एकनाथी भागवत या ग्रंथाच्या पठणानं विषयभोळ्या सामान्य माणसापासून ते साधकापर्यंत प्रत्येकाला कोणकोणता लाभ होईल, ते जनार्दन स्वामींच्या आशीर्वचनातून आपण पाहिलं. आता भक्ताला काय लाभ होईल? जनार्दन स्वामी सांगतात, ‘‘ये ग्रंथीं ज्या अत्यंत भक्ती। निंदाद्वेष न रिघे त्याचे चित्तीं। श्रीरामनामीं अतिप्रीती। सुनिश्चितीं वाढेल!’’ या ओवीतला प्रत्येक शब्द महत्त्वाचा आहे. माणसा-माणसांतल्या परस्पर कलहामुळे एकनाथ महाराज व्यथित होते. परस्पर द्वेष आणि परस्पर निंदेत अडकलेला समाज अध्यात्माच्या मार्गावर सोडाच माणुसकीच्या मार्गावरही कच्चा ठरेल, हे भविष्याविषयीचं वास्तविक आकलन त्यांना व्यथित करीत होतं. आणि आजही हेच वास्तव आपण अवतीभवती पाहात आहोत. तेव्हा एकवेळ अवघा समाज सुधारणं काही आपल्या आवाक्यातली गोष्ट नाही, पण निदान स्वत:ला सुधारण्याचा प्रयत्न तरी का करू नये? माणूस स्वबळानं स्वत:ला सुधारू शकत नाही, हेही बरोबर, पण त्या सुधारणेसाठी मनाची तयारी असणं, हीच त्या सुधारणेची सुरुवात असते. तेव्हा निदान स्वत:मध्ये सुधारणा घडावी, आपल्या वागण्या-बोलण्यातील विसंगती दूर व्हाव्यात, या इच्छेची जोपासना तरी आपण करू शकतो ना! नाथांची साधकाकडून हीच अपेक्षा आहे. जो खरा भक्त आहे त्याच्या चित्तात निंदा आणि द्वेष कसे असतील? तेव्हा जो साधक आहे आणि ज्याची या ग्रंथावर अत्यंत भक्ती जडू लागली आहे, अशा भक्ताविषयीचं साकडं नाथांनी घातलं होतं आणि त्याला जनार्दन स्वामींनी आशीर्वाद दिला की, त्याच्या चित्तात निंदा आणि द्वेष उत्पन्नच होणार नाहीत. पण त्यासाठीची पूर्वअट या ग्रंथावर अत्यंत भक्ती जडणं, ही आहे. आता ग्रंथावर भक्ती म्हणजे काय हो? तर ‘दासबोध’ आणि ‘आत्माराम’ हे माझंच स्वरूप आहे, असं समर्थ रामदासांनी सांगितलं होतं. त्या ग्रंथाद्वारे मी चिरंतन आहे, असा त्याचा मथितार्थ होता. अगदी त्याचप्रमाणे ‘ज्ञानेश्वरी’ हा ग्रंथ ज्ञानेश्वर महाराजांचं चिरंतन स्वरूपच आहे. तुकाराम महाराजांचे अभंग हे त्यांचं स्वरूप आहे आणि अगदी त्याचप्रमाणे ‘एकनाथी भागवत’ हे नाथांचं विचार-स्वरूप आहे. संताचा ग्रंथ म्हणजे त्यांच्या तत्त्वविचाराचं सार असतं. त्या ग्रंथावर अत्यंत प्रीती जडणं म्हणजे त्या तत्त्वविचारावर प्रेम जडणं असतं. आणि प्रेम हे कधी निष्क्रिय राहूच शकत नाही! प्रेमाला स्वस्थ बसणं, शांत बसणं माहीत नाही. ज्यावर प्रेम आहे त्याच्याशी एकरूप होण्यावाचून प्रेम करणाऱ्याला करमत नाही. तेव्हा जर या ‘भागवता’वर प्रेम असेल, तर मग त्या ग्रंथाच्या बोधाच्या सहवासावाचून करमणारच नाही. अर्थात या ग्रंथाचा बोध जगण्यात उतरवून, त्याचा क्षणोक्षणी सहवास अनुभवण्यावाचून भक्ताला करमणार नाही. मग असा जो भक्त आहे त्याच्या चित्तात द्वेष आणि निंदा राहूच शकणार नाही. निंदा आणि द्वेषाच्या आधाराचा परीघ हा या भौतिक जगापुरताच तर असतो. तेव्हा या भौतिक जगातली आसक्ती सुटू लागली की निंदा आणि द्वेषाचं कारणही उरत नाही. मग अशा भक्ताची श्रीरामनामावर अत्यंत प्रीती वाढते. रामनामावर प्रेम जडणं म्हणजे स्वनामावरचं आसक्तीयुक्त प्रेम ओसरू लागणं. जे शाश्वत आहे त्याचंच मोल मनात ठसणं आणि त्या शाश्वताच्या अखंड प्राप्तीसाठी मनाचा निश्चय होणं! तेव्हा या ग्रंथपठणानं भक्ताच्या मनातला हा निश्चय निश्चित वाढणार आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा