विज्ञानग्रामात सिद्ध होत असलेल्या सर्व पर्यायी आणि क्रांतिकारक तंत्रवैज्ञानिक शक्यतांचे रुपांतर लोकांच्या राजकीय इच्छाशक्तीत व्हावे. शाबासकी आणि आर्थिक सहभागाबरोबरच युवकांचा प्रत्यक्ष कार्यात सहभाग हवा आहे.
‘सर्वकार्येषु सर्वदा’ या उपक्रमाला मिळालेला उदंड प्रतिसाद हेच सिद्ध करून दाखवित आहे. १६ सप्टेंबरच्या ‘लोकरंग’ मध्ये प्रसिद्ध झालेली सर्वकार्येषु सर्वदा ही संकल्पना एवढी नावीन्यपूर्ण आणि उत्साहजनक होती की पुढे गणेशोत्सवात प्रत्येक दिवशी प्रसिद्ध होणाऱ्या एकेका संस्थेच्या कार्यास बृहन्महाराष्ट्रात प्रचंड प्रमाणावर प्रसिद्धी मिळू लागली. ‘लोकसत्ता’ च्या सर्व आवृत्त्या तसेच इंटरनेट माध्यमातून जगात जिथे जिथे महाराष्ट्रीय आहेत, तिथे तिथे या उपक्रमाची चर्चा होऊ लागली आणि उत्स्फूर्त प्रतिसाद मिळू लागला. याचे प्रत्यंतर रोजच्या फोन कॉल्स, पत्रव्यवहार आणि इंटरनेट वरून येऊ लागले. गुणग्राहक समाज आपल्या पाठीशी उभा आहे हा मोठा दिलासा मिळू लागला.
आमच्या विज्ञानग्राम सोला(र)पूर बाबतचा लेख प्रसिद्ध होताच जणू प्रसिद्धीचा प्रखर प्रकाशझोतच माळावर असणाऱ्या आमच्या विज्ञानग्रामवर आणि प्राणिमित्रांवर पडला आणि आम्ही सर्व जण त्यात न्हाऊन निघालो.
आमचे शहरातील वास्तव्य सोडून दूर सोलापूरसारख्या दुष्काळी जिल्ह्य़ातल्या ११५० गावांपैकी एक अशा एका अंकोली नावाच्या गावाच्या माळावर आम्ही आमची वस्ती टाकली, त्याला २६ वर्षे झाली आहेत. इथे येण्याआधी आमचे शहरातील/ महानगरातील जीवन अगदी निराळे होते. संपूर्ण देशभर सततचे दौरे, विज्ञानप्रसार, विज्ञानयात्रा, विज्ञानसभा, विज्ञान मोर्चे, जाहीर वाद-विवाद यामुळे त्यावेळी प्रसारमाध्यमांचा चांगला प्रतिसाद मिळत रहायचा. संपूर्ण देशभराला भारत जोडो भारत जनविज्ञान जत्था अशा कार्यक्रमातून संपूर्ण देशात अगदी काश्मीर ते कन्याकुमारी आणि द्वारकेपासून इम्फाळ, त्रिपुरापर्यंत एकही ठिकाण असे नव्हते की आमचा मित्रपरिवार नव्हता.
परंतु अचानक सर्व सोडून अंकोली गाठली त्यामुळे या सर्व मित्रपरिवारापासून आम्ही उभयतां लांबच गेलो होतो. मात्र ‘लोकसत्ता’तील लेखामुळे आमच्या सर्व जुन्या मित्रमंडळींना आम्ही त्या खेडेगावात काय धडपड करतो आहोत त्याची जाणीव झाली.
खरोखर ‘लोकसत्ता’ परिवाराने आम्हाला दाखवून दिले की आम्ही किती श्रीमंत आहोत. आमचे जुने मित्र तर आम्हाला परत मिळालेच, परंतु त्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक म्हणजे शेकडोंनी नवीन मित्र-सुहृद मिळाले. मोठय़ा प्रमाणावर लोकांनी ‘लोकसत्ता’ कार्यालयात जाऊन चेक्स दिले. काहींनी तर परस्परच इथल्या आमच्या पत्त्यावर चेक्स आणि मनिऑर्डर पाठविली.
पशुधन बचाव आंदोलनातील तपस्वी नेतृत्व म्हणजे प्राणिमित्र विलास शहा. वय ८२ वर्षे, परंतु अजूनही प्रसंगी प्राण पणाला लावून यांत्रिक कत्तलखान्यांविरोधी सत्याग्रह करणारा हा वृद्ध विलास शहा आणि त्यांचे सहकारी यांना तर ‘लोकसत्ता’ ने उभारीच दिली. त्यांच्यामागे महाराष्ट्राचा समस्त जैन समाजच नव्हे, तर सर्व प्राणिमित्र उभे राहिले. सर्वात मोठा पाठिंबा मिळाला तो वारकरी संप्रदायाचे एक अध्वर्यू बंडातात्या कराडकर यांचा. त्यांनी प्रत्यक्ष अंकोलीच्या विज्ञानग्रामास स्वत: भेट देऊन विलासभाईंना आश्वस्त केले, की समस्त वारकरी संप्रदाय यांत्रिक कत्तलखान्याविरुद्धच्या आंदोलनात सामील होणार आहे. लाखो वारकऱ्यांचा पाठिंबा मिळाला; आणखी काय पाहिजे? हे श्रेयसुद्धा ‘लोकसत्ता’ परिवारालाच दिले पाहिजे.
सर्वात हृद्य अनुभव म्हणजे आमचे नाव कुठेही घेऊ नका, प्रसिद्ध होऊ देऊ नका, असे बजावून हजारो रुपये पाठविणारे परदेशस्थ मराठी मित्र, एकरकमी वीस हजार रुपये देणारी स्वत: वृद्धाश्रमात राहणारी, स्वातंत्र्य लढय़ात भाग घेतलेली वृद्धा! तिचे लाभलेले आशीर्वाद, इथे प्रत्यक्ष भेट देऊन धडाधड चेक्स फाडणारे पाहुणे व अनुभवांनी आम्हा सर्वाचे हृदय भरून आले.
लेखातील सर्व प्रकल्पांनी तर इंजिनिअरिंग कॉलेजेसमधील शेकडो विद्यार्थ्यांत उत्साहच संचारला. त्याच्या सहलीच इथे येऊ लागल्या. आमीरखानच्या ‘थ्री इडियट्स’ मध्ये दाखविलेल्या रंचो सारखी अनेक मुले इथे येऊ लागली. काहींनी तर या प्रकल्पांनाच पूर्ण वेळ देऊ केला आहे. ग्रॅज्युएशननंतर त्यातली काही इथे येऊन राहण्याचा विचार करताहेत.
सध्याच्या याच संस्कृतीच्या पर्यावरणविनाशी खुळचट विकासनीतीला ठोस वैज्ञानिक पर्याय देऊ शकणारी रुरबन किंवा कृषि +ऋषी संस्कृती प्रत्यक्षात येईल. महाराष्ट्रात १५०० ठिकाणी विविधतेने नटलेल्या कृषी हवामान क्षेत्रातील १५०० पंचक्रोशींमध्ये विज्ञानग्राम वसतील. त्यातून सिद्ध होणाऱ्या पर्यायी तंत्रवैज्ञानिक शक्यतांचे रूपांतर लोकांच्या राजकीय इच्छाशक्तीत होईल. या प्रचंड कामाला ‘स्टार्टर’ लागतो. त्याचे कळीचे बटन ‘लोकसत्ता’ परिवाराने योग्य वेळी दाबले आहे. सर्व कार्येषु सर्वदाने त्याचे काम केले आहे. आता खरे युवा ‘कार्य-कर्ते’ हवे आहेत.
इलेक्ट्रिक स्टार्टरचे बटन दाबणाऱ्या ‘लोकसत्ता’ परिवाराला शतश: धन्यवाद!
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा