– श्रीनिवास हेमाडे

पत्रकारिता या व्यवसायाचे स्वरूप एका चमत्कारिक विरोधाभासाने भरलेले आहे. तो असा की, पत्रकारिता ही पूर्णपणे खासगी नोकरी असते आणि माध्यमे हे खासगी क्षेत्र असते. पण त्यांचा चिंतन विषय मात्र निखळ सामाजिक असतो
सेवा हाच पत्रकारितेचा हेतू असला पाहिजे. लोकमन जाणणे आणि या समाजमनाला निश्चित आणि निर्भय वाचा देणे, हेच पत्रकारितेचे खरे कार्य असते. सत्य जाणणे हा लोकांचा हक्क असतो. काय घडत आहे, याची वस्तुनिष्ठ माहिती लोकांना मिळालीच पाहिजे. पत्रकारितेत सत्ता दडलेली असते. तिचा दुरुपयोग हा गुन्हाच असतो.
  – महात्मा गांधी  
विद्यमान काळात व्यवसाय (सेवाभाव या अर्थी) आणि धंदा (नफेखोरी या अर्थाने) या दोन क्षेत्रांचा संघर्ष जास्त तीव्रतेने जाणवतो तो माध्यमांच्या बाबतीत. या माध्यम क्षेत्रातील नतिक धारणांचा आणि धोरणांचा अभ्यास म्हणजे माध्यमांचे नीतिशास्त्र. या विषयावर आज जितके संशोधन, लेखन होते आहे तितके कोणत्याही विषयावर होत नाही.
इंग्लिशमधील Media भाषांतर म्हणून माध्यम हा मराठी शब्द सध्या वापरात आहे. त्याआधी पत्रकारिता (Press) हा शब्द रूढ होता. Media ही संकल्पना अतिप्राचीन असून तिची मुळे असिरियन साम्राज्यात आहेत. सोळाव्या शतकातील Medius, medium पासून Media बहुवचनी शब्द बनतो. तार, दूरध्वनी, टपाल सेवा यांना उद्देशून जनसंवाद, लोकसंपर्क या अर्थाने Media हा शब्द १९१९ साली ए. जे. वूल्फ या व्यापारविषयक अभ्यासकाने त्याच्या ‘थिअरी अँड प्रॅक्टिस ऑफ इंटरनॅशनल कॉमर्स’ या पुस्तकात वापरला. नभोवाणी, चित्रपट आणि वृत्तपत्रे यांच्यासाठी mass media  हा शब्द १९२३ च्या दरम्यान आणि १९४६ नंतर news media हा शब्द उपयोगात आला. विसाव्या शतकाच्या अखेरीस social media ही संकल्पना रुळली.
माध्यमांचे नीतिशास्त्र मुख्यत: चार समस्यांचा अभ्यास करते. पहिली समस्या चौथा स्तंभ म्हणून लोकशाहीतील माध्यमांचे स्वरूप आणि त्यांची भूमिका, दुसरी समस्या पाचवा स्तंभ म्हणून विविध सामाजिक माध्यमांचे स्वरूप आणि त्यांची भूमिका, तिसरी समस्या स्वातंत्र्य, वस्तुनिष्ठता, सचोटी आणि खासगीपणा या नतिक समस्या आणि चौथी समस्या म्हणजे माध्यमे आणि माध्यमांमधील कामदर्शन व िहसाप्रदर्शन यांची नतिक पातळी. याशिवाय व्यक्तिगत पत्रकारांचे नतिक धोरण, माध्यमनीती आणि माध्यमांचे अर्थशास्त्र, माध्यमे आणि कायदे, माध्यमे आणि नोकरशाही हे माध्यम नीतिशास्त्रचे आणखी काही विषय मानले जातात.
माध्यमांच्या जबाबदाऱ्या आणि त्यांच्या भूमिका यावर सातत्याने जाहीर चर्चा आणि टीका होते. पण तत्त्ववेत्ते, बुद्धिमंत आणि माध्यमकर्मी व माध्यमतज्ज्ञ यांच्या संयुक्त चिंतनाचा हा विषय आहे. केवळ कुणा एकाचाच, म्हणजे केवळ पत्रकारांचा, माध्यमकर्मीचा अथवा व्यावसायिक तत्त्ववेत्त्यांचा हा मक्तेदारीचा विषय नाही. पत्रकारिता व तत्त्वज्ञान या दोन्ही क्षेत्रांतील तज्ज्ञांच्या अभ्यासाचे हे आंतरविद्याशाखीय क्षेत्र आहे.
विधिमंडळ, कार्यकारी मंडळ  (व प्रशासन), न्याय मंडळ आणि माध्यमे यांना लोकशाहीचे चार स्तंभ मानले जाते. आज फेसबुक, ट्विटर, ब्लॉग्ज इत्यादी समाजमाध्यमांना पाचवा स्तंभ मानला गेला आहे. (दोन दशकांपूर्वी ‘पंचमस्तंभी’ हा शब्द शिवीसारखा, देशविरोधकांसाठी वापरला जात असे, त्या अर्थाने नव्हे). याशिवाय समाजातील विविध विचारविश्वांतील तज्ज्ञ, विचारवंत, बुद्धिवंत व पंडित मंडळी यांना सहावा स्तंभ मानले जाते. हे सारे लोकशाहीचे आधारस्तंभ आहेत. या साऱ्या स्तंभांची सामाजिक जबाबदारी हा ऐरणीवर आलेला प्रश्न आहे.
माध्यमविषयक नीतीची संकल्पना आधी वृत्तपत्रेकेंद्रित होती. पण माध्यमांची संख्या आणि तंत्रज्ञानाचे स्वरूप जसजसे बदलत गेले तसे पत्रकारितेचे स्वरूपही बदलले. नव्या तंत्रज्ञानामुळे अनेक नवी माध्यमे उदयास आली. परिणामी ‘पत्रकारितेची नीती’ या साधारणत: एकांगी नीतीच्या जागी ‘माध्यमांचे नीतिशास्त्र’ ही नवी बहुआयामी संकल्पना आली.
पत्रकारितेतील नतिक बाजूंचा अभ्यास हा तात्त्विक असल्याने तत्त्वज्ञान आणि पत्रकारिता यांच्या जोडणीतून ‘माध्यमांचे नीतिशास्त्र’ ही उपयोजित नीतिशास्त्रातील नवी शाखा आज तत्त्वज्ञान आणि वृत्तपत्र विद्या व जनसंवाद या अकॅडमिक चर्चाविश्वात अभ्यासली जाते. प्रसारमाध्यमे, चित्रपट, रंगभूमी, कला, वृत्तपत्रे, विविध वाहिन्या व इंटरनेट या जनसंवाद क्षेत्रातील विविध नतिक समस्यांचा अभ्यास या नीतिशास्त्रात केला जातो. गावपातळीवरील जाहिराती ते युद्ध पत्रकारितेपर्यंतचे अनेक वादग्रस्त मुद्दे यात येतात.
माध्यमे हा जगातील एकमेव व्यवसाय असा आहे की सारे जग बंद पडले, उद्ध्वस्त झाले तरी तेसुद्धा आज लोकांना सांगावे लागते. कारण ती बातमी असते. ती प्रसारित करायची तर माध्यमे बंद पडून चालू शकत नाही. ती चालू असावी लागतात. गतिमान असणे ही त्याच्या अस्तित्वाची स्पष्ट खूण असते. तुमच्यापर्यंत वृत्तपत्र पोहोचविणारा लहानगा मुलगा, तुमच्या घरातील केबल, सेटटॉप बसविणाऱ्यापासून ते संपादक, मालक अथवा व्यवस्थापक-मालक समूहापर्यंत प्रत्येक जण कोणत्या तरी सामाजिक जबाबदारीने त्याच्या त्याच्या कामात गुंतलेला असतो.
हा अतिशय व्यापक, गुंतागुंतीचा व्यवसाय आणि धंदा आहे. त्याची सामाजिक भूमिका इतर कोणत्याही धंद्यापेक्षा अत्यंत निराळी आहे. पत्रकारिता या व्यवसायाचे स्वरूप एका चमत्कारिक विरोधाभासाने भरलेले आहे. तो असा की, पत्रकारिता ही पूर्णपणे खासगी नोकरी असते आणि माध्यमे हे खासगी क्षेत्र असते. पण त्यांचा चिंतन विषय मात्र निखळ सामाजिक असतो. पत्रकार अथवा संपादक कोणतीही खासगी लाभाची कामे करीत नसतो. पण ज्या माध्यम क्षेत्रात – वृत्तपत्र, वाहिनी, चित्रपट, नियतकालिक इत्यादी पूर्णपणे खासगी असतात आणि तो धंदा असतो. धंदा केवळ अर्थलाभासाठी असतो. अशा वेळी पत्रकाराची नतिक कसोटी असते. हा नतिक ताण असतो.
