उत्तराखंडमध्ये जी नैसर्गिक आपत्ती ओढवली व त्यानंतर जे मदतकार्य करण्यात आले त्याकडे बारकाईने बघितले, तर आपण अजूनही अशा घटना हाताळण्यात किती अपरिपक्व आहोत हेच दिसून येत आहे. एकतर अशा प्रसंगांत प्रसारमाध्यमे, सरकार व नागरिक यांनी ज्या जबाबदारीने वागणे अपेक्षित असते तसे घडलेले नाही. अमेरिकेसारख्या प्रगत देशातही अशा नैसर्गिक आपत्ती येतात, तेव्हा तिथे मात्र आपल्यासारखी अपरिपक्वता कधीच दिसून येत नाही. उत्तराखंडच्या बाबतीत सांगायचे तर गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनीच सरकारी संस्थांमध्ये ताळमेळ नसल्याने मदतकार्य योग्य प्रकारे होत नसल्याची कबुली दिली आहे, त्यांच्या या वक्तव्याने जे काही मदतकार्य सुरू आहे ते करणाऱ्यांचे मनोधैर्य खच्ची होऊ शकते, एका विधानात त्यांनी लष्कराने जे काही काम तिथे केले आहे, त्यावरही सरसकट शिक्का मारला आहे. खरेतर अशा ठिकाणी इतरांनी जाऊन फारसा उपयोगही नव्हता आणि नाही. ‘आपत्ती पर्यटन’ हा आता आपल्याकडे रूढ होत असलेला प्रकार तिथेही पाहायला मिळत आहे. प्रसारमाध्यमांनीही तिथे आम्हीच कसे आधी पोहोचलो याचा डंका पिटला, काही प्रवासी कंपन्यांनी हात धुवून घेतले, स्थानिक उत्तराखंडवासीयांनी बाहेरून आलेल्यांना आश्रय देण्यास नकार दिला. बाहेरून आलेल्या पर्यटकांना वाटीभर भातासाठी ५०० रुपये द्यावे लागले, काहींनी कचऱ्याच्या डब्यातील ब्रेडचे तुकडे वेचून दिवस भागवले, अशा असंख्य कहाण्या आता बाहेर येत आहेत. एकूणच कुणीही या नैसर्गिक आपत्तीला तोंड देताना आदर्शाच्या थोडेही जवळपास जाणारे वर्तन केलेले नाही.

 

तिसऱ्या आघाडीचे खूळ
सद्यस्थितीत राजकीय नेत्यांच्या राजकारणापायी जनता त्रासून गेली आहे. भ्रष्टाचाराचा पाया घालणारे पक्ष लोकांना नको असले तरी नव्या पक्षांमधील घडामोडींमुळे मते कोणाला द्यायची असा यक्षप्रश्न जनतेपुढे उभा ठाकला आहे. काँग्रेस आणि भाजप असे दोनच पर्याय दिसत असले तरी ज्या पद्धतीने राजकारणाचा सारीपाट मांडला जात आहे, त्यामुळे संभ्रमित करणारी स्थिती उद्भवली असून लोकांना पर्याय निवडणे कठीण झाले आहे. काँग्रेसएवजी भाजप असा पर्याय दिसू लागतो. परंतु, नितीशकुमारांना भाजपशी काडीमोड घेतल्याने तिसऱ्या आघाडीची चर्चा सुरू झाली आहे. अर्थात याचा फटका भाजपलाच बसणार, ही काळ्या दगडावरची रेघ आहे. काँग्रेसच्या वर्षांनुवर्षांच्या शासनाला लोक कंटाळले आहेत. परिस्थितीचे चटके सोसल्यानंतरही भाजपने बोध घेतलेला नाही, असेच अलीकडच्या राजकारणावरून दिसून येते. त्यामुळेच तिसऱ्या आघाडीचा विचार पुन्हा सुरू झाला आहे. यानिमित्ताने नितीशकुमार, मायावती, नवीन पटनायक, ममता बॅनर्जी पुन्हा एकाच व्यासपीठावर येण्याची शक्यता बळावली असून त्यांचे एकत्र येणे भाजपला कडवे आव्हान ठरेल. त्यामुळे भाजपने तिसरी आघाडी निष्प्रभ करण्यासाठी पावले टाकणे अतिआवश्यक झाले आहे. सलग दहा वर्षे मनमोहन सिंग यांचे सरकार देशात राज्य करीत आहे. लोकांना बदल हवा असल्याने भाजपने संकुचित विचारसरणी झटकून परिपूर्ण चिंतन करावे आणि त्या दिशेने पावले टाकावीत.
 बाळ कानिटकर, नागपूर</p>

क्रिकेट समालोचनातील ‘ती’ खुमारी!
दूरचित्रवाणीवर अनेक दिग्गज समालोचक आहेत. हर्ष भोगले, रवी शास्त्री, संजय मांजरेकर यांच्या क्रिकेट ज्ञानाबद्दल शंकाच नाही. त्यात दृक-श्राव्य माध्यमामुळे प्रत्यक्ष सामना बघतदेखील असतो. त्यामुळे क्रिकेट पाहणे खूपच आनंददायी झाले आहे; परंतु ‘त्या काळी’ आम्ही सर्व क्रिकेटशौकीन हे धृतराष्ट्रासारखे रेडिओनामक ‘संजय’समोर बसून राहत असू. सामना पाहाणारे समालोचक आम्हास सामना ‘दाखवीत’ असत. मराठीमध्ये दूरवरून दृष्टिक्षेप टाकणारे ‘विवेक’, बाळ सामंत यांना तोडच नव्हती. इंग्रजीमध्ये विजय र्मचट, आनंद सेटलवाड, सुरेश सरय्या, वेस्ट िवडीज संघाबरोबर आलेले टोनी कोझियर यांचे समालोचन इतके प्रभावी असे की, विश्वनाथने मारलेला ‘स्क्वेअर-ड्राइव्ह’ असो की गावस्करचा ‘ऑफ’ किंवा ‘स्ट्रेट ड्राइव्ह’, पतौडीने अडविलेला जोरदार फटका असो, खरंच सर्व चित्र जसेच्या तसे डोळ्यांसमोर दिसत असे. त्याचबरोबर ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू हुकला तर ‘काय गरज होती का या स्टेजला बाहेरचा बॉल मारायची?’ असे तळमळीचे उद्गार सर्वाच्या तोंडातून एकदम निघत असत. तीच गोष्ट फििल्डग प्लेसमेंट सांगताना. ‘थ्री स्लिप्स, टू गलिज विथ विकेटकीपर स्टँडिंग बॅक’ अशा थाटात वर्णन असायचे की आजचा एलसीडीदेखील ते चित्र दाखवू शकणार नाही. तीच गोष्ट हवामानाचे वर्णन करताना- खरंच आता पाऊस येणार आणि सामना थंड होणार हे स्पष्ट, सरतेशेवटी ‘श्ॉडोज लेन्ग्थिनग ऑन द विकेट’ हे वर्णन पक्के. परवा डिकी रत्नागर गेले ही बातमी वाचली आणि भूतकाळात इतका गुंग होऊन गेलो. खरंच! अनेक सामन्यांची हुबेहूब वर्णन करण्याची त्यांची कला आता आठवणीतच राहील
अतुल दोंदे, ठाणे</p>

सरधोपट ज्योतिषकला
रोज सकाळी वृत्तवाहिन्यांवर बाकी काही दिसो न दिसो ज्योतिषी आपलं तोंड वेंगाडत आजचा दिवस कसा जाणार हे मात्र नक्की सांगत बसलेले दिसतात. या ज्योतिषी महाशयांनी जर उत्तराखंडमध्ये भयानक पूर येऊन हाहाकार माजेल हे भविष्य सांगितलं असतं तर ते सर्वानाच सोयीचं झालं असतं. शेकडो-हजारो प्राण वाचले असते, कोटय़वधी रुपयांची वित्तहानी झाली नसती. अनेक बुवा, बापू, महाराज इत्यादी कौल लावून लोकांना काय करावे, काय नको याचे उपदेश देतात आणि दुर्दैवाची गोष्ट ही की आजकालची बरीच तरुण मुलं-मुलीसुद्धा या भोंदू आणि अताíकक युक्तिवाद असलेल्या लोकांकडे सल्ला मागायला जातात.
खरं म्हणजे माणसाच्या आयुष्यात जन्म आणि मृत्यू या दोनच सर्वात महत्त्वाच्या घटना असतात. याबद्दलच जर हे शास्त्र काही ठोस सांगू शकत नसेल तर याला थोतांड मानून केराचा रस्ता का म्हणून दाखवू नये? उत्तराखंडमध्ये मारल्या गेलेल्या लोकांची कुंडली सारखी होती काय? त्यांची कुंडली अर्थातच सारखी असावी. त्याशिवाय उगीच का त्यांना एकाच वेळी मृत्यू आला? आजही जर इथल्या महानात महान म्हणून गणल्या गेलेल्या अगदी नावाजलेल्या ज्योतिषाकडे एखाद्या मृत व्यक्तीची कुंडली घेऊन गेलो तर तो अगदी यथायोग्य त्या व्यक्तीचं भविष्य सांगेल, त्याला मुलबाळं किती होणार, नोकरी लागणार की नाही या गोष्टीसुद्धा सांगेल. त्यामुळे ज्योतिषशास्त्र हे विज्ञान नसून एक थोतांड आहे हे समजून घेऊन समाजाने त्याचा त्याग करावा. समस्त ज्योतिषांनीसुद्धा हा भोळ्याभाबडय़ा जनतेला लुबाडण्याचा कार्यक्रम बंद करावा आणि जर तसं नसेल तर ते कोणीही एका विद्वान ज्योतिषाने फलज्योतिष हेसुद्धा एक विज्ञान आहे असे सिद्ध करावे!
मयूर काळे, वर्धा

सरकारच जबाबदार
उत्तराखंडातील महाभयंकर  प्रलय येण्यास निसर्गाला जबाबदार ठरवल्याचे केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार िशदे यांचे माध्यमातील वक्तव्य पाहिले. वास्तविक पर्यावरणाचा कोणताही विचार न करता ७० धरणे बांधली गेली आहेत. त्यामुळे निसर्गाच्या मुळावर घाव घातल्यावर, त्याने या अनास्थेस जबाबदार असणाऱ्या सरकारला आपले अस्तित्व दाखवून दिले आहे. गंगेच्या काठावर झालेले अतिक्रमण तसेच अर्निबध शेकडो बांधकामे या प्रलयास जबाबदार आहेत. या आगंतुकांना रोखण्याचे काम उत्तराखंड सरकारने करायला हवे होते. त्यामुळे झालेल्या मनुष्यहानीस राज्य सरकारही तितकेच जबाबदार आहे. मात्र वायू सेना, भूदल व अन्य संस्थांनी सरकारची लाज राखली आहे,  अमेरिका व जपानसारखे देश दुसऱ्या दिवशी पूर्ववत होतात, याचा अभ्यास व्हायला हवा.
राजेश हरिश्चंद्र वैद्य, माकुणसार, सफाळे

‘संघमार्गप्रदीप’ निराशादर्शक
‘बुकमार्क’ सदरातील ‘संघमार्गप्रदीप’ या शीर्षकाचा रवी आमले यांचा लेख वाचला (२२ जून). रा. स्व. संघाविषयी उत्सुकता असणाऱ्यांना संघ समजून घेण्यासाठी (चेहरा नव्हे) तसेच आक्षेपाची जळमटे झटकून टाकण्यासाठी हे पुस्तक निश्चित उपयुक्त आहे, या लेखकाच्या मताशी कोणीही सहमत होईल. अचानक क्रांतिकारी, खळबळजनक कार्याखेरीज निष्ठेने सतत प्रयत्नपूर्वक केलेले काम यशस्वी होते हे संघकामाशी परिचित नसलेल्यांना पचनी पडणे जड जाते, हे स्वाभाविक आहे. कदाचित याच कारणाने लेखकाने  ‘संघमार्गप्रदीप’ असे लेखाचे शीर्षक देण्यामागे काही सुरस आणि धक्कादायक हाती न लागल्याने आलेली निराशा दर्शविते.
 विद्याधर (विजय) कुलकर्णी

Story img Loader