ब्रिटनसारख्या देशाच्या पंतप्रधानांनी मायदेशास ख्रिस्ती देश असे म्हणवण्याची भूमिका घेतल्याने तेथे मोठी झोड उठली आहे.  वयाची पंचविशीही न गाठलेल्यांपैकी ३२ टक्के तरुणांनी आम्हाला कोणताही धर्मविचार मंजूर नाही, असे स्पष्ट केल्याने आपल्या अस्तित्वाची काळजी चर्चमधील ख्रिस्ती धर्मपंडितांना वाटणे साहजिक आहे, परंतु त्यांची चिंता करणे हे काही पंतप्रधानांचे कार्य नाही.
निवडणुकांना सामोरा जाणारा भारत धर्माच्या प्रश्नावर विभागला कसा जाईल यासाठी प्रयत्न होत असताना आपण लोकशाहीचे प्रारूप ज्या देशाकडून घेतले त्या ग्रेट ब्रिटनमध्येही धर्म चर्चेने सामाजिक अवकाश व्यापले असून सत्ताधाऱ्यांनी विशिष्ट धर्माची कास धरावी का, हा प्रश्न मोठय़ा प्रमाणावर चर्चिला जात आहे. यास कारण ठरले आहेत ते खुद्द ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून. ख्रिस्ती धर्मीयांसाठी पवित्र असलेला ईस्टर संडे साजरा करताना कॅमेरून यांनी केलेल्या भाषणाचा खर्डा चर्च टाइम्स या धार्मिक प्रकाशनात लेखस्वरूपात छापला गेला असून त्यात त्यांनी स्वत:च्या ख्रिस्ती धर्माचे गुणगान गायले आहे. धर्माच्या आधारामुळे माझ्या मनास शांती मिळते, असे कॅमेरून या लेखात म्हणतात. मनाच्या शांतीसाठी कोणी काय करावे हा ज्याचा-त्याचा प्रश्न आहे. लोकशाही समाजात वैयक्तिक पातळीवर शांतीची आराधना करण्यासाठी कोणाही व्यक्तीस अनेक मार्ग उपलब्ध असतात. त्यात गैर काही नाही. परंतु पंतप्रधानपदावरील व्यक्तीने कोणत्या मार्गाने मन:स्वास्थ्य टिकवावे आणि ज्या मार्गाने ते टिकवले जात असेल त्याची किती भलामण करावी यास मर्यादा येतात. त्या मर्यादांचे पालन कॅमेरून यांच्याकडून झाले असे म्हणता येणार नाही. याचे कारण त्यांचा हा संपूर्ण लेख. कॅमेरून यांचे धर्मप्रेम केवळ मन:शांतीपुरतेच मर्यादित राहिले असते तर ते एक वेळ क्षम्य मानता आले असते. कॅमेरून यांना ब्रिटनमधील संपूर्ण राजकारणावरच ख्रिस्ती धर्माचा अंमल असावयास हवा असे वाटते. ‘ब्रिटिशांनी आपल्या ख्रिस्ती धर्म संबंधांबाबत अधिक जागरूक असावयास हवे. एक देश म्हणून आपण ख्रिस्ती आहोत, याचा आपण अभिमान बाळगावयास हवा आणि या धर्मामुळे आपण काय करू शकतो हे अन्यांस समजावून सांगावयास हवे,’ असे या ब्रिटिश पंतप्रधानांस वाटते. ते एवढेच म्हणून थांबत नाहीत. त्यांचा आग्रह असा की ब्रिटनमधील राजकारण आणि समाजकारणात चर्चच्या धर्मसत्तेने अधिकाधिक क्रियाशील भूमिका बजावायला हवी आणि सरकारनेही धर्मश्रद्धा आधारित संस्थांना त्यांच्या कार्यासाठी अधिक मदत द्यावयास हवी. आणि हे केवळ ब्रिटनच्या सीमारेषांपुरतेच मर्यादित राहायला हवे असे नाही. आसपासच्या अनेक देशांत या कार्यासाठी रसदपुरवठा करण्याची गरज कॅमेरून बोलून दाखवतात. त्यातही एका विशिष्ट पंथाबाबत कॅमेरून आग्रही आहेत. ख्रिस्ती धर्मातील शुभवर्तमानवादी (इव्हांजेलिकल) हे त्यांना अधिक जवळचे वाटतात. त्यांची धर्मनिष्ठा, मानवतेवरचे प्रेम, कष्ट करण्याची तयारी आणि अन्य जीवितांविषयी असलेली सहवेदना या गुणाने कॅमेरून भारून गेले आहेत. एक व्यक्ती म्हणून त्यांना अर्थातच हे स्वातंत्र्य आहे. परंतु ते केवळ एक सर्वसाधारण व्यक्ती नाहीत. ब्रिटनसारख्या एके काळची महासत्ता असलेल्या देशाचे ते पंतप्रधान आहेत त्याचमुळे मायदेशास ख्रिस्ती देश असे म्हणवण्याचे त्यांचे कृत्य चिंता वाढवणारे आहे. या बाबतीत त्यांनी अमेरिकेचे माजी अध्यक्ष जॉर्ज बुश यांची बरोबरी करण्याचे कारण नाही. बुश यांचे अध्यक्षीय वर्तनदेखील साध्या वेशातील ख्रिस्ती धर्मप्रचारकासारखे होते आणि त्यांच्याच कारकिर्दीत जगात धर्माधतेला गती आली. याबाबतीत बुश यांची बरोबरी आपल्याकडील प्रवीण तोगडिया अथवा ओवेसी यांच्याशी होऊ शकेल. बुश यांच्या रिपब्लिकन पक्षाच्या प्रचार सभेत एका उमेदवाराचा मोबाइल फोन वाजला तर त्याने आपणास परमेश्वराकडून फोन आल्याचे सांगितले आणि उपस्थितांच्या टाळ्या घेतल्या. तेव्हा बुश यांचे सर्वच काही कॅमेरून यांनी घेण्याची गरज नाही. असे ज्यांना वाटते त्यांच्याकडून कॅमेरून यांच्या विधानावर ब्रिटनमध्येच मोठी झोड उठली असून ब्रिटिश पंतप्रधान देशांत धार्मिक तेढ वाढवू इच्छितात काय, असा प्रश्न विचारला जात आहे.
याचे कारण असे ब्रिटनमध्ये राजसत्ता ही शासनप्रमुख असली तरी धार्मिक बाबतीत तिचे स्थान अगदी नाममात्र आहे. ब्रिटनमध्ये स्वतंत्र इंग्लिश चर्चचे प्राबल्य असून त्यास अँग्लिकन चर्च असे म्हणतात. ही एका अर्थाने रोमन चर्चचीच शाखा असली तरी ती आपले स्वतंत्र अस्तित्व आणि ओळख टिकवून आहे. इसवी सनाच्या चौथ्या शतकात ब्रिटनमधून रोमन साम्राज्यास गाशा गुंडाळावा लागल्यावर स्थानिक गरजांना अनुलक्षून अँग्लिकन चर्च अस्तित्वास आले. त्याच्या प्रमुखाची नियुक्ती ही ब्रिटनच्या राणीकडून केली जात असली तरी ही व्यवस्था अगदी केवळ नामधारी आहे. ब्रिटिश राजसत्तेचे धर्मसत्तेबाबतचे कर्मकांड एवढय़ावरच संपते. चर्चच्या कोणत्याही व्यवहारात ब्रिटनच्या राजघराण्याची लुडबुड नसते आणि विवाह, राज्यारोहण वा राजघराण्यात जन्मलेल्यांचे नामकरण आदी सोहळे सोडल्यास धर्मसत्ताही राजसत्तेत लुडबुड करावयास जात नाही. यामुळे ब्रिटन एक मुक्त, प्रगल्भ देश बनला असून जगभरातील