आपल्या खऱ्या स्वरूपाचं, आत्मस्वरूपाचं ज्ञान व्हायला हवं असेल तर ते आत्मज्ञानाशिवाय शक्य नाही, या बिंदूपर्यंत चर्चा आली होती..
ज्ञानेंद्र – म्हणजेच मार्ग कोणताही असो, आत्मज्ञानाशिवाय खरा लाभ शक्यच नाही! बरोबर ना?
कर्मेद्र – आत्मज्ञान हा इतका फसवा शब्द आहे.. या एका शब्दावर धर्म-अध्यात्माचा बिनभांडवली धंदा तेजीत आहे.. कुणाला झालंय आत्मज्ञान? आत्मज्ञान आहे, मग आश्रमांसाठी जमिनींचे गैरव्यवहार का? वीज, पाणी वगैरे बिलं थकवणं का? सगळाच व्यवहार आहे, बाकी काही नाही.. इथे कुणाला हवंय आत्मज्ञान?
हृदयेंद्र – परिस्थिती निराशाजनक आहे तरी मी निराश नाही. कारण हे आव्हान युगानुयुगांपासून आहे! शेवटी ही गोष्ट बाजारात मिळणारी नाही, हे बाजारात वणवण फिरल्याशिवाय, फसल्याशिवाय, ठेच लागल्याशिवाय कुणी जाणूनच घेत नाही, त्याला काय करावं? त्यामुळे बाजार कायमचा आहे.. त्याचबरोबर शुद्ध आध्यात्मिक परंपरेचा स्रोतही कायम अखंड वाहात आहे. तो भले क्षीण झाल्यासारखा किंवा लुप्त झाल्यासारखा का भासेना! तो प्रवाह आजही आहेच!! पण आत्मज्ञान ही काही कुणा एकाची मक्तेदारी नाही. सकलांसी आहे येथे अधिकार! ज्याला जागं व्हायचंय त्याच्यासाठी पदोपदी सोय आहे आणि ज्याला झोपेचंच सोंग आवडतं त्यालाही जन्मोजन्मी सोय आहे!! जागं व्हायची इच्छा आहे का, हा खरा प्रश्न आहे.. जोवर मी बाहेर वणवण फिरत आहे, भरकटत आहे तोवर काही खरं नाही.. बहु हिंडता सौख्य होणार नाही। सिणावे परी नातुडे हित काही।। खरं आत्महित साधायचं असेल तर मला आतच वळावं लागेल! आधीच मी दुनियेत भरकटत आहे आणि त्यात अंतरंगात चिंतनही दुनियेचंच आहे.. त्यासाठीच तर तुकाराम महाराज सांगत आहेत, हृदयात शुद्ध शाश्वत सत्य स्वरूपाचं चिंतन सुरू होणं, हाच ही परिस्थिती पालटण्याचा शुभशकुन आहे!
योगेंद्र – फार सुंदर.. पण हृदू, ‘अवघा तो शकुन। हृदयी देवाचे चिंतन।।’ यात एखादा भक्त हा देवाचं चिंतन, हा अर्थ घेईल किंवा एखादा ‘देवा’च्या जागी व्यापक, शाश्वत, सत्य तत्त्वाचा विचार करील, हे पटलं..
ज्ञानेंद्र – एवढंच नाही. हृदूच्या सांगण्यातून मला जाणवतंय ते असं की भक्त असो की आणखी कुणी तो जे काही चिंतन करीत असेल, भक्ती करीत असेल, साधना करीत असेल त्याची अखेर त्यानं संकुचिताच्या पकडीतून सुटून व्यापक होण्यातच झाली पाहिजे.
हृदयेंद्र – तू फार समर्पक शब्दांत सांगितलंस बघ! एखादा भक्त देवाचं चिंतन करीत असेल.. पण अखेरीस त्या शोधातही तो व्यापक तत्त्वाशीच पोहोचेल.. माझ्यापुरतं बोलायचं तर मी ‘देवा’च्या जागी खऱ्या सद्गुरूंनाच पाहतो. त्यामुळे सद्गुरूंचं चिंतन हृदयात अखंड होणं, हाच शुभशकुन आहे, हे मला या चरणातून जाणवतं. पुढचे सर्व चरणही सद्गुरू तत्त्वालाच धरून आहेत..
योगेंद्र – कसे काय?
हृदयेंद्र – त्यासाठी पुन्हा एकवार अभंग वाचू.. ऐका हं.. ‘‘अवघा तो शकुन। हृदयीं देवाचें चिंतन।। येथें नसता वियोग। लाभा उणें काय मग।। छंद हरिच्या नामाचा। शुचिर्भूत सदा वाचा।। तुका म्हणे हरिच्या दासा। शुभकाळ सर्व दिशा।।’’ आता देव म्हणजे जो दाता आहे तो. हा दाता असा आहे जो केवळ शाश्वताचंच दान देतो! केवळ सद्गुरूच शाश्वत काय आहे, हे ज्ञान माझ्या अंतरंगात दृढ करतात म्हणून खरा दाता तेच आहेत. त्यांचं चिंतन हृदयात होणं, हाच खरा शकुन आहे.. येथें नसता वियोग। लाभा उणें काय मग? त्यांच्या बोधाच्या चिंतनाचा वियोग नसेल तर मग अशाश्वताशी संयोग शक्य तरी होईल का? मग केवळ लाभच लाभ दुणावत जाईल.. छंद हरिच्या नामाचा। शुचिर्भूत सदा वाचा! त्या सद्गुरूंनी जे नाम दिलं आहे त्याचा छंद लागला तर वाणी पवित्र होत जाईल.. या ओवीचा आणखी एक विलक्षण अर्थ आहे बरं का..
कर्मेद्र – मी बरेचजण असे पाहिलेत जे जप बराच करतात, पण त्याचवेळी मनाविरुद्ध काही घडलं की संतापतात! दुसऱ्याचं मन दुखावेल, असं बिनदिक्कत बोलतात.. मग त्यांची वाणी पवित्र झाली आहे, हे कसं उमगावं? हृदू तूसुद्धा कधीकधी मला टोचून बोलला आहेस!
हृदयेंद्र – (हसून) अरे या ओवीचा हा दुसरा अर्थ मला अचलदादांनी सांगितलाय, पण तो जेव्हा अंगी बाणेल, तेव्हाच तर माझीही वाणी पवित्र होईल ना?
चैतन्य प्रेम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा