अधिक पैसा मिळावा असे वाटणे गैर नाही. मात्र पैशाची उत्पन्नाची तहान आणि भूक भागवण्यासाठी खेळ या संकल्पनेला मूठमाती देण्यासाठी एखादी व्यवस्था जन्माला येत असेल तर ती  नष्ट करायला हवी.. फुटबॉलप्रमाणेच अन्य खेळांतही..
जुगार ही नैसर्गिक मानवी प्रेरणा आहे आणि अन्य नैसर्गिक प्रेरणा जर कह्यात ठेवता आल्या नाहीत तर जे होते तेच सध्या जुगाराच्या बाबतही होताना दिसते. क्रिकेटमधील सामनानिश्चिती असो वा फुटबॉलमधील. या दोन्ही ठिकाणी दिसून येते ती जुगाराची आणि त्यानिमित्ताने भ्रष्टाचाराची अनियंत्रित प्रेरणा. युरोपीय पोलिसांनी नुकताच फुटबॉलमधील हा शब्दश: जगद्व्यापी भ्रष्टाचार उघडकीस आणला. तो आणण्यासाठी गेले जवळपास दीड वर्ष पोलीस, गुप्तचर यंत्रणा आदींनी कसून प्रयत्न सुरू ठेवले होते. त्यासाठी गेल्या दीड वर्षांतील सहाशेपेक्षा अधिक सामन्यांचा तपशील या यंत्रणांनी वेगवेगळय़ा अंगांनी तपासला. त्यातील निष्कर्ष जाहीर करताना पोलिसांनी जी माहिती दिली त्यावरून या सगळय़ाची पाळेमुळे किती खोलवर गेली आहेत, त्याचा अंदाज यावा. आशिया, युरोप, अमेरिका आणि आफ्रिका अशा सर्वच देशांतील सामन्यांत जुगाराच्या निमित्ताने सामनानिश्चिती झाल्याचा ठोस पुरावा या यंत्रणांच्या हाती लागला आहे. यापैकी एका सामन्यात तर एक लाख २१ हजार पौंड (एक पौंड म्हणजे साधारण ८६ रुपये) इतक्या महाप्रचंड रकमेची बोली लागली होती आणि या क्षेत्रातील जाणकारांच्या मते ही रक्कम अगदीच किरकोळ म्हणायला हवी. याचे कारण असे की आशिया खंडात या सामन्यांवरील जुगाराचे जगातील सर्वात मोठे केंद्र असून त्यातील उलाढाल अब्जावधी डॉलरची आहे. आपल्यापुरता यातील दुर्दैवी योगायोग हा की भारत फुटबॉलमध्ये दखलपात्र नाही. जवळपास दोनशेच्या आसपास देश फुटबॉल खेळतात आणि आपले स्थान पाहावयाचेच तर उलटीकडून पाहिल्यास ते लवकर सापडेल अशी परिस्थिती आहे. परंतु तरीही फुटबॉलमधील या भ्रष्टाचाराची सूत्रे मात्र भारतीयाकडे असल्याचा अंदाज सुरक्षा यंत्रणांनी व्यक्त केला आहे. खेळ नाही, पण खेळाबाबतच्या भ्रष्टाचारात तरी आहोत, याबद्दल भारतीयांना समाधान मानण्यास हरकत नाही. असो. यातील मुख्य आरोपी विल्सन राज पेरुमल यास २०११ सालीच फिनलंड येथे अटक करण्यात आली होती. हा सामना निकालनिश्चितीच्या टोळीसाठी काम करीत होता आणि ही टोळी चीन आणि अन्य देशांतील गुन्हेगारांकडून चालवली जात होती. हा विल्सन राज आहे तामीळ वंशाचा. पण सिंगापूरचा नागरिक. या प्रकरणाच्या चौकशीची व्याप्ती वाढल्यावर त्याने माफीचा साक्षीदार होण्याची तयारी दाखवली आणि त्यामुळे या सगळय़ाचा तपशील चव्हाटय़ावर आला. फुटबॉल हा जगातील आताचा सगळय़ात लोकप्रिय खेळ आहे. आपल्याला क्रिकेटचे प्रेम असले आणि क्रिकेटमध्येही हेच चालत असल्याचे वारंवार समोर येत असले तरी क्रिकेटला फुटबॉलची सर नाही. तेव्हा इतक्या लोकप्रिय खेळातही जुगार आणि निकालनिश्चिती होत असल्याचे उघडकीस आल्याने क्रीडाविश्वास मोठाच धक्का बसल्याची भावना व्यक्त झाली, यात नवल नाही.
यावर सर्वसाधारण प्रतिक्रिया अशी की वाढत्या बाजारपेठीय ताकदींमुळे अलीकडे हे प्रकार वारंवार होत असून मुक्त आर्थिक व्यवस्थाच त्यास जबाबदार आहे. आर्थिक भूक वाढल्यामुळे हे असे प्रकार घडतात असेही काहींचे म्हणणे असते. हल्ली खेळांत मोठमोठय़ा कंपन्यांचे हितसंबंध वाढले आहेत. या कंपन्या खेळ आणि खेळाडू दोघांनाही पुरस्कृत करीत असतात. त्यामुळे खेळात आर्थिक गैरव्यवहार वाढत चालले आहेत, असेही अनेकांना वाटते. परंतु हे सर्वच अज्ञानमूलक म्हणावयास हवे. याचे कारण अधिकाची हाव ही काही आजच निर्माण झालेली नाही. जे मिळणारच आहे त्यापेक्षा अधिक काही तरी मिळावे असे वाटणे हे नैसर्गिक आहे. परंतु त्या अधिकासाठी अनैसर्गिक मार्ग चोखाळायची वेळ येत असेल तर ते आक्षेपार्ह मानायला हवे. त्यामुळे सामन्यांची निकालनिश्चिती, जुगार हे मानवाच्या जन्मापासूनचेच असून त्यात धक्का बसावे असे नवीन काहीही नाही. सुमारे २८०० वर्षांपूर्वीदेखील खेळातील भ्रष्टाचाराची प्रकरणे उघडकीस आली होती आणि ग्रीस देशातील अथेन्स या ऑलिम्पिक स्पर्धाच्या मूळ गावीही निकालनिश्चितीचे प्रकार सर्रास घडत होते. त्या वेळी खेळात लबाडी करणारा कोणी आढळल्यास त्यास शिक्षा म्हणून देवीची मूर्ती बनवून द्यावी लागे. अथेन्स येथील ऑलिम्पिक स्पर्धास्थळी अशा देवीमूर्तीचा त्याही वेळी खच पडत असे. तेव्हा खेळांच्या पुरस्कर्त्यांत कंपन्यांचा समावेश नव्हता, त्यांचे आर्थिक हितसंबंध नव्हते. तरीही असे प्रकार तेव्हाही घडत होते. तेव्हा हे असे आताच होत आहे असे मानण्याचे आणि बाजारपेठीय ताकदींना बोल लावण्याचे काहीच कारण नाही. आता वेगळे होत आहे ते इतकेच की वाढत्या दळणवळण आणि संपर्क साधनांमुळे खेळावरील जुगाराचे जागतिकीकरण झाले असून जुगाराच्या भौगोलिक मर्यादा मागे पडल्या आहेत. इतके दिवस खेळावरील जुगारात रस फक्त स्थानिक पातळीवरच असे. परंतु आता एका देशातील सामन्यांवर दुसऱ्या खंडातूनही जुगार लावण्याची सोय निर्माण झाल्याने भ्रष्टाचाराचा आकार आणि आवाका वाढला आहे इतकेच. या पाश्र्वभूमीवर या जुगारास आळा घालण्याचे प्रयत्न होणारच असतील तर ते अमलात आणताना हे वास्तवाचे भान असणे आवश्यक आहे. हे गैरप्रकार रोखण्यासाठी जे काही करायचे ते भौतिक दृष्टिकोनातून विचार करूनच व्हायला हवे. उगाच नैतिकतेच्या नावाने बोटे मोडीत आता सगळेच कसे हाताबाहेर चालले आहे.. अशा उसासेदार प्रतिक्रिया व्यक्त करून काहीही होणार नाही.
आपल्याकडे नेमकी जाणीव नसलीच तर ती ही आहे. पैसा मिळत असेल तर तो जरा अधिक मिळावा असे कोणालाही वाटत असेल तर त्यात गैर ते काहीही नाही. परंतु ही आपली पैशाची उत्पन्नाची तहान आणि भूक भागवण्यासाठी खेळ या संकल्पनेला मूठमाती देण्यासाठी एखादी व्यवस्था जन्माला येत असेल तर ती आताच नष्ट करायला हवी. खेळाचे आयोजन करणारे आणि त्यासाठी खर्च करणारे या दोघांतील वाढत्या अभद्र  संबंधांमुळे आर्थिक गैरव्यवहार वाढत असतील तर या संबंधाचा पुनर्विचार व्हायला हवा. फुटबॉल आयोजकांनी संशय आल्यापासून असे काही होत असल्याचे नाकारले नाही. छे.. आमचे कसे सर्वच छान असा खास क्रिकेटी दांभिकपणा दाखवत जे आहे ते नाकारण्याचा प्रयत्नही या मंडळींनी केला नाही. खेरीज, संशय आल्यावर सुरक्षा यंत्रणांच्या साहय़ाने चौकशीत या खेळ संघटनांनी जातीने रस घेतला आणि वास्तवाची प्रामाणिकपणे कबुली दिली. यातील महत्त्वाचा भाग असा की त्यात महत्त्वाची भूमिका बजावली फिफा या जागतिक फुटबॉल संघटनेने. फिफाने या सगळय़ाचा छडा लावण्यासाठी ऑस्ट्रेलियाचे ज्येष्ठ पोलीस अधिकारी ख्रिस एटन यांची नेमणूक केली आणि त्यांनीही नेटाने सर्व बाजू उजेडात आणल्या.
क्रिकेटच्या बाबतीत अभाव होता तो या दृष्टिकोनाचा. आमचे काही चुकलेले नाहीच अशीच क्रिकेट संघटनेची भूमिका होती. त्यामुळे क्रिकेटच्या बाबतीत वारंवार आरोप होऊनही हाती काहीच लागले नाही. तेव्हा जे काही फुटबॉलच्या बाबत झाले ते पाहिल्यावर क्रिकेटसाठी असा ख्रिस एटन कसा उभा राहणार असा प्रश्न निर्माण होणे आवश्यक आहे. या एटन पॅटर्नची गरज सध्या क्रिकेटलाही आहे.

Story img Loader