साधनेची नुसती आटाआटी करणाऱ्या साधकांना  एकनाथ महाराज सावध करताना एका भजनात म्हणतात, ‘‘वायां वायां शिणती साधक जन। साधक तितुकें ज्ञानघन। साध्य साधन मानितां भिन्न। निजात्म पूर्ण नव्हती।। १।।’’ साधक जन व्यर्थ शिणत आहेत. खरं तर साधन कोणतं, ते कसं करावं, किती करावं, त्यानं काय प्राप्ती होते, याचं सगळं ऐकीव ज्ञान त्यांच्या डोक्यात भरून असतं. पण त्या ज्ञानानंच त्यांचा थोडा घात केलाय! म्हणजे माहिती भरभरून आहे, पण प्रत्यक्ष जगताना नेमकं त्या ज्ञानाचं बोट सुटतं. ते विसरलं जातं आणि हा ‘अज्ञानघन’ साधक अज्ञानानंच व्यवहार करतो. तो साधना करतानाही भेदबुद्धीनंच वावरतो. साधना आणि साध्य या दोन भिन्न गोष्टी आहेत, असं तो मानतो. आपण नाम घेतो आणि त्या नामानं आणखी दुसरं काहीतरी मिळवायचं आहे, हा सुप्त भाव असतो. मुळात खरं नाम घेता येणं आणि ते अंतरंगात मुरणंच महत्त्वाचं. तेव्हा नाम हे साधन आहे, पण तेच साध्यही आहे. साधायचंही तेच आहे. साधन आणि साध्य, यात भेद मानल्यानं साधनापेक्षा अन्य कशाला तरी दिव्यत्व दिलं जातं! अशा भेदकल्पनेमुळे निज आत्मज्ञान होत नाही. पुढे नाथ सांगतात, ‘‘साधनें साधूं आत्मयासी। ऐसें म्हणती ते परम पिसी। आत्मा प्रकाशी साधनासी। तो केवीं त्यासी आकळे।। ३।।’’ साधनानं आत्मसाक्षात्कार साधेल, असं जे म्हणतात तो त्यांचा भ्रम आहे. ज्या आत्मशक्तीमुळेच साधन होऊ शकतं, ते साधनच त्या आत्मशक्तीला जाणून देऊ शकेल काय? थोडक्यात जे नाम आपण ‘घेतो’ असं आपल्याला वाटतं त्याचं स्फुरण आत्मशक्तीद्वारे सतत सुरू आहे. त्यामुळे नाम आणि ही निजात्मशक्तीही एकरूप आहे. ती वेगळेपणानं पाहता येत नाही. आता कुणी जप करतात, पण तो किती केला म्हणजे निजात्मप्राप्ती होईल, या शंकेचा गोंधळ त्यांच्या मनात सुरू असतो.  (एक ते मंत्र उपदेशिती। जपू करावा नेणों किती। जेणें होय निजात्मप्राप्ति। ते मंत्रयुक्ति न कळे।। ४।।) काहीजण पारायणं, पठण करतात. पण ते कोरडय़ा तोंडानं अर्थात कोरडय़ा हृदयानं म्हटलं जात असतं. ते अंत:करणात पोहोचतच नाही आणि त्यामुळे अंत:करणात खोलवर रुजलेल्या कामक्रोधादिंची बोळवण होत नाही (पाठका साधन वेदपठण। अक्षर उच्चार स्वर वर्ण। कोरडी याची तोंड पाठण। नव्हे बोळवण कामक्रोधा।। ६।।). जसा भक्तांचा भाव असतो तसा देव त्यांना भाळतो. भाव नसेल, तर देवाचाही अभावच असतो! (जैसा जैसा भक्तांचा भावो। तैसा तैसा भाळे देवो। भावे वाचूनियां पाहो। होय अभावो देवाचा।। ११।।). मग नाथ महाराज सांगतात की, ‘‘ऐसें साध्य तेंचि साधन। ज्ञेय तेंचि धृतिज्ञान। ध्येय तेंचि होय ध्यान। समाधान गुरुवाक्ये।। १२।।’’ साधन हेच साध्य कसे, ज्ञेय तेच ज्ञान आणि ध्येय तेच ध्यान कसे याचं समाधान केवळ गुरूवाक्यानं होतं. सद्गुरूबोधानं होतं. तेव्हा गुरूच्या बोधानुसार जगण्याचा अभ्यास हेच साधन आहे. तसं जगू लागता येणं हेच साध्य आहे. बाकी सगळी भटकंती आहे. जनार्दन महाराजांचा या अनुषंगानं दुसरा अभंग असा :

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तीर्थपर्यटन कायसा करणें। मन शुद्ध होणें आधी बापा।।१।। तीर्था जाऊनि काय मन शुद्ध नाहीं। निवांतची पाही ठायीं बैसे।।२।। मन शुद्ध जालिया गृहींच देव असे। भाविकासी दिसे बैसल्या ठायीं।।३।। म्हणे जनार्दन हाचि बोध एकनाथा। याहुनि सर्वथा श्रेष्ठ नाहीं।।४।।

– चैतन्य प्रेम

तीर्थपर्यटन कायसा करणें। मन शुद्ध होणें आधी बापा।।१।। तीर्था जाऊनि काय मन शुद्ध नाहीं। निवांतची पाही ठायीं बैसे।।२।। मन शुद्ध जालिया गृहींच देव असे। भाविकासी दिसे बैसल्या ठायीं।।३।। म्हणे जनार्दन हाचि बोध एकनाथा। याहुनि सर्वथा श्रेष्ठ नाहीं।।४।।

– चैतन्य प्रेम