विधान परिषदेच्या निवडणुकीत धनंजय मुंडे यांना निवडून आणल्यानंतर राष्ट्रवादीची ८-१० मते फुटल्याचा खासदार गोपीनाथ मुंडे यांचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसच्या बराच जिव्हारी लागलेला दिसतो. तटबंदी मजबूत असतानाही कोण फितूर, याचे उत्तर शोधण्याच्या कामाला राष्ट्रवादीचे नेते लागले आहेत. त्यातच मेळावा मराठवाडय़ात झाल्याने साहजिकच मुंडे हे टीकेचे लक्ष्य होते. पवारांनी माझे घर फोडले, असे मुंडे म्हणत असल्याचे सांगत प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव यांनी मुंडेंवर टीका केली. पण टीका करताना दिलेली उदाहरणे १२-१५ वर्षांपूर्वीची होती. मधल्या काळात मुंडेंनी राष्ट्रवादी काँग्रेसला बऱ्याचदा अडचणीत आणले. पण जुने संदर्भ देत त्यांच्यावर केलेली टीका आणि धनंजय मुंडे यांना निर्माण करून दिलेले व्यासपीठ किती महत्त्वाचे हे सांगण्यासाठी बराच आटापिटा करण्यात आला. खरेतर गेल्या काही वर्षांत खासदार मुंडे यांच्या आत्मविश्वासावर त्यांच्याच पक्षातील कार्यकर्ते प्रश्नचिन्ह लावत होते. त्यांचा बहुतांशी वेळ संघटनात्मक कुरघोडी आणि राजी-नाराजीत जायचा. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते त्यांच्यावर फारशी टीका करत नव्हते. अधूनमधून वृत्तपत्रीय टोलेबाजी करण्यापर्यंत दोन्ही बाजूंनी वक्तव्ये येत. पण त्यातील वैयक्तिक रोष तसा फारसा जाणवत नसे. मात्र, ज्या पद्धतीने विधान परिषदेच्या निवडणुकीत धनंजय मुंडे यांना विरोध केला गेला, थेट तुमचीही मते आम्ही फोडू शकतो, असा संदेश दिला गेला. तो राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिव्हारी लागला. अशा जिव्हारी लागलेल्या टीकांना उत्तरे देण्यासाठीच विभागीय मेळावे सुरू आहेत की काय, असा प्रश्न निर्माण होईल, अशी वक्तव्ये मेळाव्यात झाली. टीकेचे दुसरे लक्ष्य होते राज ठाकरे. गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्यावर मनसेचे नेते ज्या शब्दांत टीका करतात, ते शब्द जिव्हारी लागणारेच आहेत, पण त्या टीकेचे उत्तरही त्याच पद्धतीने देण्यात आले. या सगळय़ा टीकाटिप्पणीत काही महत्त्वाचे प्रश्न उपस्थित झाले, तर काही अडगळीत टाकले गेले. उत्तरे मात्र कोणीच दिली नाही. जायकवाडी जलाशयात समन्यायी पद्धतीने पाणीवाटप व्हावे, अशी मागणी मराठवाडय़ातून जोरकसपणे केली जात आहे. या प्रश्नी राष्ट्रवादी मराठवाडय़ाच्या जनतेबरोबर असल्याचे सांगितले गेले. पण त्या सांगण्यात वजन असे नव्हतेच. पक्ष म्हणून या प्रश्नी काय भूमिका घेणार हे अजूनही गुलदस्त्यात आहे. कारण एका बाजूला मराठवाडय़ाला पाणी मिळायला पाहिजे, असे म्हणणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री शंकरराव कोल्हे या प्रश्नावर वेगळी भूमिका मांडतात. अनुशेषाचा प्रश्न, मागासलेपणा दूर करण्यासाठी उद्योगविश्वाला द्यावयाच्या सवलती याविषयी राष्ट्रवादी काँग्रेसने भाष्यही केले नाही. मराठा आरक्षणावर जेव्हा दोन-तीन मारामाऱ्या होतात, काही बसच्या काचा फोडल्या जातात, एखाद्या मोठय़ा नेत्यावर कोणीतरी फाटका कार्यकर्तादेखील तोंडसुख घेतो. तेव्हा समजून जावे, निवडणुका आल्या. राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात हा विषयदेखील चर्चेत आला. त्यावरही कोणी ठोस भूमिका घेतली नाही. एकूणच बोटचेपेपणा करत खासदार मुंडे यांना लक्ष्य करण्यात आले. त्याचा निवडणुकांमध्ये किती फायदा होईल, हे कोणालाच सांगता येत नाही. असेही निवडणुकांमध्ये टीका आणि ‘कार्य-कर्ते’ याचा संबंध तसा फारसा नसल्याने असे मेळावे जिव्हारी लागलेल्या टीकेला उत्तर देण्यासाठीच घेतले जातात, हेच वास्तव आहे.

Story img Loader