सर्व धर्म आणि पंथांच्या लोकांना तो आपलासा वाटतो. औद्योगिक क्रांतीपासून वैचारिक जगातील क्रांतीपर्यंत जगाचे नेतृत्व एके काळी ब्रिटनने केले. याबाबत त्या देशाचे कौतुक असे की धर्म ही अफूची गोळी आहे असे प्रतिपादन करणाऱ्या कार्ल मार्क्स यास ब्रिटनच आपला वाटतो आणि तेलामुळे आलेल्या प्रचंड आर्थिक ताकदीचा धार्मिक मद मिरवणाऱ्या अरब शेखांनाही ब्रिटनच जवळचा वाटतो. ही मुक्त आणि सशक्त विचारधारा हे ब्रिटनचे वैशिष्टय़ होते आणि आहे. अशा वातावरणात धर्म अर्थातच मागे पडतो. ब्रिटनमध्ये हेच घडले आणि त्यामुळे चर्चमध्ये नियमितपणे जाणाऱ्यांची संख्या रोडावली. अधिकृत सरकारी आकडेवारीनुसार दर रविवारच्या पारंपरिक प्रार्थनेत आकाशातल्या बापाची करुणा भाकण्यासाठी संपूर्ण ब्रिटनभर आठ लाख ब्रिटिश ख्रिस्तीदेखील गिरिजाघरांत जमत नाहीत. गेल्या दहा वर्षांत ब्रिटनमध्ये ख्रिस्ती धर्मीयांची संख्या चाळीस लाखांनी घटली अशीही माहिती या आकडेवारीतून समोर येते. त्याच वेळी बुद्धिप्रामाण्यवाद्यांना आनंद वाटावा आणि धर्ममरतडांना काळजी वाटावी अशी बाब म्हणजे वयाची पंचविशीही न गाठलेल्यांपैकी तब्बल ३२ टक्के तरुणांनी आम्हाला कोणताही धर्मविचार मंजूर नाही, असे स्पष्ट केले आहे. तेव्हा अशा वेळी आपले काय होणार याची काळजी चर्चमधील ख्रिस्ती धर्मपंडितांना वाटत असेल तर ते एका अर्थाने साहजिकच म्हणावयास हवे.
परंतु त्यांची काळजी करणे हे पंतप्रधानाचे कार्य नाही. धर्माचीच काळजी करावयाची तर कॅमेरून यांनी राजवस्त्रे उतरवून धर्म प्रचाराच्या कार्यात स्वत:ला झोकून द्यावे. राजसत्तेचा आसरा घ्यावयाचा आणि धर्मकारण करावयाचे हा उद्योग मध्ययुगीन काळात अनेकांनी केला. किंबहुना रोमचे साम्राज्य प्रस्थापित झाले तेच मुळी धर्मसत्तेच्या आधाराने, हे नाकारता येणार नाही. इतिहासात डोकावल्यास हेही जाणवेल की एके काळी धर्मदंड बाळगणाऱ्या पोप यांच्याकडेच राजदंडही होता. परंतु तेराव्या-चौदाव्या शतकात झालेल्या सांस्कृतिक पुनरुत्थानाने इतिहासाची दिशा बदलली आणि मानवी संस्कृतीची धर्मसत्तेच्या कचाटय़ातून मुक्तता झाली. एके काळी पृथ्वी गोल आहे आणि ती सूर्याभोवती फिरते हे वास्तव नमूद करणाऱ्या गॅलिलिओस ख्रिस्ती धर्ममरतडांकडून जाच सहन करावा लागला तरी त्याच गॅलिलिओ प्रतिनिधित्व करीत असलेल्या युरोपीय संस्कृतीने जग समृद्ध केले. हे झाले ते मुख्यत: संस्कृतीवरील धर्माचे जोखड फेकले गेले म्हणून. अशा वेळी इतिहासाचे चक्र मागे फिरवण्याचे पाप कॅमेरून यांनी करू नये. ‘गर्व से कहो..’ ची ही ब्रिटिश आवृत्ती न निघाल्यास बरे.

Story img Loader