‘एकनाथी भागवता’चं फलित आपण पाहात आहोत. जनार्दन स्वामींनी आशीर्वाद दिला आहे की, ‘‘ग्रंथ सिद्धी पावेल यथार्थी। येणें सज्ञानही सुखी होती। मुमुक्षु परमार्थ पावती। साधक तरती भवसिंधु।। ५३६।। भाळेभोळे विषयी जन। याचें करितां श्रवण पठण। ते हरिभक्त होती जाण। सन्मार्गी पूर्ण बहुत होती।। ५३७।। ये ग्रंथीं ज्या अत्यंत भक्ती। निंदाद्वेष न रिघे त्याचे चित्तीं। श्रीरामनामीं अतिप्रीती। सुनिश्चितीं वाढेल।। ५५२।।’’ हा आशीर्वादही व्यापक आहे. त्याचा शब्दश: अर्थ असा की, ‘‘जे सज्ञान आहेत ते सुखी होतील, जे मुमुक्षू आहेत त्यांना परमार्थपथ लाभेल आणि जे साधक आहेत ते भवसागर तरून जातील. विषयांच्या प्रभावात जगणारे जे भोळे जन आहेत, ते या ग्रंथाचं श्रवण-पठण करतील तर हरिभक्त होतील. सन्मार्गाला पूर्णपणे लागतील. या ग्रंथावर ज्यांची अत्यंत भक्ती जडेल, त्यांच्या चित्तात निंदा आणि द्वेष उत्पन्न होणार नाही. श्रीरामनामावर त्यांची अत्यंत प्रीती जडेल आणि निश्चितपणानं वाढेल.’’ या आशीर्वादाचा थोडा विचार करू. जे सज्ञान आहेत, ते सुखी होतील, हे वचनच मार्मिक आहे. ते असं सूचित करतं की, निव्वळ सज्ञान असल्यानं माणूस सुखी होत नाही! कारण शब्दज्ञानालाच माणूस मुख्यत्वे ज्ञान मानत असतो. माणसाचं बहुतांश ज्ञान हे शाब्दिकच असतं. अनुभवानं माणूस फार कमी शिकतो आणि त्यामुळे आपलं ज्ञान अनुभवसिद्ध असावं, ही जाणीवही त्याला नसते. त्यामुळेच अध्यात्मावर भारंभार बोलणारे, लिहिणारे आणि आध्यात्मिक प्रवचनं ऐकणारे, पारायण करणारे या साऱ्यांना अध्यात्माचं शाब्दिक ज्ञान उत्तम असतं, पण तरीही ते सुखी नसतात! जेव्हा ज्ञान हा जगण्याचा, अनुभवाचा अविभाज्य भाग होतो तेव्हाच त्या ज्ञानानुसार जगू लागल्यावर ‘दु:खा’चंही खरं स्वरूप कळू लागतं. अंतर्मुखता वाढू लागते तसतसं असमाधानही ओसरू लागतं. हा ग्रंथ वाचून ही अंतर्मुखता लाभणार आहे. जे मुमुक्षू आहेत, म्हणजे जीवनात खरं सत्य, शाश्वत काय आहे, यासाठी तळमळत आहेत त्यांना खऱ्या परमार्थाचा लाभ होणार आहे. जे त्या परमार्थमार्गानं वाटचाल करीतच आहेत, अशा साधकांना भवसागर तरून जाण्यास साह्य़ होणार आहे. हा जो ‘भवसागर’ आहे तो कुठे आहे हो? हा विराट भवसागर आपल्या विराट अशा मनातच आहे! भवविषयाची मनातली अनंत जन्मांची ओढ हाच तो भवसागर आहे आणि तो तरून जायचं असेल तर ज्या सद्गुरू बोधाची प्राप्ती अनिवार्य आहे, तो बोध या ग्रंथानं लाभणार आहे. विषयाच्या प्रभावात अडकलेले जे भोळे जन आहेत त्यांनी या ग्रंथाचं नुसतं श्रवण-पठण केलं तरी त्यांना सन्मार्ग लाभणार आहे. ते हरिभक्त होणार आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा