‘आयएनएस विक्रांत’सारख्या विमानवाहू नौका बांधण्याचं कौशल्य ज्या देशांत विकसित झालं तिथं काय करतात अशा जुन्याजर्जर नौकांचं? ऐकवणार नाही सांगितलं तर; पण तरी सांगायलाच हवं..
किती केविलवाणी दिसत होती ती.. थकलेली. जराजर्जर. वयही चांगलंच झालं होतं तिचं. एके काळी ज्यासाठी तिचा दरारा होता त्या सगळय़ा चीजा, ऐवज काढून घेतलेल्या. दागिन्यांनी कायम मढलेली एखादी स्वरूपवान आणि वैभवसंपन्न स्त्री उत्तरायुष्यात केवळ आलवणावर दिसली की जसं काळजात चर्र होतं.. तसं तिला बघून होत होतं. कशी ओकीबोकी दिसत होती. आणि मुख्य म्हणजे तिला चालवतही नव्हतं. त्यामुळे पुढे एक निर्बुद्ध भासेल असा तगडा हौदा तिला मनगटाएवढय़ा लोखंडी साखळय़ा बांधून ओढून फरफटत नेत होता. आणि ती आपली चालली होती.. अशा अवस्थेत तिला पाहून कल्पनाही आली नसती कोणाला काय तिचा दिमाख होता एके काळी त्याची..    
ही आयएनएस विक्रांत. आपली पहिली विमानवाहू युद्धनौका. १९७१च्या युद्धात मोलाची कामगिरी बजावलेली. बांगलादेशाला पाकिस्तानपासून जिनं यशस्वीपणे तोडलं, ती हीच. चितगाव आणि आसपासची बांगलादेशी बंदरं जिनं एकहाती बेचिराख केली ती विक्रांतच. छोटय़ाशा सी हॉक विमानांना घेऊन तिनं जी काही झपाटय़ानं हालचाल केली, तिला भारताच्या युद्ध इतिहासात तोड नाही. आणि मुख्य म्हणजे या नौकेवरचं एकही विमान जायबंदी झालं नाही. पण तिनं मात्र शत्रूचं कंबरडं मोडलं. भारताच्या लष्करी इतिहासात तिचं नाव अगदी सुवर्णाक्षरात नोंदलं गेलंय.
त्यामुळेच तिला वाचवावं, तिच्यावर स्मृतिसंग्रहालय करावं अशी राष्ट्रभक्तांची मागणी आहे. आपल्या देशात त्यांचा तसा कधीच तुटवडा नसल्यामुळे देशाच्या कोणत्या ना कोणत्या कोपऱ्यात कसलं ना कसलं स्मारक व्हावं अशी मागणी सारखीच येत असते. स्मारकाचा मामला तसा भावनेचा असतो. त्यामुळे अमुक एखाद्याचं स्मारक करा असं म्हटलं कोणी की कोणीही विरोधी सूर लावायच्या फंदात पडत नाही. उगा देशद्रोही म्हणून बालंट यायचं. पण कधी तरी तार्किक विचाराचा प्रयत्न करायला काय हरकत आहे?
तसा तो केला तर स्मारक करून विक्रांतचं जतन खरोखरच करावं का, असा प्रश्न पडायला हरकत नाही.
याचं पहिलं महत्त्वाचं कारण म्हणजे तिचं नाव जरी विक्रांत होतं, तरी ती मूळची आपली नव्हती. तिचा जन्म ब्रिटनमधला. दुसरं महायुद्ध ऐन भरात असताना. तिचं तेव्हाचं नाव होतं हक्र्युलिस. दुसऱ्या महायुद्धात गरज लागली तर असावी म्हणून तिची निर्मिती सुरू झाली. ही १९४३ सालची घटना. परंतु ती स्वतंत्रपणे उभं राहीपर्यंत दुसरं महायुद्ध संपलं. तेव्हा मग काही ब्रिटनला तिची गरज लागली नाही. आणखी दहाएक वर्षांनी मग तिला विकून टाकण्याचा प्रयत्न झाला. तेव्हा मग ती भारताने घेतली. माजी पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांच्या भगिनी विजयालक्ष्मी पंडित या त्या वेळी ब्रिटनमध्ये भारताच्या राजदूत होत्या. त्यांनी तिचा स्वीकार करताना त्यांनी तिचं नव्यानं नामकरण केलं. शाही नौदलातली हक्र्युलिस बनली आयएनएस.. म्हणजे इंडियन नेव्हल शिप.. विक्रांत. सर्व सोपस्कार पूर्ण करून ती भारतात मुंबईच्या माझगाव गोदीत जेव्हा १९६१ सालच्या नोव्हेंबर महिन्यात आली तेव्हा तिचं स्वागत करायला साक्षात पंडित जवाहरलाल नेहरू हजर होते. खरं तर इतका इतिहास पाहिलेल्या विक्रांतचं वय तसं झालंच होतं. त्यामुळे तिला मोडीत काढण्याचा निर्णय झाला खरा. परंतु तो अनेकांना पचला नाही.
विक्रांत? आणि मोडीत? एका वर्गाला ते पटणारच नव्हतं. निसर्गनियमानुसार मर्त्य मानवाला मिळणारी मुक्तीची सोय विक्रांतला देऊ नये, असं आताही अनेकांना वाटतंय. तिला तसंच तरंगत ठेवावं, तिच्यावरती स्मृतिसंग्रहालय उभारावं असं या मंडळींचं म्हणणं आहे.     
तसं हे आपल्याकडच्या स्मारकानुयायी वातावरणाला साजेसंच म्हणायचं! पण अशा विमानवाहू नौका बांधण्याचं कौशल्य ज्या देशांत विकसित झालं तिथं काय करतात अशा जुन्याजर्जर नौकांचं?
ऐकवणार नाही सांगितलं तर.
पण तरी सांगायलाच हवं.    
चक्क बुडवतात. म्हणजे जुन्या युद्धनौकांना शांतपणे जलसमाधी दिली जाते. अगदी अमेरिका, इंग्लंड, पोर्तुगाल या आणि अशा दर्यावर्दी देशांसह अनेक मोठय़ा देशांत हीच पद्धत असते. मग ती मोडीत का नाही काढत? तसं करायचं तर त्यासाठी खर्च खूप येतो. तो परवडत नाही. त्यामुळे भरसमुद्रात नेऊन या निवृत्त नौका सरळ बुडवल्या जातात. त्यासाठी विमानांतून तोफगोळ्याचा किंवा पाणबुडीतनं बॉम्ब फेकण्याचा वगैरे मार्ग असतो. गेल्या दहा वर्षांत एकटय़ा अमेरिकेने ८० हून अधिक युद्धनौकांना समुद्राच्या तळाशी पाठवलेलं आहे. २००३च्या आखाती युद्धात बेला वुड या अजस्र नौकेनं अमेरिकेसाठी महत्त्वाची कामगिरी बजावली. ही पाण्यातनं जमिनीवरही चालू शकेल अशी उभयधर्मी नौका. हेलिकॉप्टर आणि प्रचंड युद्धसामग्री वाहून नेण्याची तिची जबाबदारी होती. पण तिचंही वय झालेलं. एक वर्ग असा होता की त्याला वाटत होतं बेला वुड प्रशिक्षण नौका म्हणून किंवा काही नाही जमलं तरी निदान वस्तुसंग्रहालय म्हणून तरी तिला तरंगत ठेवावं. अमेरिकी सरकारनं त्याकडे दुर्लक्ष केलं. तिला सांभाळायचं तर त्यासाठी किती खर्च करावा लागेल याचा तपशील अमेरिकी नौदलानं जाहीर केला. तेव्हा लोकांना लक्षात आलं हिला तरंगत ठेवायचं असेल तर किती खर्च करावा लागेल ते. मग लोकांना ते पटलं. अखेर तिलाही जलसमाधी देण्यात आली. व्हॅलीफोर्ज हीदेखील अशीच नौका. अजस्र तोफा वाहणारी. पण तीही समुद्रतळी पाठवली गेली. दुसऱ्या महायुद्धापासून आजतागायत अमेरिकेनं वेगवेगळ्या आकाराच्या जवळपास दोन हजार युद्धनौकांना गंगार्पणमस्तु म्हणत निरोप दिलाय.
यावर एक प्रतिक्रिया अशीही येईल की.. या तशा साध्या नौका आहेत.. विमानवाहू नौकेची गोष्टच वेगळी वगैरे. पण तसं नाही. विक्रांतपेक्षाही अजस्र अशा नौकाही याच मार्गानं निकालात काढण्यात येतात. याचं सगळ्यात मोठं, ठसठशीत उदाहरण म्हणजे यूएसएस एंटरप्राइज ही अमेरिकेची पहिली अजस्र नौका. ती किती अजस्र होती? तर तिच्यावर आठ अणुभट्टय़ा होत्या आणि ती जगातली सर्वात लांब म्हणता येईल अशी युद्धनौका होती. पन्नासच्या दशकात जलावतरण झालेल्या एंटरप्राइजने अमेरिकेसाठी ऐतिहासिक कामगिरी बजावली होती. १९६२ सालातला क्युबन क्षेपणास्त्र संघर्ष, व्हिएतनाम, १९६७ चं आखातातलं इस्रायली युद्ध.. अशा अनेक महत्त्वाच्या जलसंग्रामात एंटरप्राइजचा निर्णायक वाटा होता. १९७७ सालातलं इदी अमीन याच्या विरोधातलं ऑपरेशन एंटेबे आठवतंय? त्या वेळी इस्रायली सैनिक ओलिसांची सुटका करण्याची धाडसी मोहीम फत्ते पार पाडत असताना दूर तिकडे समुद्रात एंटरप्राइजही सज्ज होती. वेळ पडलीच असती तर याही कारवाईसाठी ती तयार होती.     
तर इतकी ऐतिहासिक युद्धनौका अमेरिकेनं गेल्या वर्षी निकालात काढली. तिचं संग्रहालय वगैरे करण्याचा विचारही सरकारनं केला नाही. का? कारण त्याचासुद्धा खर्च प्रचंड असतो. त्यापेक्षा ती निकामी करणं परवडतं. एंटरप्राइज तर इतकी प्रचंड आहे की तिच्यावरचं सामानसुमान, शस्त्रास्त्रं आणि मुख्य म्हणजे अणुभट्टय़ा हे सर्व काढून ती रिकामी करायलाच चार र्वष लागणार आहेत. ती रिकामी करण्यावर आणि हे धूड आणणं आणि नेणं यासाठी नौदलाला काही लाख डॉलर्सचा खर्च आहे. आणि ती एकदाची रिकामी झाल्यावर?
मग काही नाही. ९० हजार टनांचं हे अजस्र प्रकरण कापून, तोडून तिची विल्हेवाट लावली जाणार आहे.     
तेव्हा मुद्दा इतकाच की हे असे निर्णय भावनेच्या भरात घ्यायचे नसतात. भावनेचासुद्धा भाव मोजावा लागतो. त्याची तयारी आहे का हा प्रश्न आहे.

Story img Loader