एवीतेवी जगाची भाषा इंग्रजीच, मग बाकीच्या भाषा शिकायच्याच कशाला, हा विचार मांडणाऱ्यांवर मुद्देसूद टीका झाली.. हे मुद्दे केवळ शाब्दिक नाहीत.. जगातले अनेक देश आपापल्या भाषा नीट जपताहेत, इंग्लिशचा द्वेष न करता!
गेल्या आठवडय़ात ‘लोकसत्ता’च्या ‘व्हिवा लाऊंज’मध्ये गौरी शिंदे आली होती. ‘इंग्लिश विंग्लिश’ची दिग्दर्शिका. खूप मुली, महिला जमल्या होत्या तिच्याशी गप्पा मारायला. नोकरी करणाऱ्याही खूप जणी होत्या. सगळ्यांच्या आठवणींचा एकच समान धागा. इंग्रजी नीट येत नसल्यानं आपली झालेली त्रेधातिरपीट आणि साहेबाच्या भाषेवर हुकमत नसल्यानं आपण कसं मागे पडलो आणि पुढे येण्यासाठी किती संघर्ष करावा लागला वगैरे. ते ऐकलं आणि ‘न्यूयॉर्क टाइम्स’मध्ये अलीकडेच प्रसिद्ध झालेल्या एका बातमीची आठवण झाली.
हार्वर्ड विद्यापीठाचे माजी अध्यक्ष लॉरेन्स समर्स यांची ती मुलाखत होती. समर्स यांचं नाव विद्यापीठ व्यवस्थापन क्षेत्रात आदरानं घेतलं जातं. गृहस्थ व्यासंगी. अमेरिकेचे माजी अध्यक्ष बिल क्लिंटन यांचे ते वित्तमंत्री होते. जागतिक बँकेचे ते मुख्य अर्थतज्ज्ञ होते आणि बराक ओबामा यांच्या अध्यक्षपदाच्या पहिल्या टप्प्यात ते अमेरिकेच्या राष्ट्रीय अर्थशास्त्र परिषदेचे अध्यक्ष होते. तेव्हा बाकी कशापेक्षाही अर्थशास्त्र त्यांच्या रक्तात मुरलेलं. साहजिकच जगाकडे अर्थशास्त्राच्या चष्म्यातूनच बघायची सवय. तर त्यांनी त्या मुलाखतीत समस्त विद्यापीठांना सूचना केली होती. काय? तर तुमच्या तुमच्या विद्यापीठांत परदेशी भाषा विषयाचे जे जे विभाग असतील ते सगळेच्या सगळे बंद करा आणि पैसे वाचवा.
पण ते पैसे वाचवून करा काय?
तर इंग्रजी भाषेचे विभाग अधिक सक्षम करा.
या समर्स यांचं म्हणणं असं की.. काय करायचंय परदेशी भाषा शिकून.. जगात सगळे जण आता मोठय़ा प्रमाणावर इंग्रजीच शिकू लागलेत.. इंग्रजीचा टक्का चांगलाच वाढतोय. जागतिकीकरणाच्या रेटय़ात अधिकाधिक देश इंग्रजी शिकू लागलेत. अमेरिकेच्या एखाद्या कंपनीच्या प्रमुखाला भारतात जाऊन व्यवसाय करायचाय, डॉक्टरला आफ्रिकेत रुग्णालय सुरू करायचं आहे.. तर त्यासाठी हवं आहे ते इंग्रजीचं ज्ञान. दावोस या स्वित्र्झलडमधल्या आल्प्सच्या कुशीतल्या शहरात दर वर्षी जागतिक आर्थिक संघटनेची मोठी परिषद भरते. त्या ठिकाणी जमणारे राष्ट्राराष्ट्रांचे प्रमुख, पत्रकार, अभ्यासक वगैरे सगळे एकाच भाषेत बोलतात, ती म्हणजे इंग्रजी. अशा वेळी या परदेशी भाषा वगैरे शिकण्यात काहीही अर्थ नाही.. फक्त इंग्रजी शिका. प्रगतीसाठी तेवढंच पुरे आहे.
म्हणजे तिकडेही तेच.
समर्स हे जे काही सांगत होते, ते तिथे अलीकडच्या काळात दिसू लागलं आहे. अल्बानी विद्यापीठानं काटकसरीचा भाग म्हणून आपल्याकडचा अन्य भाषा विभाग बंद केलाय. चांगलं श्रीमंत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या साऊथ कॅलिफोर्निया विद्यापीठानं २००८ साली जर्मन भाषा विभाग बंद केला. जगातली ११ व्या क्रमांकाची, जगातल्या चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था. बाकी काही विभागांनी वेगवेगळ्या भाषा विभागांना परदेशी भाषा केंद्र असं म्हणत एकाच छत्रीखाली आणलंय. इतर काहींनी त्याच दिशेनं तयारी सुरू केलीय.
कोणत्या भाषा विभागांना या मंडळींनी कात्री लावलीये?
फ्रेंच, इटालियन, रशियन आणि प्राचीन भाषा, म्हणजे लॅटिन वगैरे.
समर्स यांच्या मतावर अमेरिकेत भाषातज्ज्ञ, समाजाभ्यासक यांनी टीकेची झोड उठवलेली आहे. त्याचा वेध घेणं आपल्यासारख्या धेडगुजरी भाषकांच्या देशात सयुक्तिक ठरेल. अनेकांनी समर्स यांच्या मताचा इतका शास्त्रशुद्ध प्रतिवाद केलाय. त्यांचं म्हणणं की, जगात भाषेचं वैविध्य असायलाच हवं. ज्या ज्या देशांवर इंग्रजांचं राज्य नव्हतं, त्या त्या देशांत इंग्रजीचा प्रभाव वाढता असला तरी ती त्या त्या देशांत दुसरी भाषा म्हणूनच आहे. भारतात गेल्या वर्षी तब्बल २३ भाषांत १२७४ सिनेमे बनवले गेले. त्यातले २१५ हिंदीत होते, २०२ तामिळ, १८१ तेलुगु, १४३ कन्नड आणि ११६ मराठी. या चित्रपटांचं.. म्हणजे ते बनवणाऱ्यांचं आणि पाहणाऱ्यांचं.. इंग्रजीशिवाय काहीही अडलं नाही. आपल्यासारखाच मोठा सांस्कृतिक वारसा असणाऱ्या टर्कीमध्ये आज प्रचंड प्रमाणावर फ्रेंच शिकलं आणि शिकवलं जातं. ते काही ऑटोमन साम्राज्यावर फ्रेंचचा प्रभाव होता म्हणून नव्हे, तर आधुनिक काळात व्यक्त व्हायला फ्रेंच ही खऱ्या अर्थानं तटस्थ भाषा आहे, असं तिथं अनेकांना वाटतं म्हणून. जगभरात अलायन्स फ्रांसेच्या शाखांत फ्रेंच शिकण्यासाठी तरुणांची संख्या वाढतीच आहे आणि खुद्द अमेरिकेत भाषेचा वाढता प्रभाव आहे तो स्पॅनिशचा. एक तर कोलंबसामुळे अमेरिकेत हिस्पॅनिक्सचं प्रमाण मोठंच आहे. त्यांचा मोठा दबाव गट त्या देशात आहे. इतका की, काही प्रांतांत सरकारी वैद्यक सेवेत काम करणाऱ्या डॉक्टराला एक वेळ इंग्रजी आलं नाही तरी चालेल, पण स्पॅनिश यावंच लागतं.     आणि चीनचं काय? जगात इंटरनेटचा वापर करणाऱ्यांची संख्या भीती वाटावी इतक्या गतीनं वाढतीये. या माध्यमाची भाषा इंग्रजीच असते असं आपलं आपण मानतो. काही प्रमाणात ते खरंही आहे. गेल्या वर्षभरात इंटरनेटचा वापर इंग्रजीत करणाऱ्यांची संख्या ३०१ टक्क्यांनी वाढली. म्हणजे इंग्रजीचा वेग भलताच म्हणायला हवा. अन्य भाषांतून इंटरनेट वापरणारेही वाढले.
किती टक्क्यांनी?
चिनी भाषेत इंटरनेटच्या महाजालात मुशाफिरी करणाऱ्यांचं प्रमाण १४७८ टक्क्यांनी वाढलं. म्हणजे इंग्रजीचा प्रसार ३०१ टक्क्यांनी, तर चिनी भाषेचा १४७८ टक्क्यांनी. आफ्रिकेच्या अनेक देशांत चिनी भाषक मोठय़ा प्रमाणावर स्थलांतरित झाले आहेत. चीन सरकारच्या अधिकृत आकडेवारीनुसार जवळपास आठ लाख चिनी अनेक आफ्रिकी देशांत आहेत. त्या सर्वासाठी आणि चिनी भाषेच्या प्रसारासाठी चीन सरकार आणि त्या देशातील खासगी कंपन्या कोटय़वधी डॉलर्सची गुंतवणूक करताना दिसतात.
एवढं लांब जायचंही कारण नाही. आपल्या हिमाचल प्रदेशात तुम्ही कधी गेलात तर एक अनुभव घेऊन पाहाच. तो म्हणजे तिथल्या सायबर कॅफेत जाऊन बघा.. मेल वगैरे करायला. एक बाब तिथे दिसेल म्हणजे दिसेलच. ती म्हणजे तिथल्या संगणकाचे कळफलक इंग्रजी असणार नाहीत, तर ते असतील हिब्रूत. म्हणजे अगदी सिमला वगैरे परिसरातदेखील हे पाहता येईल. त्या परिसरात दर वर्षी मोठय़ा प्रमाणावर इस्रायली तरुण पर्यटक येत असतात. त्या देशात लष्करी शिक्षण अत्यावश्यक आहे. ते झाल्यावर या पोराटोरांना भलीमोठी पगारी रजा मिळते. त्यामुळे आपापल्या मैत्रिणींना वगैरे घेऊन ‘बं भोलेऽ’ करण्यासाठी ही पोरं त्या राज्यात मोठय़ा संख्येने येतात. सायबर कॅफेत त्यामुळे तुम्हाला संगणकाचा कळफलक इंग्रजी सापडणार नाही. सगळेच्या सगळे हिब्रूत. आता इस्रायल आकारानं देश केवढा? चालत गेलं तर काही दिवसांतच या टोकाकडून त्या टोकात तो संपवता येईल. पण तरीही त्या देशानं स्वत:चा असा हिब्रू कळफलक तयार केलाय.
आता आपल्याच उत्तरेकडच्या राज्यात जा. एका तरी राज्यात संगणकाचा कळफलक इंग्रजीत आहे का बघा.
एकही सापडणार नाही. महाराष्ट्रातही असंच आहे. आपल्याकडे मराठीचेच इतके अवतार संगणकावर आहेत की त्यातून नवीनच गोंधळ सुरू झालाय. म्हणजे एका सॉफ्टवेअरमध्ये अमुक एका कळफलकात लिहिली गेलेली मराठी दुसऱ्याच्या संगणकात दिसतच नाही आणि ‘मोडेन पण वाकणार नाही..’ या मर्दमराठी बाण्यामुळे प्रत्येक सॉफ्टवेअर निर्मात्याला आपलीच संगणकीय मराठी आदर्श वाटते. असो. आपला भाषा गोंधळ हा काही या वेळचा आपला विषय नाही.
तर मुद्दा अमेरिकेचा आहे. समर्स यांच्या या विधानाचा इतक्या मोठय़ा प्रमाणावर अमेरिकेतच प्रतिवाद झालाय की विचारू नका. त्यातल्या एकानं हे सगळे भाषिक वैविध्याचे दाखले दिलेत.. आणि विचारलंय, हे असं जर आहे, तर मग इंग्रजीची एवढी गरज का लागते?
हा प्रश्न त्यानं परदेशी भाषा शिकून अमेरिकेत आलेल्या एका तरुणाला विचारला. त्यानं सांगितलं.. आम्हाला एकाच कारणासाठी एकच इंग्रजी हवीये- वॉल स्ट्रीट इंग्लिश..म्हणजे पैसे कमविण्यासाठी.. बस! इंग्रजीचा उपयोग तेवढाच.. आम्ही आनंदासाठी आमच्या भाषेतच शिकतो, लिहितो-वाचतो. इंग्रजी आमची मुख्य भाषा होऊच शकत नाही. आमच्या भाषेत जेवढा आनंद मिळतो आम्हाला तो इंग्रजीत नाही मिळत.
अगदी प्राचीन काळीही रोमन साम्राज्य ऐन भरात असताना, आर्थिक- राजकीय ताकदीनं तळपत असताना अनेक युरोपीय देशांनी आपापली भाषा हृदयाशी कवटाळून ठेवली होती.
त्याचं काय झालं पुढे? आज रोमन साम्राज्य कुठे आहे?  
ते तर कधीच लयाला गेलं.
पण त्या भाषा टिकल्यात.
इतिहास बरंच काही सांगतो भविष्याविषयी.
कळायला हवं आपल्याला ते.

IND vs ENG Pakistani Origin England Bowler Saqid Mahmood Denied Visa To India
IND vs ENG: पाकिस्तान वंशाच्या इंग्लंड खेळाडूला भारत व्हिसा नाकारला, भारत दौऱ्यात खेळू शकणार?
Mahakumbh 2025 Mamta Kulkarni Kinnar Akhada
Mahakumbh 2025: इंजिनीअर्स, डॉक्टर्स व तरुणांना किन्नर आखाड्याचे आकर्षण का?
Woman dies by suicide, family alleges harassment by husband over English skills
“इंग्रजी बोलता येत नाही, नवऱ्याला शोभत नाहीस”, सासरच्या छळाला कंटाळली; विवाहितेचा घरात आढळला मृतदेह, नेमकं काय घडलं?
Education Institute Quality, Education Institute ,
अशा वातावरणात कशी वाढणार शिक्षणाची गुणवत्ता?
article about social and political polarization facing by american media
वृत्तवाळवंट सुफलाम करण्यासाठी…
foreign universities loksatta news
दूरदेशीच्या ज्ञानवाटा: देशोदेशीच्या प्रवेश परीक्षा
Rahul Gandhi Criticized Mohan Bhagwat
Rahul Gandhi :”…तर मोहन भागवतांना अटक झाली असती”, राहुल गांधींनी व्यक्त केला संताप
Image of Baba Abhay Singh or a related graphic
महाकुंभमेळ्यात अस्खलित इंग्रजी बोलणारे IIT Baba नेमके कोण आहेत? आयआयटी मुंबईत शिकलेले अभय सिंग आध्यात्माकडे कसे वळाले
Story img Loader