एक पाश्चात्य साधक आणि श्रीनिसर्गदत्त महाराज यांच्यातला संवाद आपण पाहात आहोत. मुद्दा सुरू आहे तो, त्यांच्यात आणि आपल्यात काय फरक आहे हा. महाराज म्हणतात, फरक काहीच नाही. फरक असल्याची तुम्ही कल्पना करता म्हणून ज्ञानी लोकांच्या शोधासाठी इकडे तिकडे भटकता. त्यावर मग प्रश्नकर्ता पुन्हा म्हणतो, ‘आपण ज्ञानी आहातच. आपल्यास सत्यज्ञान झाले आहे असे आपणही म्हणता. मी स्वतबद्दल तसे म्हणू शकत नाही.’ त्यावर महाराज म्हणतात, ‘तुम्ही सत्य जाणत नाही म्हणून खालच्या दर्जाचे आहात असं मी कधी म्हंटलं आहे का? तुम्ही जाणत नाही ते मी जाणतो, असे मी कधीच म्हणत नाही. खरे पाहता मी तुमच्यापेक्षा फारच कमी जाणतो.’ पहिल्या वाक्यात त्यांनी सद्गुरूच्या विशाल हृदयाचा प्रत्यय दिला. एक साधू होता. नदीत अध्र्य देत असताना एक विंचू बुडताना त्यानं पाहिला. त्या विंचवाला काठावर ठेवावं, म्हणून त्यानं तो ओंजळीत घेतला. त्यानं ओंजळीत घेतल्यानं वाचलेला तो विंचू लगेच त्याला डसला आणि नदीत पडून पुन्हा बुडू लागला. साधूनं पुन्हा त्याला उचललं आणि काठाकडे येऊ लागला. विंचू पुन्हा डसला. हा प्रकार अनेकदा झाला. अखेर काठावर येण्यात साधूला यश आलं आणि विंचू पळून गेला. शिष्यानं विचारलं, महाराज तुम्हाला चावणाऱ्या विंचवाला वाचवलंतंच कशाला? साधू म्हणाले, तो बिचारा आपला स्वभाव सोडू शकत नाही पण मीसुद्धा त्याला वाचविण्याचा स्वभाव सोडू शकत नाही! तर आपणं संकुचित वृत्तीची नांगी त्यांना मारतच राहातो तरीही ते आपल्याला नाकारत नाहीत. त्यागत नाहीत. महाराज जेव्हा सांगतात की, खरे पाहता मी तुमच्यापेक्षा फारच कमी जाणतो, त्यातला गूढार्थ पटकन जाणवत नाही. ते केवळ एका सत्याला एका परमात्म्यालाच जाणतात. आपण भौतिक जगातल्या, नष्ट होणाऱ्या अनंत गोष्टींना ‘जाणत’ असतो! महाराज आपल्यापासून वेगळे आहेत हे नक्की पण हा नेमका फरक काय, हे ते सांगत नाहीत हे जाणून मग हा पाश्चात्य साधक थेटच म्हणतो, ‘महाराज कृपा करून सरळ उत्तर टाळू नका. आपल्या दृष्टीने आपण माझ्यापेक्षा वेगळे आहात की नाही?’ या प्रश्नावर महाराजांचे उत्तर फार प्रदीर्घ आणि सखोल आहे. त्याची सुरुवात अशी- ‘मी वेगळा नाही. आपल्यातील फरक केवळ अनुभव आणि अभिव्यक्ती यापुरतेच आहेत. त्यात तर सतत बदल होत असतो. कोणताही भेद मूलभूत नाही आणि कोणतीही वस्तु टिकत नाही.’ आपणही अनुभव घेतो आणि अभिव्यक्त होतो. तेदेखील अनुभव ‘घेताना’ दिसतात आणि अभिव्यक्त ‘होताना’ दिसतात. पण अनुभवांनंतर आपलं अभिव्यक्त होणं आणि त्यांचं अभिव्यक्त होणं, यात फरक दिसतो खरा! संकटाने आपण कोलमडतो आणि ते धीरोदात्तपणे परमात्म्यावर भार टाकून सहजावस्थेत असतात, हा फरक तर आपण पाहातोच. मग महाराज खरा फरक उघड करतात.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा