गेल्या काही दिवसांत छेडछाडीच्याच नाही तर बलात्कारांच्या घटनांच्या संख्येत राजधानी दिल्ली शहरापासून इतरत्र वाढ झाल्याचं दिसून आलं आहे. याचं एक कारण आत्तापर्यंत दुर्लक्ष झाल्यामुळे गुन्हेगार अधिक धीट बनले आहेत हे आहे.
कारखान्यांमधून होणाऱ्या अपघातांविषयी एक अनुभवसिद्ध नियम आहे. लहान लहान अपघातांची काही ठराविक संख्या झाली की एक मोठा अपघात होतो. यात गूढ असं काही नाही. लहान अपघातांकडे लहान म्हणून दुर्लक्ष होत राहतं. दुर्लक्ष करण्याची सवय झाली की नुसती लहान अपघातांची संख्याच वाढते असं नाही, तर जरा मोठे अपघातही लहानच वाटायला लागतात नि सतर्कता अधिकाधिक शिथिल होत जाते. ही वाढत जाणारी शिथिलता मोठय़ा अपघातास वाट करून देते. स्त्रियांच्या बाबतीत होणाऱ्या लंगिक छळणुकीच्या अपराधांनाही हाच नियम लागू पडतो. क्षुल्लक म्हणून छेडछाडीच्या प्रकारांकडे दुर्लक्ष केलं की, ‘छेडछाड केली तरी आपलं काही बिघडत नाही’ असा संदेश प्रसृत होतो व दुसरे कोणी त्यापुढचं धाडस करायला प्रवृत्त होतात. सवयीप्रमाणे त्याहीकडे ‘क्षुल्लक’ म्हणून दुर्लक्ष झाल्यास ‘हे पण चालतंय’ असं वातावरण तयार होतं व आणखी कोणी पुढच्या पायरीवरचं धाडस करायला प्रवृत्त होतात. अशा प्रकारे दुर्लक्ष व अपराधाचं धाडस यांचं दुष्टचक्र तयार होऊन त्याचं पर्यवसान कुणीतरी बलात्काराचं धाडस करण्यात होतं.
महिलांवरच्या अत्याचारांच्या बाबतीत आणखी एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात घेतला जात नाही, तो म्हणजे समाजातली वैचारिक विसंगती. ज्या समाजात सामाजिक स्थर्यासाठी पुरुषांनी नसíगक असलेली कामेच्छा नियंत्रणात ठेवण्याची अपेक्षा असते, त्याच समाजात हे नियंत्रण झुगारून द्यायला प्रवृत्त करणारे प्रभावी संदेशही कळत नकळत प्रसृत होत असतात. झगमगाटी दुनियेत वावरणाऱ्या स्त्री-पुरुषांच्या ‘सेक्सी’पणाचं प्रसारमाध्यमांतून जाहीर कौतुक होत असतं. फॅशन नि कलात्मकतेच्या नावाखाली अंगप्रदर्शन घडवणाऱ्या व पुरुषांचं लक्ष वेधून घेणाऱ्या नि त्यांना उद्दीपित करणाऱ्या वेशभूषेला प्रतिष्ठा मिळते. त्याचवेळी, निर्माण होणाऱ्या बहुतेक चित्रपटांमधून स्त्रियांवर छाप पाडण्यात छेडछाडीच्या स्वरूपातला आक्रमक पुरुषीपणा यशस्वी झाल्याचं दाखवलेलं असतं. वागणुकीतल्या साधेपणाचा नि सभ्यपणाचा उपहास होतो.थोडक्यात, छेडछाडीच्या प्रकारांतून सुरू होणारी अपराध प्रक्रिया बलात्कारात परिणत होत असते. चित्रपट, अंगप्रदर्शन करणारी कपडय़ांची फॅशन, झगमगाटी दुनियेला वाहून घेतलेली प्रसारमाध्यमं नि व्यक्तिस्वातंत्र्याच्या नावाखाली स्वैराचाराचं समर्थन या गोष्टी बलात्काराचा थेट संदेश देत नसल्या, तरी छेडछाडीचा विषाणू समाजात फैलावत असतात व त्याचेच दूरगामी परिणाम म्हणून बलात्काराच्या घटना घडतात.
शरद कोर्डे, वृंदावन, ठाणे

शीला दीक्षित यांचे आभारच!
साऱ्या भारतीयांनी सन्माननीय शीला दीक्षित यांचे आभार मानावे तेवढे खरे तर कमीच आहेत. त्यांनी महिन्याला फक्त ६०० रुपयांच्या हिशेबात कुटुंबाचा खर्च बसवला आहे. ते मला अगदी बरोबर वाटते. मी तर त्याच्या पुढे जाऊन म्हणतो की ६०० रुपयांतून बरेच पसे शिल्लक राहू शकतात. कसे? त्याचे उत्तर फक्त सन्माननीय शीला दीक्षित आणि आमच्या शिवाय कोणालाच कळलेले नाही.
अण्णा हजारे यांनी संपूर्ण देशाला दाखवून दिले आहे की, दहा दिवस उपाशी राहूनदेखील माणूस जिवंत राहू शकतो. म्हणजे दहा दिवस उपास, नंतर एक-दोन दिवस जेवण. परत दहा दिवस उपास, एन-दोन दिवस जेवण. परत दहा दिवस उपाशी. म्हणजे महिन्याला फक्त चार दिवस खाणे. कपडय़ांचं म्हणाल तर ही मंडळी देशाला पाश्चिमात्य करायला निघाली आहेत. म्हणजे पाश्चात्त्य कपडे जे कमीत कमी असावेत किंवा गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यांवर फिरतात तसे फिरावे.
उरले ते शिक्षण. आता अनेक पक्षांनी आणि उद्योगधंद्यांनी सिद्ध केले आहे की, देश आणि उद्योगधंदे चालवायला शिक्षणाची गरज असतेच असे नाही. म्हणजे शिक्षणाचे ओझे गेलेच. म्हणून वर्तमानपत्रांनी सन्माननीय शीला दीक्षित यांच्यावर वाटेल तशी टीका न करता, देशातील जनतेला जगण्याचा एक नवीन मार्ग दाखवून दिला म्हणून त्यांचा जयजयकार करावा.
श्याम नार्वेकर, विले पाल्रे, पूर्व.

मोदी विकासामुळे नव्हे, अस्मितेमुळे जिंकतात
विकासाचा विचार आणि विचाराचा विकास हा गिरीश कुबेर यांचा लेख (अन्यथा, २२ डिसें.) वाचला. मी गेले वर्षभरापासून गुजरातमध्ये राहातो आहे आणि लेखात म्हटल्याप्रमाणे येथील मुलांना डॉक्टर किंवा तंत्रज्ञ बनण्यापेक्षा सीए किंवा आíथक उलाढालीमध्ये इंटरेस्ट आहे. गुजरातमध्ये मोदींचे कमळ फुलले कारण मला वाटते की दुसरा महत्त्वाचा प्रादेशिक नेता येथे नाही. भाजपमध्येही नाही आणि काँग्रेसमध्येही नाही.
इथल्या लोकांशी बोलताना जाणवते की मोदींच्या विकासाच्या मुद्दय़ापेक्षा त्यांनी निर्माण केलेली गुजराथी अस्मिता लोकांना जास्त प्रिय आहे. इथल्या गावांमध्ये देखील मी जाऊन आलोय पण रस्ते सोडले तर बाकी विकास दिसून येत नाही. मोदींनी मोठे उद्योग जरूर आणलेत पण तेथे काम करणारे सर्वच तंत्रज्ञ बाहेरचे आहेत. त्यांनी निर्माण केलेल्या सुविधा केवळ त्या उद्योगाच्या कर्मचाऱ्यांसाठी आहेत आणि विकास पण त्यांच्या पुरता मर्यादित! इतकेच काय गांधीनगरमध्ये फेरफटका मारला तर भलीमोठी शेतजमीन अजूनही पिकवली जाते, मात्र उद्योगांमुळे त्या शेतीकडे देखील लक्ष दिले जात नाही. गुजरातमध्ये कालवे जरूर आहेत, पण कारखान्यांमधून सोडलेले दूषित पाणी वापरासाठी अपायकारक आहे. कच्छसारखे भाग अजून देखील विकासापासून दूर आहेत.
अहमदाबाद येथे मुस्लीम वस्त्यांमध्ये अजूनही सुविधा पोहोचलेल्या नाहीत. ‘बीआरटीएस’ जी मोदींची खासियत मानली जाते ती ठराविक भागासाठी आहे, मात्र या सुविधेमुळे ट्रॅफिक समस्या काही सुटलेली नाही. आणि अहमदाबाद म्हणजे संपूर्ण गुजरात नाही.
येथे खरेच कॅनव्हास खूप मोठा आहे मात्र तो नीट वापरला पाहिजे. शेवटी विकास आपण कोणत्या व्याखेने घेतो ते महत्त्वाचे! रस्ते, उद्योगधंदे आहेत म्हणजे विकास झाला की, लोकांचा विकास म्हणजे विकास ते आपल्याला ठरवलं पाहिजे.
सुयोग प्रमोद गावंड,  सहायक प्रबंधक, बँक ऑफ बरोडा, गुजरात

मोदींसाठी वातावरणनिर्मिती करणे जरुरीचे..
 गुजरातमध्ये गेल्या ५ वर्षांत आधुनिक उद्योग गुजरातमध्ये गेले नाहीत, त्याला कारण अभियांत्रिकी शिक्षणाचा अभाव हे असल्याचा समज गिरीश कुबेर यांचा ‘अन्यथा’तील लेख (२२ डिसें.) वाचून होतो. तो बरोबर असेल, पण गेली जवळजवळ १० वष्रे तिस्ता सेटलवाड व अन्य पुरोगाम्यांनी नरेंद्र मोदींना झोडपण्याचा जो वसा घेतला होता त्याला तोंड देण्यात, निस्तरण्यातच  मोदींचा पुष्कळसा वेळ वाया गेला हेही कारण असेल. पुरोगाम्यांनी घेतलेला वसा पुरा करण्याची म्हणजेच त्याच्या उद्यापनाची वेळ आलेली आहे.
या संदर्भात २२ डिसेंबरच्याच ‘लोकमानस’मध्ये प्रसिद्ध झालेल्या शिरीष धारवाडकर यांच्या पत्रातील आवाहन लक्षात घेण्यासारखे आहे. २००२चे भूत जितक्या लवकर गाडता येईल तितके बरे, म्हणजे मोदींना देशाचा विचार करायला उसंत मिळेल. मोदींनी मात्र दिल्लीत पोचण्यापूर्वी गुजरातमध्ये अभियांत्रिकी शिक्षणाबरोबर काही राहून गेलेल्या गोष्टींकडे प्राधान्याने लक्ष द्यावे. वेळ थोडा आहे पण त्यांच्या सारख्या कार्यक्षम मुख्यमंत्र्याला अवघड नाही. तसे तर सोनिया गांधी आणि युवराज राहुल गांधी यांचे मोदींना झोडपणे त्यांनी चालू ठेवायला हरकत नसावी कारण त्यामुळे मोदींचाच फायदा होत असल्याचे निष्पन्न झाले आहे. म्हणून ते आवश्यकच आहे कारण आता मोदींना गुजरातमध्ये अडकून ठेवणे योग्य होणार नाही. त्यांच्या सारख्या स्वच्छ चारित्र्याच्या आणि कणखर माणसाची आता देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी आवश्यकता आहे. भ्रष्टाचार आणि बजबजपुरीने देश रसातळाला पोचण्याच्या आधी हे होणे उचित होईल. त्यासाठी इतरांपेक्षा भाजपमधील अन्य नेत्यांनीच मोदींसाठी वातावरण निर्मिती करणे जरुरीचे आहे.
श्रीनिवास जोशी, डोंबिवली (पूर्व)

Story img Loader