गेल्या काही वर्षांत पत्रकार मंडळी आणि त्यांच्या प्रामाणिकता आणि वस्तुनिष्ठतेविषयी निर्माण झालेले प्रश्न हे केवळ भारतीय पत्रकारितेबद्दलचे प्रश्न नाहीत तर जगातील पत्रकार व माध्यमे यांच्याविषयीचे व्यापक प्रश्न आहेत. रुपर्ट मरडॉक ते राडिया टेप प्रकरण, तहलका प्रकरण, पेड न्यूज, विविध राजकीय नेत्यांची िस्टग ऑपरेशन्स ही माध्यमविषयक नतिक समस्यांच्या हिमनगाची केवळ टोके आहेत.
पण लक्षात हे घेतले पाहिजे की, खुली, वस्तुनिष्ठ पत्रकारिता केवळ लोकशाहीतच शक्य असते. लष्करशाही, हुकूमशाही, राजेशाही, अध्यक्षीय अथवा पक्षीय राजवट किंवा धार्मिक राष्ट्रात ती शक्य नसते. लोकशाही कितीही दोषपूर्ण असली तरी सर्वसामान्यांना मतस्वातंत्र्य व अभिव्यक्तिस्वातंत्र्य देणारी जीवनपद्धती असल्याने तीच पत्रकारितेला पूरक असते. विरोधाभास असा की, लोकशाहीतच पत्रकारितेचे किंवा माध्यमांचे नतिक प्रश्न जास्त उग्र असतात. त्यामुळे माध्यमांचे नीतिशास्त्र लोकशाहीत जास्त उचित व महत्त्वाचे ठरते.
भारत हा आजही खेडय़ांचा देश आहे, असे मानले तर भारतीय माध्यमनीतीचे खरे, अस्सल प्रश्न ग्रामीण पत्रकारितेत दडलेले आहेत. ग्रामीण पत्रकार हे अनेक प्रकारच्या दडपणांखाली बातमीदारी करीत असतात. बातमीदारी आणि खासगी जीवन यातील तणाव त्यांना मूलभूत विकासाकडे जणू काही दुर्लक्ष करावयास शिकवितो. परिणामी तालुका, खेडी, वाडय़ा-वस्त्यांमध्ये असलेला बातमीची अस्सल आशय चव्हाटय़ावर आणणे हे मोठे आव्हान भारतीय पत्रकारितेपुढे आहे.
भारतात माध्यमनीतीवर फारसे लक्ष केंद्रित केले गेलेले नाही. माध्यमनीती हा भारतातील सर्व पत्रकारितेच्या अभ्यासक्रमात दुर्लक्षिलेला मुद्दा आहे. व्यावसायिक नीतिमत्ता या नावाखाली किंवा पत्रकारितेचे नीतिशास्त्र या नावाखाली जे काही शिकविले जाते ते केवळ ‘पत्रकार आणि कायदे’ हे एक छोटे युनिट असते. याखेरीज नीतीच्या अंगाने अथवा तात्त्विक चिंतनाचा खास प्रांत म्हणून माध्यमांचे नीतिशास्त्र अभ्यासले जात नाही.
माध्यमनीतीचे अबाधित सूत्र सांगणारा एकमेव भारतीय तत्त्ववेत्ता म्हणजे मोहनदास करमचंद गांधी.

Sudhir Mungantiwar, Sudhir Mungantiwar Nagpur,
काँग्रेसची सध्याची अवस्था ‘चाची ४२०’ प्रमाणे, मुनगंटीवार यांची टीका
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Navri Mile Hitlarla
एजेवर येणार मोठे संकट, श्वेताच्या ‘त्या’ कृतीमुळे होणार अटक; ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिका नव्या वळणावर
Haryana for atm robbery pune
पुणे: एटीएम फोडून रोकड चोरणारी हरयाणातील टोळी गजाआड, स्थानिक गुन्हे शाखा आणि शिरूर पोलिसांची कामगिरी
Solapur district bank scam
सोलापूर जिल्हा बँक घोटाळ्याची ३२ तत्कालीन संचालकांवर जबाबदारी, ११०३ कोटी रुपये गैरव्यवहार प्रकरण, ऐन निवडणुकीत निर्णयाने खळबळ
Actor Makarand Anaspure Directed movie rajkaran gela mishit marathi movie roles
दिवाळीनंतर मकरंद अनासपुरेंचा नवरंगी धमाका
karnataka goverment bans tobbacco products using offices staff
सरकारी कार्यालयातील तंबाखू, गुटखा खाणाऱ्या कर्मचाऱ्यांची आता खैर नाही; ‘या’ राज्यात कडक आदेश लागू
who was pramod mahajan
पत्रकार, भाजपाचे लक्ष्मण ते पंतप्रधानपदाचे दावेदार; कशी होती प्रमोद महाजनांची राजकीय कारकीर्द?

लेखक संगमनेर महाविद्यालयात सहयोगी प्राध्यापक व तत्त्वज्ञान विभागप्रमुख आहेत.