शेतीच्या भारतीय नीतिशास्त्राचा एक भाग म्हणजे अन्नाला आणि त्याच्या कारक घटकांना देवता मानणे. या विचारांतून अन्नाचे आणि शेतकऱ्याचेही अनन्यसाधारण महत्त्व प्रतीत होते. अर्थात, भारतात ‘शेतीचे नीतिशास्त्र’ असे वेगळे कोणी लिहिले नाही. आहे ते स्फुटलेखन, हेही खरे..
‘शेतीचे नीतिशास्त्र’ ही पाश्चात्त्य आणि आंग्लेतर- उर्वरित युरोपीय (काँटिनेंटल) तत्त्वज्ञानातून विकसित होत असलेली संकल्पना आहे. भारतीय शेतकरीवर्ग, शेतकरी संघटना नेते, कार्यकत्रे, धोरणकत्रे, शेती मंत्रालय आणि शासन तसेच अभ्यासक, विचारवंत इत्यादींच्या विचारविश्वात ती नवी आहे, यात शंका नाही. राजकारणात ‘शेतकरी राजा’ या नामाभिधानाने मिरविणाऱ्यांनाही ती नवी असू शकते. भारतातील विद्यापीठीय-महाविद्यालयीन स्तरावरील अॅकेडेमिक विश्वातही ती नवीच आहे.
‘शेतीचे तत्त्वज्ञान’ आणि ‘शेतीचे नीतिशास्त्र’ या नावाची स्वतंत्र विद्याशाखा निर्माण होईल, इतके साहित्य वैदिक आणि अवैदिक (तांत्रिक व लोकायतसह) विचारविश्वात मुबलक उपलब्ध आहे की काय हे शोधावे लागेल. अर्थात भारतीय संस्कृती शेतीप्रधान असल्याचा दावा करताना निश्चित शेतीविचार भारताकडे आहे, असे म्हणावयाचे असते आणि तसे विचार भारतीय वाङ्मयात आहेत. पण ते सारे स्फुटलेखन आहे. त्या लेखनाचे स्वरूप पाहू.
वेदविषयक साहित्यात भूमिसूक्त, कृषिसूक्त व अक्षसूक्त या तीन सूक्तांमध्ये पर्यावरणविचार व शेतीविचार आणि अन्यत्र काही तुरळक आनुषंगिक विचार मांडला आहे. अथर्ववेदातील भूमिसूक्त (अथर्ववेद १२.१) पृथ्वी ही सर्वाची आई असल्याचे सांगते (‘माता भूमि: पुत्रो? हं पृथिव्या:’). ही भूमिमाता सर्व पाíथव पदार्थाची जननी व पोषण करते, प्रजेचे सर्व प्रकारचे क्लेश, दु:खे, अनर्थ यांपासून संरक्षण करते.
ऋग्वेदात दोन सूक्ते आहेत. पहिल्या, कृषिसूक्तात (ऋग्वेद ४.५७) शेतीचा उल्लेख ‘मानवाचे सौभाग्य वाढविणारी’ असा आहे. नांगरलेल्या जमिनीवर इंद्राने चांगला पाऊस पाडावा, तसेच सूर्याने आपल्या उत्कृष्ट किरणांनी तिचे रक्षण व संवर्धन करावे, अशी इच्छा या सूक्तकर्त्यांने केली आहे. बल नांगराला जोडणे, नांगरटीस सुरुवात करताना, नांगराची पूजा करताना हे सूक्त म्हटले पाहिजे. ऋग्वेदातील दुसऱ्या ‘अक्षसूक्त’ (१०.३४) मध्ये जुगाऱ्याला केलेला उपदेश या स्वरूपात शेतीचा उल्लेख आहे. कुणी कवष ऐलूषच्या नावावरील ते सूक्त १४ ऋचांचे असून जुगारी आणि अक्ष म्हणजे फासे यांचे दोष व दुष्परिणाम मार्मिक रीतीने दाखविताना उपदेश केला आहे, की ‘शेती कर. फासे खेळू नकोस, संपत्ती असेल तिथेच गायी आणि बायको राहतात.’
‘अन्नदानसूक्ता’त (ऋग्वेद १०.११७) किंवा धनान्नदान सूक्त या नऊ ऋचांच्या सूक्तात स्वार्थी, अप्पलपोटय़ा माणसाची िनदा केली आहे. स्वार्थीपणा करणे म्हणजे दुसऱ्याचा वध करणे होय, असे सांगून अन्नदानाची महती स्पष्ट केली आहे. या सूक्तास ‘भिक्षुसूक्त’ म्हणतात. हा श्रीमंतांना केलेला उपदेश आहे. पूर्वजन्माच्या पापामुळे दारिद्रय़ भोगावे लागते, या भयानक गरसमजुतीला जोरदार तडाखा देणारे हे सूक्त आहे. मृत्यू केवळ गरिबांनाच येतो, श्रीमंतांना येत नाही असे नाही. उलट लक्ष्मी चंचल असल्यामुळे श्रीमंत माणूसही क्षणात दरिद्री होऊ शकतो. म्हणून जवळ धन व अन्न असेपर्यंत धनवानाने गरिबांना धन, अन्न यांची दानरूपाने मदत करावी व गरिबांशी मत्री करावी, तेच मित्र आपल्या गरिबीत उपयोगी येतात, असे यात सांगितले आहे. नि:स्वार्थी समाजकर्तव्य सांगणारे हे सूक्त आधुनिक काळातही यथार्थ आहे.
सरस्वतीचा उल्लेख नदी आणि देवी असा येतो. सरस्वती म्हणजे सरोवराच्या काठी राहणारी देवता किंवा स्त्री-समूह, पर्यायाने नदीकिनारीची वस्ती. विश्वामित्रनदीसंवाद या सूक्तात महर्षी विश्वामित्र नदीला आई मानतात. अथर्ववेदातील काही मंत्रांना ‘पौष्टिक मंत्र’ म्हणतात. शेतकरी, धनगर, व्यापारी इत्यादी व्यावसायिकांना यश मिळावे, अशी भावना त्यातून व्यक्त होते. पाकयज्ञ, ग्रामनगरसंवर्धन, कृषिसंवर्धनाचे मंत्र यात आहेत.
ऋग्वेदाचा समग्र अर्थ लावणारे ‘ऋग्वेदभाष्य’कार आणि शृंगेरीमठावरील आचार्य सायणाचार्य (मृत्यू १३८७) यांनी वेदांतील ब्रह्मणस्पती या देवतेला अन्नपती म्हटले आहे. ही शेतीदेवता आहे. त्यांच्या मते, ब्रह्म म्हणजे सतत वाढणारे! जे सतत वाढते ते अन्नच असते. सायणाचार्य ‘ब्रह्म स्तोत्ररूपमन्नं हविर्लक्षणमन्नं वा’ अशी व्याख्या करतात. स्तोत्ररूप अन्न हे ब्रह्म आहे आणि आहुती दिले जाणारे अन्न हेसुद्धा ब्रह्मच आहे. पुढे ते म्हणतात, ‘अन्नस्य परिवृद्धस्य कर्मण: पति पालयिता’ (अन्ननिर्मितीच्या कर्माचे पोषण करणारा म्हणजे शेतकरी.) ‘बृह’ धातू आणि ‘बृंह्’ धातू यांचा समान अर्थ वाढत जाणे. ‘बृह’ धातूपासून ब्रह्म, ब्राह्मण, ब्राह्मणस्पती, बृहस्पती असे शब्द बनतात. म्हणून सायणाचार्य अन्न पिकवितो तो ब्राह्मणस्पती असे म्हणतात. शेतकऱ्याचे ब्रह्म जीवनधारणेशी जोडलेले म्हणून ते अन्न हेच ब्रह्म हे समीकरण या होते. उपनिषदात एके ठिकाणी ‘अन्नं ब्रह्म’ असे म्हटलेले दिसते. शंकराचार्यानी अन्नपूर्णाष्टकम स्रोताची रचना केली. आर्य शब्दाचा मूळ अर्थ पेरणी करणारा कृषक असा होतो. कुणीतरी पृथुवैन्य नामक आर्य तत्कालीन कृषिक्रांतीचा जनक मानला जातो.
सुप्रसिद्ध विचारवंत स. रा. गाडगीळ यांच्या मते बहुतेक ऋचांमध्ये, सूक्तांमध्ये अन्नाचीच इच्छा दर्शविली जाते. या ऋषींचे विचार आणि देवदेखील अन्नाचे रूप धारण करतात. युजर्वेदाच्या एका भागाला वाजसनेयी संहिता असे नाव आहे. वाजसन म्हणजे कृषक. वाजपेय यज्ञ म्हणजे अन्न आणि पेय म्हणजे पाणी यासाठी केला जाणारा विधी. तंत्र या शब्दाचा मूळ अर्थही शेती करणे असाच असावा.
रामायणातील कृषिसंस्कृतीसुद्धा सूचक आहे. सीता म्हणजे नांगरट न झालेली जमीन म्हणून व उपजाऊ सकस जमीन, सीताराम = नांगर वापरून कृषितंत्र जाणणारा, अहल्या = नांगर न फिरलेली, भरड जमीन, तारा = नदीच्या मध्यातील खुली जमीन, मंदोदरी (मंद + उदरी) = विलंबाने पिके देणारी जमीन, द्रौपदी ही जमिनीचेच प्रतीक होती. (जमीन भावांपकी कुणीही कसली तरी तिच्यावर केवळ थोरल्या भावाचाच हक्क असावा, या पुरुषी संस्कृतीला कुंतीने समान वाटणी करून जमिनीच्या तुकडीकरणाचा दावा हाणून पडला.)
महाभारतातील बलराम हा नांगरधारी शेतकरीच होता. क्षत्रिय हा शब्दसुद्धा क्षेत्र जो कसतो तो. बौद्ध वाङ्मयातील खेताचा अधिपती तो खत्तीय अशी व्याख्या आहे. कामधेनु = ही जंगले तोडून वस्ती करणारी शेतकऱ्यांची संस्कृती. क्षेत्र कसतो तोच क्षत्रिय, त्याला बौद्ध संज्ञा खत्तीय, िहदीत शेताला खेत म्हणतात. ऋग्वेदातील मुख्य पशुदेव म्हणजे वृषभ – बल आणि गाय याच आहेत. कामधेनू ही संकल्पनासुद्धा जंगले तोडून मानवी वस्ती करणारी व शेती पिकविणाऱ्या कृषिकांची म्हणजे शेतकऱ्यांची संस्कृती होती. या साऱ्या संदर्भात ‘कृषिकेंद्रित वैदिक धर्म आणि संस्कृती’ हे प्र. म. ना. लोही यांचे पुस्तक उपयुक्त आहे.
आता, हे आणि असे अन्य काही वैचारिक साहित्य ‘भारतीय शेतीचे नीतिशास्त्र’ या नावाची नवीन वैचारिक घटना निर्माण करण्यास उपयुक्त ठरेल का? असा प्रश्न उपस्थित करता येईल. या वैचारिक साहित्यातही अवैदिकांपकी केवळ चार्वाक दर्शनात सुस्पष्ट रूपात शेती, उद्योग, व्यवसायविषयक सामाजिक व नतिक धोरण दिसते. तेव्हा भारतीय शेतीचे नीतिशास्त्र रचणे कसे शक्य होईल, ते या लेखाच्या उत्तरार्धात पाहू.
(उत्तरार्ध पुढील गुरुवारी)
*लेखक संगमनेर महाविद्यालय, संगमनेर येथे तत्त्वज्ञान विभागप्रमुख आणि सहयोगी प्राध्यापक आहेत.
शेतीचे नीतिशास्त्र- वेद व महाकाव्ये
शेतीच्या भारतीय नीतिशास्त्राचा एक भाग म्हणजे अन्नाला आणि त्याच्या कारक घटकांना देवता मानणे. या विचारांतून अन्नाचे आणि शेतकऱ्याचेही अनन्यसाधारण महत्त्व प्रतीत होते.
Written by लोकसत्ता ऑनलाइन
Updated:
आणखी वाचा
First published on: 27-11-2014 at 01:25 IST
मराठीतील सर्व तत्वभान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ethics in agriculture