फोटोत एखादी व्यक्ती असली की आपण म्हणतो- हा याचा किंवा हिचा फोटो. फोटोतल्या व्यक्तीचा चेहरा ओळखू आला की आपल्याला समजतं फोटो कुणाचा आहे ते. शादी घदिरियानच्या फोटोंमध्येही व्यक्ती असतात, पण चेहरा समाजाचा असतो. हा समाजाचा चेहरा व्यक्तिचित्रवजा फोटोंमधून आणखीही काही जणींनी दाखवला, परंतु शादीच्या फोटोंमागे खरेपणा अधिक होता..
शादी घदिरियान हे तिचं नाव. ती इराणची आहे, पण भारतात मुंबई-दिल्लीत प्रदर्शनानिमित्तानं येऊन राहून गेलीय. मुंबईच्या गिल्ड आर्ट गॅलरीत २०१० साली तिच्या कलाकृतींचं प्रदर्शन भरलं तेव्हा भारतातल्या महिला काय प्रतिसाद देतात, हे तिला पाहायचं होतं. मुलाखती देताना तिनं हा पत्रकार चॅनेलचा, हा मराठी, हा इंग्रजी असा भेदभाव केला नव्हता.. बहुधा भारतातून प्रसिद्धी वगैरेपेक्षा वेगळं काही तरी तिला हवं होतं.. हे वेगळं काही तरी काय असावं, याचा अंदाज त्या वेळी दीडेक तास तिच्याशी गप्पा मारून तिचं हृद्गत जाणून घेतल्यावर आला होता. भारतीय समाजदेखील पाश्चात्त्यीकरण, सुधारणावाद आणि टोकाच्या धार्मिक कल्पनांमुळे किंवा मूलतत्त्ववादामुळे वाढणारा दहशतवाद या तिन्ही संकल्पनांशी कधी ना कधी भिडलेला आहे. नेमकं हेच शादीच्या मायदेशात झालं होतं. भारतीय आणि इराणी समाज आपल्या चित्रांकडे कसा पाहतोय, यात तिला अधिक रस असणं स्वाभाविक होतं.
हे सगळं दोन वर्षांपूर्वीचं.
पण त्याच्याही खूप आधी, तीन दशकांपूर्वी इराणमध्ये सुधारणावादी राजवट होती आणि महिलांचं जगणं त्या वेळी अधिक सुसह्य़ होतं, हे जगाला माहीत आहे. त्या वेळची ती राजवट टिकली असती तर कदाचित आजचं जग निराळं झालं असतं- आजचा पश्चिम आशिया, आजची मध्यपूर्व यांतल्या महिलांची (आणि त्यामुळे समाजाचीही) स्थिती सुधारली असती. तसं झालं नाही. धार्मिक मूलतत्त्ववाद या ना त्या प्रकारे पसरत गेला. दहशतवाद रोजच्या जगण्याचा भाग झाला. महिलांचं वस्तूकरण फक्त चंगळवादानं होत नसून सामाजिक शुद्धता जपण्याच्या अट्टहासातूनही महिलांवर अन्यायच होत असतो, हे शादी घदिरियानला आणि इतरांनाही मनोमन कळत गेलं.
हा सगळा काळ शादीच्या कलाकृतींमध्ये अवतरलेला आहे. ट्रान्झिस्टर, सायकल, व्हॅक्यूम क्लीनर आदी आधुनिक साधनांसोबत काही महिलांची ‘स्टुडिओ पोट्र्रेट’सारखी छायाचित्रं शादीनं केली आहेत. नव्वदच्या दशकातली ही कलाकृती, १९६०च्या दशकाचा काळ जिवंत करू पाहते. इथंही महिलांविषयीच्या सामाजिक कल्पना कायम आहेत, पण बदल घडतो आहे, इतकं तरी या कृष्णधवल (जुन्या फोटोंसारखा पिवळट, मातकट ‘सेपिया टोन’ असलेल्या) छायाचित्रांतून सहज वाचता येतं. नंतरच्या ‘एव्हरीडे’ या रंगीत फोटो मालिकेतल्या छायाचित्रांमध्ये मात्र महिला बुरख्यातच दिसतात आणि त्यांच्या चेहऱ्याच्या जागी एकेक ‘उपयोगाची वस्तू’ दिसते.
उपयोगाची वस्तू म्हणजे स्त्री.. ती कदाचित मीही असू शकेन, असं शादीचं म्हणणं. समाजरूपं दाखवण्यासाठी स्वत:ला निरनिराळय़ा वेषभूषांमध्ये छायाचित्रित करून घेणाऱ्या सिंडी शर्मन, एन. पुष्पमाला किंवा मानसी भट्ट यादेखील आहेत.. पण माझा चेहरा म्हणजे समाजाचाच एक चेहरा असं त्यांचं म्हणणं ‘दिसतं’. त्यापेक्षा शादी घदिरियानची कल्पना नक्कीच निराळी आहे. निखिल चोप्रा हा कलाकारांच्या वा मनमुक्त जगणाऱ्यांच्या भूमिका सलग काही तास साकार करतो आणि पुढे त्याचे फोटो विकले जातात, तिथंही निखिलचा चेहरा निखिलचा नसतो, तो सामाजिक इतिहासाचा चेहरा असतो. शादी घदिरियानसुद्धा सामाजिक इतिहासाची साक्षीदार बनते, टिपलेल्या छायाचित्रांमधून काळ जिवंत करते, पण निखिलपेक्षा तिच्या कामामागल्या संकल्पना नक्कीच निराळय़ा आहेत.
शादी घदिरियानचं काम पाहाताना लक्षात येतं की, तिचे फोटो तिरकसपणानं सामाजिक भाष्य करणारे आहेत. हे तिरकस भाष्य तर पुष्पमालाही करते आणि मानसी भट्टदेखील एकापरीनं करतेच. तरीही शादी घदिरियान निराळीच. हे निराळेपण तिच्या समाजानं तिला दिलंय. इराणी समाज. इराणी महिलांचा समाज. इराणी सुशिक्षित महिलांचा समाज. सुशिक्षित इराणी महिलांपैकी ज्यांना जग फिरल्यामुळे आंतरराष्ट्रीय मानवी मूल्यांचं भान आलंय, अशा काही जणींचा समाज. त्या काही जणींपैकी चित्रकार किंवा दृश्यकलावंत असलेल्या इराणी महिलांचा समाज. जगप्रसिद्ध इराणी दृश्यकलावंत अशी ख्याती मिळूनही इराणमध्ये राहणाऱ्या महिला कलावंतांचा.. समाज नाही- इथं मात्र शादी घदिरियान एकटीच.
हे तिचं एकटेपण, पुष्पमालाच्या किंवा मानसीच्या एकटेपणापेक्षा अधिक खरं, अधिक तीव्र, अधिक दुखरं आहे.
शादी घदिरियाननं फोटोग्राफीचं माध्यम वापरून घडवलेली समाजरूपं सिंडी शर्मन किंवा पुष्पमालाइतकी वैविध्यपूर्ण आणि कल्पक नसतील, प्लास्टिक वापरून अशा फोटोंमध्ये कृत्रिम आणि नैसर्गिकाचा झगडा घडवून आणणाऱ्या मानसी भट्टच्या कामापेक्षा शादी घदिरियानचं काम तांत्रिकदृष्टय़ा फार सरस नसेल.. निखिल चोप्राचा ‘परफॉर्मन्स’ हे सादरीकरण नसून स्वत:वरला प्रयोग असतो आणि त्यातून खरेपणा आणि नाटय़ यांचा गोफ विणला जात असतो, त्यातला नाटय़मय भाग शादी घदिरियानच्या कलेत उणाच असेल.. पण तिच्या कामामागचा खरेपणा मात्र या सर्वापेक्षा अधिक आहे. निखिल एखादी भूमिका काही तास जगतो, त्या काही तासांत त्याची भूमिका बदलल्यावर नाटय़निर्मिती होते.. तसं काहीच शादीकडे नाही. ती आपली एकच भूमिका जगते आहे. तिच्यावर लादली गेलेली भूमिका. स्वतंत्र विचारांच्या आणि सामाजिक भान असलेल्या इराणी चित्रकर्तीची भूमिका.
या भूमिकेला पुढे नेणारं काम शादी घदिरियान गेल्या तीन-चार वर्षांत करू लागली आहे. समाजातली हिंसा दाखवणारं हे काम, एखादा रक्ताळलेला सुरा किंवा हातबॉम्ब अशी ठरीव  ढोबळ प्रतीकं वापरतं. या ‘निल, निल’ मालिकेतल्या फोटोंचा विषय किंवा कॉम्पोझिशन डोळय़ांत भरणारं होतं, असंही म्हणता येणार नाही. परिचित वस्तुचित्रांसारखेच फोटो वाटतात हे.
त्यात भाष्य आहे की नाही, हे तुम्हीच ठरवा. ठरवालच.
आपला मुद्दा इथं ‘भाष्य आहे !’ असा विजयी सूर लावून संपणार नाहीये.
समाजरूपं दाखवण्यासाठी हल्लीचे चित्रकार फोटोग्राफीचा कसकसा वापर करताहेत, हे आपण पाहतो आहोत.
हल्लीच्या लोकांना फोटोच बघण्याची अधिक सवय असते, त्यामुळे फोटोच परिचित असतात.. स्टुडिओतले म्हणा- न्यूज मॅगेझीनमधले किंवा वर्तमानपत्रांतले म्हणा, जाहिरातींमधले आणि पोष्टरांवरले म्हणा.. किंवा आता इंटरनेटमुळे तर कुणाकुणाचे जुने जुने फोटोही परिचित आहेत. फोटोग्राफी या माध्यमाचं आत्मीकरण समाजानं मोबाइल कॅमेऱ्यांमधून केलंय.
शादी घदिरियान किंवा तिच्यापेक्षा वेगळं काम करणाऱ्या- पण फोटो हे माध्यम वापरणाऱ्या सर्वानी मोबाइल फोटोग्राफीच्या आधीच्या काळातलं फोटोंचं आत्मीकरण आपल्या कलेत वापरलं. फोटो अमक्याचा असतो, त्यात अमका दिसत असतो, पण या सर्वाच्या फोटोंनी समाजाचा चेहरा फोटोंमधून दाखवला.
तुम्ही म्हणाल, वृत्तछायाचित्रकार तरी निराळं काय करतात? समाजाचे चेहरेच तर टिपतात की तेसुद्धा.
खरं आहे, पण समाजाचा आत्ता दिसणारा किंवा गुजरात दंगलीसारख्या एखादय़ा घटनेमुळे दिसलेला चेहरा टिपणं वेगळं आणि समाजाचा चेहरा गेल्या काही वर्षांच्या काळानं कसा घडवला आहे याचा विचार करू, त्याप्रमाणे तो चेहरा पुन्हा फोटोअंकित करणं निराळं.
हे जे दुसऱ्या प्रकारचं काम आहे, ते जास्त ‘चित्रकलेसारखं’ आहे.. म्हणून तर त्याला इथं कलाभान  लेखमालिकेत स्थान मिळालं होतं, गेला महिनाभर!