गेल्या काही दिवसांत छेडछाडीच्याच नाही तर बलात्कारांच्या घटनांच्या संख्येत राजधानी दिल्ली शहरापासून इतरत्र वाढ झाल्याचं दिसून आलं आहे. याचं एक कारण आत्तापर्यंत दुर्लक्ष झाल्यामुळे गुन्हेगार अधिक धीट बनले आहेत हे आहे.
कारखान्यांमधून होणाऱ्या अपघातांविषयी एक अनुभवसिद्ध नियम आहे. लहान लहान अपघातांची काही ठराविक संख्या झाली की एक मोठा अपघात होतो. यात गूढ असं काही नाही. लहान अपघातांकडे लहान म्हणून दुर्लक्ष होत राहतं. दुर्लक्ष करण्याची सवय झाली की नुसती लहान अपघातांची संख्याच वाढते असं नाही, तर जरा मोठे अपघातही लहानच वाटायला लागतात नि सतर्कता अधिकाधिक शिथिल होत जाते. ही वाढत जाणारी शिथिलता मोठय़ा अपघातास वाट करून देते. स्त्रियांच्या बाबतीत होणाऱ्या लंगिक छळणुकीच्या अपराधांनाही हाच नियम लागू पडतो. क्षुल्लक म्हणून छेडछाडीच्या प्रकारांकडे दुर्लक्ष केलं की, ‘छेडछाड केली तरी आपलं काही बिघडत नाही’ असा संदेश प्रसृत होतो व दुसरे कोणी त्यापुढचं धाडस करायला प्रवृत्त होतात. सवयीप्रमाणे त्याहीकडे ‘क्षुल्लक’ म्हणून दुर्लक्ष झाल्यास ‘हे पण चालतंय’ असं वातावरण तयार होतं व आणखी कोणी पुढच्या पायरीवरचं धाडस करायला प्रवृत्त होतात. अशा प्रकारे दुर्लक्ष व अपराधाचं धाडस यांचं दुष्टचक्र तयार होऊन त्याचं पर्यवसान कुणीतरी बलात्काराचं धाडस करण्यात होतं.
महिलांवरच्या अत्याचारांच्या बाबतीत आणखी एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात घेतला जात नाही, तो म्हणजे समाजातली वैचारिक विसंगती. ज्या समाजात सामाजिक स्थर्यासाठी पुरुषांनी नसíगक असलेली कामेच्छा नियंत्रणात ठेवण्याची अपेक्षा असते, त्याच समाजात हे नियंत्रण झुगारून द्यायला प्रवृत्त करणारे प्रभावी संदेशही कळत नकळत प्रसृत होत असतात. झगमगाटी दुनियेत वावरणाऱ्या स्त्री-पुरुषांच्या ‘सेक्सी’पणाचं प्रसारमाध्यमांतून जाहीर कौतुक होत असतं. फॅशन नि कलात्मकतेच्या नावाखाली अंगप्रदर्शन घडवणाऱ्या व पुरुषांचं लक्ष वेधून घेणाऱ्या नि त्यांना उद्दीपित करणाऱ्या वेशभूषेला प्रतिष्ठा मिळते. त्याचवेळी, निर्माण होणाऱ्या बहुतेक चित्रपटांमधून स्त्रियांवर छाप पाडण्यात छेडछाडीच्या स्वरूपातला आक्रमक पुरुषीपणा यशस्वी झाल्याचं दाखवलेलं असतं. वागणुकीतल्या साधेपणाचा नि सभ्यपणाचा उपहास होतो.थोडक्यात, छेडछाडीच्या प्रकारांतून सुरू होणारी अपराध प्रक्रिया बलात्कारात परिणत होत असते. चित्रपट, अंगप्रदर्शन करणारी कपडय़ांची फॅशन, झगमगाटी दुनियेला वाहून घेतलेली प्रसारमाध्यमं नि व्यक्तिस्वातंत्र्याच्या नावाखाली स्वैराचाराचं समर्थन या गोष्टी बलात्काराचा थेट संदेश देत नसल्या, तरी छेडछाडीचा विषाणू समाजात फैलावत असतात व त्याचेच दूरगामी परिणाम म्हणून बलात्काराच्या घटना घडतात.
शरद कोर्डे, वृंदावन, ठाणे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा