साधना ही जोवर जगण्याची सहज रीत होत नाही, तोवर ‘केली’ जाणारी साधना ही उपाधीच असते. काहीजण तेरा कोटी जपाचा संकल्प सोडतात. ही चांगलीच गोष्ट आहे, वाटचालीचा वेग कायम रहावा यासाठी मनाला काही निश्चयाची जोड असावी, हे गैर नाही, पण तो संकल्प नुसता सोडून उपयोग नाही. नुसतं त्या संकल्पाचंच अप्रूप वाटून उपयोग नाही. असा तेरा कोटी जप करू लागल्यावर आंतरिक पालटाची प्रक्रियाही जाणवली पाहिजे. तो जप करू लागूनही जर आंतरिक स्थितीत, मनाच्या धारणेत, भ्रममोहयुक्त वर्तनात कणमात्र फरक पडत नसेल, तर असा संकल्प ही साधनेचीच थट्टा ठरेल.  जर खरेपणानं नाम घेऊ लागलो, तर मानसिक स्थितीत फरक पडलाच पाहिजे. आसक्ती, मोह, लोभ सुटत गेलाच पाहिजे. अध्यात्म म्हणजे खेळ नव्हे, थट्टा नव्हे. कसं आणि कशासाठी जगायचं आहे, याचा तो सखोल विचार आहे. आजवर अनंत जन्म मनासारखं वागण्यातच सरले. हा जन्मही तसाच सरत असेल, तर ते आतापर्यंतच्या जन्मांना साजेसंच आहे. पण साधनेच्या नावावर मनाची भणंग स्थितीच जर आपण टिकवत असू, तर तो आपल्या सद्गुरूचा अवमान आहे, हे लक्षात ठेवा. अशा ‘साधने’पेक्षा आणि आपल्याला ‘साधक’ मानण्यापेक्षा सगळं सोडून भौतिकाला कवटाळून खुशाल जगा! काही हरकत नाही. पण जर खऱ्या अर्थानं साधनेच्या मार्गावर पाऊल ठेवायचं असेल, तर केवळ सद्गुरू बोधानुरूप जगण्याचा अभ्यास, हाच एकमेव मार्ग आहे. बाकी सगळं झूठ आहे. तेव्हा जनार्दन स्वामी सांगतात, ‘‘साधनें समाधी नको या उपाधी। सर्व समबुद्धी करी मन!’’ एकनाथ महाराजांनी ‘स्वात्मसुख’ या ग्रंथात म्हटलं आहे की, ‘‘म्यां नाहीं केलें उग्र तप। नाहीं जपिन्नलों मंत्रजप। योगयाग खटाटोप। नाहीं तीर्थादि भ्रमण।। आम्हा सकळ साधनांचें साधन। हे सद्गुरूचें श्रीचरण। तेणें दाविली हे खूण। जग गुरुत्वें नांदे।। ऐशियाचे सांडूनि पाये। कोण कोणा तीर्था जाये। जाऊनि काय प्राप्ती लाहे। हें नकळे मज।। एका एकपणाची नाथिली दिठी। या एकपणाची सोडिली पेटी। मुक्त मुक्ताफळाची मोकळी गांठी। मिरवे जनार्दन चरणीं।।’’ एकनाथ महाराज सांगतात की, मी काही उग्र जप-तप केलं नाही. योगयागाचा खटाटोप केला नाही. तीर्थयात्रा करीत तीर्थस्थानांमध्ये पायपिट करीत बसलो नाही. या सर्व साधनांतील सर्वोत्तम असं जे साधन आहे ते म्हणजे सद्गुरू चरणांचं अनुसरण! अर्थात ते जो मार्ग दाखवतील, त्या मार्गानं जाणं. आजवर अज्ञानमोहात जगत होतो, आता त्यांच्या ज्ञानबोधानुसार जगू लागणं. जगण्यातली आसक्ती, लोभ, मोह, मद, मत्सर सुटत जाणं, जगणं अधिक सकारात्मक, अधिक व्यापक, अधिक सत्यानुग्रही आणि अधिक सहज होणं. अशाश्वातातलं गुंतणं, गुरफटत राहणं थांबणं आणि शाश्वताशी सुसंगत जगणं.. हे सर्वोत्तम साधन मी गुरूकृपेच्या बळावर करीत गेलो. अहो त्याच्या मार्गानं प्रामाणिकपणे चालू लागा मग या जगातल्या प्रत्येक कणाकणातलं परमतत्त्व तुमचा मार्ग चुकू देणार नाही! अशा सद्गुरूला सोडून कुठल्या तीर्थाला जावं? तिथं जाऊन काय प्राप्ती होते, ते मला उमगत नाही. माझं लक्ष त्या एकावरच आहे, त्यामुळे ‘मी’ या एकाचं एकारलेपण सुटलं आहे आणि सद्गुरूचरणांवर माझ्या अंत:करणातल्या गुंतलेल्या गाठी मोकळ्या झाल्या आहेत!

– चैतन्य प्रेम

chaitanyprem@gmail.com