प्रसारमाध्यमांत काही दिवसांपूर्वी ‘आम आदमी पक्षा’बद्दल येणाऱ्या बातम्या वाचून आणि त्याहीपेक्षा चित्रवाणीवरून त्या बातम्या किंवा त्यांबद्दलच्या चर्चा पाहून या पक्षाला मनोमन समर्थन देणारे अनेक जण भयशंकित झाले.. परंतु समाज, राजकारण व वैचारिकतेत जे भ्रष्ट आहेत त्यांना दूर ठेवण्याचा निर्धार करणारा हा पक्ष एकविसाव्या शतकाचा पक्ष ठरेल..
गेले काही दिवस आम आदमी पक्ष पुन्हा प्रसारमाध्यमांमध्ये चर्चेचा विषय आहे. प्रसारमाध्यमांनी तोंडी लावण्याच्या पदार्थाप्रमाणे आमच्या पक्षातील घडामोडी त्यांच्या प्रेक्षकांसमोर ठेवल्या व प्रेक्षकांनीही त्यांची चव तृप्त होईपर्यंत चाखली. आमच्या पक्षाचे रेखाटलेले चित्र पाहून अनेक लोक भयकंपित झाले आहेत, दु:खी आहेत. केवळ कार्यकर्तेच नव्हे तर सामान्य व्यक्तीही त्यांचा आमच्यावरील विश्वास पुन्हा तपासून पाहत आहेत.
अशा परिस्थितीत पक्षाचे पदधिकारी, कार्यकर्ते व सहानुभूतीदारांनी एक लक्षात ठेवणे गरजेचे आहे की, आम आदमी पक्ष हा केवळ एक पक्ष नाही तर विचार आहे. हा विचार भ्रष्टाचारमुक्त भारताचा नाही. लोकांनी आम आदमी पक्षाच्या माध्यमातून समाज, राजकारण व वैचारिकतेत जे भ्रष्ट आहेत त्यांना दूर ठेवण्याचा निर्धार केला आहे. हा पक्ष एकविसाव्या शतकातील भारतासाठी नवा विचार शोधण्याचा मंच आहे, एक असा मंच जिथे विसाव्या शतकातील वैचारिकतेमधला अवरोध दूर करून पुढे जाण्याचा रस्ता शोधला जात आहे.
आम आदमी पक्षावर लोकांचे मन जडले त्याचे कारण आपले काम व बोलणे यात इतर पक्षांपेक्षा तो वेगळा आहे. या पक्षाचा स्वराज्याचा विचार इतर पक्षांपेक्षा वेगळा आहे, त्यामुळे आम आदमी पक्षाची तुलना इतर कुठल्याही प्रयोगाशी करता येणार नाही. जनता पक्ष असो, जनता दल असो त्यांचे प्रयोग हे ज्यांचा पिंडच राजकारण्यांचा आहे अशांना बरोबर घेऊन केलेले होते. राजकारणात जुन्या असलेल्या प्रस्थापित नेत्यांकडून नवीन राजकारणाची अपेक्षा करता येत नाही. आम आदमी पक्षाच्या नावाने नवीन लोक स्वराज्याच्या विचाराने राजकारणात आले, त्यामुळे हा पक्ष लोकांच्या विश्वासास पात्र ठरला.
आम आदमी पक्षासाठी स्वराज्य हा विचार म्हणजे केवळ उपदेश नाही, त्यामुळे लोकांनी पक्षाने मांडलेल्या स्वराज्याच्या संकल्पनेचा वरवरचा अर्थ न स्वीकारता आंतरिक अर्थ स्वीकारला. स्वराज्याचा विचार हा केवळ ग्रामपंचायती व नगरपालिकांमध्ये लोकांना स्वत:चे निर्णय स्वत: घेण्याची क्षमता आली तरी पुरे, एवढाच मर्यादित नाही. स्वराज्याचा विचार असा आहे की, आपला निर्णय आपण घेताना आपल्यावरच आपले नियंत्रण म्हणजे स्वशासन असणे गरजेचे आहे. त्यात फार मोठी जबाबदारी आहे, आपल्या स्वत्वावर नियंत्रण ठेवणे सोपे नाही, कारण त्यात स्वेच्छाचाराचा धोका असतो.
आम आदमी पक्षाने याच विचारातून एक अंतर्गत लोकपाल बनवला आहे, तो पक्षाचा आत्मा व आंतरिक विवेक आहे. आम आदमी पक्षाला अभिप्रेत असलेले स्वराज हा केवळ उपदेशापुरता विचार नाही, तो दुसऱ्यांना आरसा दाखवून केवळ त्यांच्या चुका शोधण्यासाठी नाही तर आपल्या पक्षाच्या आत्मपरीक्षणासाठीही आहे, हे दाखवून देण्याच्या दृष्टिकोनातून पक्षातील लोकपालाचे अस्तित्व महत्त्वाचे आहे.
