तंत्रज्ञानदृष्टय़ा पिछाडीवर पडलेल्या ‘मिग २१’ विमानाचे आयुर्मान संपुष्टात येऊनही त्याला विश्रांती देण्यासाठी आधुनिक लढाऊ विमानांची तत्परतेने उपलब्धता करण्याचे औदार्य कधी दाखविले गेले नाही. त्यामुळे ती कार्यरत ठेवणे भाग पडले. मग थकलेल्या या विमानांचे एकामागोमाग एक अपघात होत गेले. त्यात तरुण वैमानिक गमवावे लागले आणि दोष आला तो प्रदीर्घ काळ सेवा बजावणाऱ्या ‘मिग २१’च्या माथी. सेवेतून निवृत्त झाल्यामुळे अपघातांच्या भोवऱ्यात सापडलेल्या या विमानांच्या विषयाला पूर्णविराम मिळाला. ध्वनीहून अधिक वेगाने मार्गक्रमण करणारे भारतीय हवाई दलाचे हे पहिले लढाऊ विमान. अगदी शेवटच्या कारगिल युद्धातही ते सक्रिय होते. अपघातांमुळे वादग्रस्त झालेल्या मिग २१ने अनेक समर प्रसंगांत चमकदार कामगिरी केली. या विमानांमुळेच लढाऊ विमाने बांधणीसाठी देशांतर्गत पायाभूत व्यवस्था उभारणीस चालना मिळाली. आज देशांतर्गत ‘सुखोई एमकेआय ३०’ची बांधणी आणि पाचव्या पिढीतील लढाऊ विमानाचा विकास असे जे काही शक्य झाले त्याची पायाभरणी खऱ्या अर्थाने या विमानाने केली. कोणत्याही लढाऊ विमानाचे सर्वसाधारणपणे पाच ते सहा हजार उड्डाण तास आयुर्मान मानले जाते. या आयुष्यात काही विशिष्ट तासांचा टप्पा गाठल्यावर त्याची विस्तृत स्वरूपाची दुरुस्ती प्रक्रिया करावी लागते. मिग २१ने असे किती टप्पे पार केले याची कल्पनाही करता येणार नाही. आज भारतीय हवाई दलाकडे सुखोई, मिराज, मिग २९, मिग २७, जॅग्वार अशी लढाऊ विमानांची फौज असली तरी एक असा काळ होता की, दलाची संपूर्ण भिस्त केवळ आणि केवळ मिग २१वरच होती. या विमानाच्या खरेदी वेळी ‘तंत्रज्ञान हस्तांतरण’चा करार झाल्यामुळे पुढे ती देशातच बांधणीची संधी मिळाली. पुढील दोन ते तीन दशकांत हवाई दलात थोडीथोडकी नव्हे तर, वेगवेगळ्या प्रकारची तब्बल ९५० मिग विमाने दाखल झाली. साडेचार दशकांत त्यातील निम्मी अपघातग्रस्त झाली. या दुर्घटनांमध्ये १७१ वैमानिकांसह अन्य ४९ जणांना प्राण गमवावे लागले. वारंवार घडणाऱ्या दुर्घटनांमुळे मिग २१कडे ‘उडत्या शवपेटय़ा’ म्हणून पाहिले गेले. हवाई दलातील या विमानांना निवृत्त करावे याकरिता हवाई दलाच्या एका अधिकाऱ्याने न्यायालयाचे दरवाजे ठोठावले. आता निवृत्तीमुळे या ससेमिऱ्यातून मिग २१ची सुटका झाली आहे. या विमानाच्या निवृत्तीमुळे हवाई दलाच्या ताफ्यातील लढाऊ विमानांचा असमतोल दूर करणे अनिवार्य ठरणार आहे. विमानांची कमतरता भरून काढण्यासाठी रशियाकडून आधी ५० सुखोई विमाने खरेदी करण्यात आली होती. त्यानंतर त्यांची बांधणी एचएएलच्या नाशिक प्रकल्पात सुरू झाली. एचएएल आणि हवाई दल यांच्यातील करारानुसार प्रथम १४० आणि नंतर ४० अशा एकूण १८० सुखोई विमानांपैकी आतापर्यंत १२० विमाने हवाई दलाच्या ताफ्यात समाविष्ट झाली आहेत. या व्यतिरिक्त रशियाच्या सहकार्याने विकसित केले जाणारे पाचव्या पिढीतील लढाऊ विमान, स्वदेशी बनावटीचे तेजस आणि अन्य राष्ट्रांकडून खरेदी केली जाणारी अन्य काही लढाऊ विमाने यावर हवाई दलाची भिस्त राहील. परंतु ही प्रक्रियाच रेंगाळते. त्यामुळे मिग २१सारख्या विमानांवर नाहक भार येतो. भविष्यात या विषयावर विचार झाला तरी पुष्कळ.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा