकनाथ महाराज म्हणतात की, मलाही त्याचीच गोडी लागली आहे.
– चैतन्य प्रेम
chaitanyprem@gmail.com