आम आदमी पक्षाचा स्वराज्याचा विचार हा राष्ट्रवादाशी निगडित आहे. या पक्षाने आपल्या राष्ट्रवादाला विसाव्या शतकात घासून गुळगुळीत झालेल्या अर्थातून बाहेर आणण्याचा प्रयत्न केला आहे. विसाव्या शतकात भारतात राष्ट्रवाद म्हणजे धर्म-समाज, भाषा व एखाद्या भागाच्या वर्चस्वाची नारेबाजी असा अर्थ लावला गेला. आमचा पक्ष विसाव्या शतकातील वैचारिक अवगुंठनातून बाहेर येण्याचा रस्ता लोकांना दाखवत आहे. राष्ट्रवादासाठी आम आदमी पक्षाला गांधी व टागोरांची मळलेली पायवाट योग्य वाटते. हा रस्ता बहुमताच्या नावाखाली हिंदू धर्मसमुदायाच्या गाजावाजाला व अल्पसंख्याकांच्या नावाखाली मुस्लिमांच्या तुष्टीकरणाला मान्यता देणारा नाही. राष्ट्रीय एकता व अखंडतेच्या नावाखाली देशातील बहुविधता व बहुसांस्कृतिकता यांना मोडीत काढणाराही नाही. आमचा मार्ग हा संघराज्याच्या चौकटीत प्रत्येकाला स्वत्वाचे रक्षण करण्याची हमी देणारा आहे, भारताच्या चतु:सीमांत उत्तर-दक्षिण, पूर्व-पश्चिम या सर्वाना त्यांचे स्थान देणारा रस्ता आहे. त्याचबरोबर सगळे जगच विभागलेले असले तरी ते एक आहे, समान धाग्याने, समान नियतीने जोडलेले आहे असा नवा विचार देणारा हा मार्ग आहे.
सामाजिक न्यायाच्या प्रश्नावर पक्ष रांगेतील शेवटच्या माणसापर्यंत बांधील आहे, या मुद्दय़ावर सर्वच पक्ष दुटप्पीपणा करतात. त्यांच्यात एका बाजूने शेवटच्या माणसाकडे डोळेझाक करण्याची वृत्ती आहे, तर दुसरीकडे ते सतत सामाजिक न्यायाच्या नावाखाली रांगेतील शेवटच्या माणसाला देण्यासाठी आरक्षणाच्या रामबाण औषधाची मात्रा आहे. आम आदमी पक्ष या दोन्ही टोकाच्या दृष्टिकोनांपासून वेगळा आहे. सामाजिक न्यायाचा प्रश्न केवळ त्या पक्षात किंवा नोकरीत दलित-बहुजनांना आरक्षणाच्या माध्यमातून प्रतिनिधित्व देऊन सुटणारा नाही तर सरकारच्या धोरणात त्यासाठीची तळमळ दिसली पाहिजे. दलित व बहुजन समाजाचा आर्थिक विकास होणे ही गोष्टही त्यात अभिप्रेत आहे.
आíथक धोरणात आमचा पक्ष एक नवीन सुरुवात करीत आहे, या मुद्दय़ावर आमचा वैचारिक वारसा हा डावे व उजवे यांच्या पक्षांच्या नेमका मधल्या मार्गाचा आहे असे मानले जाते, पण आम आदमी पक्ष हा पर्याय मान्य करीत नाही. आमचा पक्ष रांगेतील शेवटच्या व्यक्तीच्या हिताच्या गोष्टी करतो म्हणून आम्ही डाव्यांकडे झुकणारे आहोत अशी चर्चा होते, पण कुठल्या धोरणांनी सामान्य माणसाचे कल्याण होईल याबाबत आमचे व डाव्यांचे विचार वेगळे आहेत, जुन्या काळातील डावे पक्ष हे व्यक्तीचे अंतिम कल्याण हे केवळ सरकार, सरकारी उद्योग, परवाना राज यातूनच होऊ शकते असे मानत होते. पण आम आदमी पक्ष यावर खुल्या मनाने विचार करीत आहे
आम आदमी पक्ष हा एक विचार आहे तर आजचा आम आदमी पक्ष त्या विचाराची एक अपूर्ण अभिव्यक्ती आहे, असे म्हणायला हरकत नाही. प्रसारमाध्यमांनीही पक्षातील घडामोडींच्या बातम्या चमचमीत करून दिल्या पण त्या बातम्यांमधील व्यक्ती हा एक घटक बाजूला करून एका नव्या चष्म्यातून या घडामोडींकडे पाहिले तर पक्षाच्या विचारसरणीचे अधिक स्पष्ट चित्र तुमच्या डोळ्यांसमोर येईल.
आम आदमी पक्षाच्या अस्तित्वाचा अर्थ
प्रसारमाध्यमांत काही दिवसांपूर्वी ‘आम आदमी पक्षा’बद्दल येणाऱ्या बातम्या वाचून आणि त्याहीपेक्षा चित्रवाणीवरून त्या बातम्या किंवा त्यांबद्दलच्या चर्चा पाहून या पक्षाला मनोमन समर्थन देणारे अनेक जण भयशंकित झाले..
First published on: 25-03-2015 at 01:01 IST
मराठीतील सर्व देशकाल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Existence luminous of aam aadmi party