मृगजळ  हाच आभास असल्यानं त्यात मासे दिसत असतील, तर तोही आभासच आहे. त्याचप्रमाणे परब्रह्मामध्ये प्रपंचभानच नसताना त्या प्रपंचाचा निरास करण्याची साधनाही व्यर्थ आहे, असं अंतरिक्ष म्हणतो. हे रूपक वरवर पाहता त्यातील चित्रात्मकतेनं मनावर ठसतं, पण जसजसा विचार करावा, तसं ते दिसतं तेवढं सोपं नाही! कारण मिथ्या मृगजळ आणि सत्यरूप ब्रह्म यांना या रूपकात एका पातळीवर आणल्याचा गरसमजही होऊ शकतो. नीट विचार करता लक्षात येईल की, मृगजळ भासमान असतं हे खरं; पण ते ज्या रस्त्यावर वा वाळवंटात आभासित होतं तो रस्ता किंवा ते वाळवंट खोटं नसतं! उलट ते असूनही दिसत नाही आणि त्याजागी नसलेलं मृगजळ दिसतं. त्याचप्रमाणे परब्रह्म सर्वत्र सदैव व्याप्त असूनही ते दिसत नाही, पण नसलेला सुख-दुखमिश्रित प्रपंच मात्र आभासित होत असतो! आता नसलेल्या मृगजळात मासे दिसावेत, त्याप्रमाणे नसलेल्या प्रपंचात सुखरूपी मासे आणि दुखरूपी मगरी दिसू लागतात आणि ते मासे पकडण्यात वा मगरींच्या पकडीतून सुटण्यात जन्म सरत असतो! आता कुणाला वाटेल, प्रपंचात सुख नाहीच, इतकी टोकाची भूमिका कशाला? ती अमानुष आहे. प्रपंच आहे म्हणून नात्यागोत्याची रंगीबेरंगी गुंफण आहे, लहान मुलांचा निरागस संग आहे, परस्परांसाठीच्या त्यागातून आणि प्रेमातून निर्माण होत असलेल्या प्रेरक संस्कार परंपरेला आधार आहे. प्रपंचाची ही बाजू कुणाला आवडत नाही? मात्र जगातला असा वावर आणि त्यातील माधुर्य हे आध्यात्मिक धारणेशिवाय टिकाऊ नसतं, यातही शंका नाही. उलट आपण ज्या गोष्टींना आजवर ‘सुख’ मानत होतो, त्या गोष्टींचं खरं रूपही दिसू लागतं. त्यातला ठिसूळपणा, नश्वरता जाणवू लागते. त्या ‘सुखा’साठीचा अट्टहास, ओढ, आंतरिक तगमग थांबते. तेव्हा मृगजळातल्या माशांप्रमाणे नसलेल्या प्रपंचातील सुखही मिथ्या आणि दुखही मिथ्या! मग ते सुख मिळविण्याचा आणि दुख दूर करण्याचा उपायही मिथ्याच नाही का? पण तरीही ते सुख-दुख सत्य वाटतं, याचं कारण ‘माया’! अंतरिक्ष म्हणतो, ‘‘दोनीच अक्षरें ‘माया’। जंव गेलों सांगावया। तंव श्लोकार्थ दुरी ठेला राया। वाढला वायां ग्रंथु सरा॥ ६५॥’’ अंतरिक्ष राजा जनकाला सांगतो की, हे राजन, ‘माया’ ही नुसती दोनच अक्षरं आहेत खरी, पण त्यांचं विवरण करू लागताच मूळ श्लोक बाजूलाच राहिला आणि नाहक विस्तार मात्र वाढला! भलेभले सज्ञानीही या मायेनं भ्रमित होतात, हे नमूद करताना अंतरिक्ष म्हणतो की, ‘‘माया पाहों जातां हर्षे। सज्ञानही झाले पिसे। नांवारूपांचिये भडसें। कल्पनावशें माया वाढे॥ ६६॥’’ मायेच्या सावलीनं सज्ञानीही वेडेपिसे होतात. नाम आणि रूपांत अडकून कल्पनेच्या खोडय़ात अडकतात. गुरांना जसं दावणीला बांधून टाकतात ना, तशी माया आपल्या दावणीला सज्ञानी जीवालाही बांधते. मग आसक्ती आणि मोहाचा कडबा खाण्यात आणि अपेक्षायुक्त रवंथ करण्यात त्याच्या आयुष्याचा बहुमोल वेळ वाया जाऊ लागतो. मग वास्तवात नसलेल्या या मायेचा उगम तरी कसा होतो? अंतरिक्ष सांगतो, ‘‘मायेचें मुख्य लक्षण। राया तुज मी सांगेन खूण। आपली कल्पना संपूर्ण। ते माया जाण नृपवर्या॥ ६७॥’’ हे राजा, मायेची मुख्य खूण, मुख्य लक्षण- तिच्या उगमाचं कारण एकच, ते म्हणजे आपली कल्पनांची भरारी!

– चैतन्य प्रेम