मथुरेहून परतून एक महिना उलटला होता. ज्ञानेंद्रच्या किंवा कर्मेद्रच्या घरी एकदा भेटायचंच, असं ठरवूनही चारही शनिवार-रविवार ते साधलं नव्हतं. आता हृदयेंद्रनं पुन्हा एकवार तिघांना यात्रेसाठी तयार केलं होतं. प्रवास आटोक्यातला होता. स्थान होतं गोंदवले! शुक्रवारी पहाटे निघून शुक्रवार दुपारपासून रविवार दुपापर्यंत गोंदवल्यात रहायचं, नंतर रविवारी पुण्यात कर्मेद्रच्या शेतघरी मुक्काम करायचा आणि मग सोमवारी पहाटे निघून दुपापर्यंत घरी पोहोचायचं, असा बेत होता. कर्मेद्रच्या अलिशान गाडीनं वेग घेतला आणि महिनाभरात कुणी काय केलं, याच्या गप्पाही रंगल्या. टोल भरल्याशिवाय जशी गाडी पुढे जात नाही, तशी मिसळ खाल्ल्याशिवाय पळस्प्याहून पुढे जाता येत नाही, अशी घोषणा कर्मेद्रनं आधीच केली होती. त्याप्रमाणे पहिला मुक्काम मिसळीचा होता! मिसळीवर ताव मारता मारता कर्मेद्रनं विचारलं..
कर्मेद्र – हृदू ‘गोंदवले’ शब्दाचा अर्थ काय रे?
हृदयेंद्र – (जणू जुनं काही आठवून चेहरा उजळल्यागत) भाऊ म्हणायचे, जिथं रामाचं नाम आणि प्रेम मनावर गोंदवलं जातं ते ‘गोंदवले’! देहबुद्धीचा म्हणजे अकलेचा किल्ला जिथे भुईसपाट केला जातो ते ‘अक्कलकोट’! देहबुद्धी अर्थात अहंकारानं भरलेलं डोकं जिथं नेस्तनाबूत होतं ती ‘शिरडी’!!
ज्ञानेंद्र – (कौतुकमिश्रित स्मितहास्य करीत) हृदू तू जे हे अर्थ सांगतोस ना, ते इतके चमकदार असतात की त्याक्षणी तेच पूर्ण खरे वाटतात. मथुरेतही तोच अनुभव आला. वृंदावनला आपण गेलो तर गोपी आणि श्रीकृष्णांची रासलीला म्हणजे आत्मा-परमात्म्याची एकरसाची लीला आहे, असं तू अगदी भावुकपणे म्हणालास. गोवर्धन पर्वताशी गेलो तेव्हा कर्मू म्हणाला, हा एवढा मोठा डोंगर एका हातात धरलेली बासरी वाजवत दुसऱ्या हाताच्या करंगळीवर तोलणं अशक्यच आहे, तेव्हा तू म्हणालास..
हृदयेंद्र – शिष्याच्या प्रारब्धाचा आणि प्रपंचाचा गोवर्धनही सद्गुरू असाच लीलया पेलतात. आपण त्यांच्या मुरलीचे सूर म्हणजे त्यांचा बोध एकाग्रतेनं ग्रहण करू लागलो तर बाहेरच्या प्रारब्धाच्या झंझावाताचंही भय कमी होईल..
योगेंद्र – गोवर्धन म्हणजे प्रपंचाचा डोंगर ही तुझी कल्पनाही मला आवडली. ‘गो’ अर्थात गायी म्हणजे इच्छा. इच्छांचं वर्धन हाच तर प्रपंच पसारा आहे. तुला हे सगळं सुचतं त्याचं फार कौतुक वाटतं बघ..
हृदयेंद्र – पण यात माझं काहीच नाही. एकतर बऱ्याच गोष्टी भाऊंच्या तोंडून ऐकलेल्या बऱ्याच अचलानंद दादांच्या तोंडच्या तर अनेकानेक सद्गुरूंनीच सांगितलेल्या..
ज्ञानेंद्र – पण त्या वेळेवर आठवायलाही लागतात ना?
कर्मेद्र – तपस्वी सद्गृहस्थहो का माझ्या मिसळीची चव घालवता? ज्ञान्या लेका तू तरी वर्तमानात जगायला शिक! आहे तो पूर्ण क्षण मिसळ अनुभव ना! पहा ही र्ती काय भन्नाट आहे, पाव कसे लुसलुशीत आहेत..
ज्ञानेंद्र – कर्मेद्रमहाराज, तुमचे हे दिव्य ज्ञानकण आम्हाला भानावर आणत आहेत बरं.. (सगळेच हसतात.)
दुपापर्यंत गोंदवले जवळ येऊ लागलं तसतसा समाधी मंदिराचा कळस दुरून पाहूनच हृदयेंद्रचे डोळे पाणावले. कित्येक महिन्यांनी या पवित्र भूमीचा स्पर्श होणार होता. मंदिरात सर्वानीच समाधीचं दर्शन घेतलं. मग तृप्त करणारा भोजन प्रसाद. पोटभर प्रसाद ही गोष्ट कर्मेद्रला फार भावली.
हृदयेंद्र – मी सुरुवातीला इथे यायचो ना, तेव्हा वाटायचं रहायला मोफत, खाणं-पिणं मोफत. महाराज एवढी सोय का करताहेत? मग लक्षात आलं. तीर्थस्थळी राहाणं आणि खाणं याच दोन मुख्य अडचणी असतात. त्या मी सोडवतो, ‘नाम घेता येत नाही’, ही अडचण तेवढी तुम्ही सोडवा, असंच महाराजांना सांगायचं असावं! इथलं हे दोन दिवसांचं वास्तव्यही आपण म्हणूनच साधनेत आणि चिंतन चर्चेत घालवू..
भोजनप्रसादानंतर चौघांनी थोडा आराम केला. संध्याकाळी दर्शनानंतर मंदिराबाहेर बसले. योगेंद्रनं पुन्हा विषय काढला, ‘‘आता चिंतन कोणत्या अभंगाचं करायचं?’’ कोणालाच पटकन काही सुचलं नाही. मंदिरात तोवर कीर्तन सुरू झालं होतं. बुवा गात होते..
रूप पाहतां लोचनीं। सुख झाले वो साजणी।।
तो हा विठ्ठल बरवा। तो हा माधव बरवा।।
बहुत सकृताची जोडी। म्हणुनी विठ्ठलीं आवडी।।
सर्व सुखाचे आगर। बाप रखुमादेवीवर।।
चैतन्य प्रेम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा