लीळाचरित्राचे ‘पवाडे’ गाण्याची कल्पना मांडून न थांबता तुकोबांनी एका अभंगातून ती तडीसही नेली. पोवाडा या नावाने पुढे विविध स्वरूपांत टिकलेला ‘पवाडा’ मराठेशाहीत अफझलखानवधासह अवतरला आणि खडर्य़ाच्या लढाईपर्यंत टिकला.. महाराष्ट्राच्या धार्मिक, सांस्कृतिक आणि राजकीय उपसंस्कृती नैसर्गिकरीत्याच (अभिनिवेशाविना) एकसूत्र असण्याचा हा काळ होता..
एखाद्या समाजाच्या व्यापक सर्वसाधारण संस्कृतीची कल्पना केली, तर समाजजीवनाच्या अंगोपांगांना अनुसरून लहान-मोठय़ा, कमी-अधिक प्रभावशाली स्वरूपाच्या उपसंस्कृतींचीही कल्पना करता येईल. मराठी संस्कृती नावाची वस्तू असेल, तर उदाहरणार्थ मराठी वाङ्मयीन संस्कृती, मराठी राजकीय संस्कृती या तिच्या उपसंस्कृती ठरतील. अशा उपसंस्कृतींचा परस्परसंबंध असतोच, त्यांचा एकमेकांवर प्रभावही पडतो. शिवाय, त्या सर्वाचा मराठी संस्कृती नावाच्या वस्तूशी संबंध असतो. ही वस्तू तिच्या उपसंस्कृतींची गोळाबेरीज असते, असे समजणे चुकीचे ठरेल. संस्कृती म्हणजे उपसांस्कृतिक घटकांची जोडणी (अ२२ीेु’्रल्लॠ) करून सिद्ध झालेले यंत्र नव्हे. एका संस्कृतीच्या छत्राखाली नांदणाऱ्या उपसंस्कृतींमध्ये आणि ती संस्कृती व तिच्या उपसंस्कृती यांच्यामध्ये एक प्रकारचा जैविक संबंध असतो असे म्हणता येते.
याचा अर्थ असाही होतो, की उदाहरणार्थ मराठी साहित्याचा इतिहास समजून घेताना किंवा त्याची समीक्षा करताना ती एक वाङ्मयीन संस्कृती असून, मराठी संस्कृतीची एक उपसंस्कृती आहे हे विसरता कामा नये. या उपसंस्कृतीचे व्यापक मराठी संस्कृतीशी आणि तिच्या इतर उपसंस्कृतींशी अतूट नाते असून, त्यामुळे त्या सर्वाचा एकमेकांवर प्रभाव पडणे अगदीच स्वाभाविक आहे.
मराठी साहित्याचा विचार करायचे झाल्यास असे म्हणता येते, की मराठी साहित्याच्या आदिपर्वात म्हणजे लीळाचरित्र- ज्ञानेश्वरीच्या काळात महाराष्ट्रातील लोकांचा धर्म आणि धर्मसंप्रदाय येथील लोकांनीच निर्माण केले होते.
या संदर्भात महानुभाव संप्रदायाचे अवतारी पुरुष श्री चक्रधरांच्या ‘लीळाचरित्र’चा विचार सर्वात आधी करावा लागतो. चक्रधरस्वामींनी उत्तरापंथे गमन केल्यानंतर त्यांच्या परिवारातील एक पंडित म्हाइंभट यांनी चक्रधरांनीच अधिकरण म्हणून ज्यांना मान्यता दिली होती, त्या नागदेवाचार्याच्या अनुमतीने आणि मार्गदर्शनाखाली स्वामींच्या लीला संकलित केल्या आणि त्यांचे अशा प्रकारे कालसंगत संपादन केले, की ज्यातून स्वामींचे स्वतंत्र चरित्रच सिद्ध व्हावे. या चरित्राला ‘लीळाचरित्र’ असे नाव आहे. कारण स्वामींच्या केलेल्या कृती स्वामींच्या लीळा असल्याची पंथीयांची श्रद्धा होती. स्वामी साक्षात ईश्वराचेच अवतार असल्याने त्यांची कृत्ये सर्वसामान्य माणसांच्या कृतीपेक्षा वेगळ्या प्रकारची मानावी लागतात. सामान्य माणसांच्या कृतींना लीला म्हटले जात नाही.
अवतारी पुरुषांच्या चरित्राला लीळाचरित्र म्हणावे, ही जाणीव महानुभाव पंथाच्या बाहेरील लेखक-कवींनाही असावी, असे तुकोबांच्या एका अभंगावरून म्हणता येते. ‘गाईन ते लीळाचरित्र पवाडे’ असे ते कृष्णचरित्राच्या संदर्भात म्हणतात. त्यांच्या मते कृष्णचरित्र हे एक लीळाचरित्रच होय. या लीळाचरित्रात कृष्णाच्या पराक्रमाचे म्हणजेच पवाडय़ांचे कथन केले जाते. अवतारी पुरुषांची महत्कृत्येही त्यांच्या लीलाच असतात. तुकोबांनी या अभंगात कृष्णाची अशी काही लीलाकृत्येही उल्लेखिली आहेत. १) राखिले सवंगडेसहित गाई २) चोरिले नवनीत ३) बांधियला गळा (यमलार्जुन वृक्षांची गोष्ट) ४) मोहिल्या गोपिका पावाच्या छंदे ५) मायबापा लाड दाखविले कौतुक ६) निर्दाळिल दुष्ट ७) भक्तां प्रतिपाळी.
महानुभाव संप्रदायामध्ये परमेश्वराची चरित्रे आठवणे हे लीळास्मरण होय. त्याबरोबर नामस्मरण आणि मूर्तिस्मरणसुद्धा महत्त्वाची उपासना होय, पण त्या तपशिलात जायचे कारण नाही.
ईश्वरी कृत्यांना लीळा समजण्याबाबत कोणाचे दुमत व्हायचा संभव नाही. मात्र इतर पंथीयांनी लीळाकल्पनेचा विस्तार करून संतांच्या व भक्तांच्या कृत्यांनाही लीला म्हणायची प्रथा पाडली. संतचरित्रकार महीपती ताराबादकर यांचे ‘भक्तलीलामृत’, ‘संतलीलामृत’ हे चरित्रग्रंथ या संदर्भात उल्लेखनीय आहेत.
ईश्वर, ईश्वरी अवतार आणि संत यांच्या संदर्भात ‘लीळाचरित्र’ हा वाङ्मय प्रकार ठरू शकतो, हे आता लक्षात यायला हरकत नसावी. ख्रिस्ती परंपरेत संतचरित्रलेखनाला हॅजिओग्राफी असे म्हणतात. म्हणजे हा एक स्वतंत्र वाङ्मय प्रकारच झाला.
ईश्वरी अवतार नसलेल्या, परंतु पराक्रमी, अचाट कृत्ये करणाऱ्या व्यक्तींच्या अशा कृत्यांचे वर्णन करायचे झाले तर ‘लीला’ शब्द वापरता येणार नाही हे उघड आहे. परंतु तरीही अशा व्यक्ती सर्वसामान्यांपेक्षा वेगळ्या असतात, याची जाणीव ठेवून समाज त्यांचा आदर करतो. अशा व्यक्तींच्या असाधारण कृत्याला ‘पवाडा’ शब्द वापरण्याचे सामथ्र्य मराठी लेखकांनी घेतले व जेव्हा महाराष्ट्रात अशी कृत्ये करणाऱ्या पराक्रमी पुरुषांचा उत्कर्ष होऊन त्यांनी परकीय सत्ताधाऱ्यांच्या विरोधात पराक्रम गाजवायला सुरुवात केली तेव्हा त्यांच्या या पराक्रमी कृत्यांचे वर्णन करावे असे मराठी कवींना स्वाभाविकपणे वाटले आणि मराठीत ‘पवाडा’ नावाच्या स्वतंत्र वाङ्मय प्रकाराचाही उत्कर्ष झाला. यादवांची राजवट नष्ट झाल्यापासून शिवाजी महाराजांचा उदय होईपर्यंत मराठय़ांच्या पराक्रमाला ग्रहण लागले होते. पराक्रमी महत्कृत्येच कोणाकडून केली जात नसल्यामुळे त्यांचे वर्णन करणाऱ्या पवाडय़ाच्या निर्मितीचा प्रश्नच उद्भवत नव्हता.
मराठी समाजाची ही कुंठित अवस्था शिवरायांच्या पराक्रमाने संपुष्टात आणली व त्यामुळे देवीचे गोंधळ घालणारे गोंधळी मराठय़ांच्या पराक्रमी महत्कृत्यांचे पवाडे गाऊ लागले.
आगिनदासाने रचलेला अफजलखानवधाचा पवाडा हा पहिला मराठी पवाडा होय. अफजलखानाच्या संकटाशी शिवरायांनी ज्या प्रकारे मुकाबला करून त्यावर मात केली, त्यावरून या अलौकिक कृत्याचे काव्यात्म वर्णन करावे असे त्या जातिवंत कवीला वाटले नसते तरच नवल. ती मराठी कवीची एक सहजस्फूर्त अशी अभिव्यक्ती होती.
अफजलखानवधाच्या अगोदर शिवरायांनी पराक्रमी कृत्ये केली नव्हती, अशातला भाग नाही. तथापि, अफजलखान प्रकरणाला निर्णायक महत्त्व होते. यात शिवरायांना अपयश आले असते तर त्यांची यापूर्वीची अचाट कृत्ये निर्थक ठरणार होती. इतकेच नव्हे, तर त्यानंतर कोणी त्या वाटेने जाण्याची शक्यताही संपुष्टात येणार होती. शिवरायांना त्यात यश आले आणि यशचंद्राच्या उदयाबरोबर कवीच्या स्फूर्तिसागरासही उधाण आले. विशेष म्हणजे हा पवाडा आगिनदासाने खुद्द जिजामाता आणि शिवबा यांना ऐकवला. त्यावर प्रसन्न होऊन
‘शिवाजी सरज्याने। इनाम घोडा बक्षिस दिला।।
शेरभर सोन्याचा। तोडा हातात घातला।।’
मराठय़ांच्या या ‘पवाडा’ नावाच्या काव्यबंधाची परंपरा अफजलखानाच्या वधापासून सुरू होते आणि खर्डा येथील निजामाबरोबरच्या यशस्वी युद्धापर्यंत मराठेशाहीत टिकून राहते. थोडक्यात, अभंग, ओवी या काव्यछंदांचा आणि लीळाचरित्र या वाङ्मय प्रकाराचा जसा मराठय़ांच्या धार्मिक संस्कृतीशी स्वाभाविक संबंध होता, तसा पवाडय़ाचा मराठय़ांच्या राजकीय संस्कृतीशी स्वाभाविक संबंध होता.
एकोणिसाव्या शतकाच्या शेवटी शेवटी ऑकवर्थ आणि शंकर तुकाराम शाळिग्राम यांनी मराठय़ांच्या पवाडय़ांचे संकलन-संपादन केले, तेव्हा बरेचसे पवाडे विस्मृतीच्या गर्तेत इतिहासजमा झाले होते. कारण १८१८ मध्ये मराठी राज्याच्या नाशाबरोबरच मराठी राजकीय संस्कृतीचाही अस्त झाला होता. बडोदा आणि इतर काही किरकोळ मराठी संस्थानिकांनी पवाडे गाणाऱ्या गोंधळ्यांना जो थोडाफार आश्रय दिला, त्यामुळे थोडेफार पवाडे हाताला लागले तेवढेच!
मराठय़ांच्या स्वराज्यामुळे पवाडय़ांच्या रचनेला प्रेरणा आणि प्रोत्साहन मिळाले, त्याप्रमाणे या स्वराज्यात पवाडे ऐकणाऱ्यांना परकीय सत्तेशी लढण्यास प्रेरणा मिळे. असा हा दुहेरी संबंध आहे.
‘शिवाजी आणि शिवकाळ’ या ग्रंथातून शिवचरित्र लिहिणारे बंगाली इतिहासकार सर जदुनाथ सरकार यांनी म्हटल्याप्रमाणे ‘तलवारीच्या जोरावर सत्ता प्रस्थापित करणारा किंवा लढाईत छातीवर शत्रूंचे वार झेलणारा बहाद्दर मराठा हा पोवाडय़ाला जितका उत्तेजक विषय आहे, तितका दुसरा कोणताही नाही.’
जदुबाबूंनी या संदर्भात ‘इतिहास विहार’ या मराठी कृतीतील उचित मजकूरही उद्धृत केला आहे.
‘रंगपंचमीच्या दिवशी सायंकाळी पिंपळाच्या पारावर फाटकीतुटकी बैठक घातली आहे, बुदलीने ओतल्या जाणाऱ्या तेलाने पेटणारे हिलाल पाजळत आहेत; पायात जोडा, डोक्यावर कंगणीदार पगडी व त्यात तुरा खोवलेला, अशी अर्धगोंधळी, अर्धतमासगीर मंडळी तुणतुणी खेचून तिसऱ्या सप्तकात सूर नेऊन गात वा साथ करीत आहेत. कडकडीत डफावर डाव्या हाताची थाप मारून त्यांचा पुढारी एकाहून एक सरस पवाडे आठआठवून म्हणत आहे आणि सर्व श्रोते मंडळी तल्लीन होऊन तटस्थ झाली आहेत.’ अशा अस्सल देशी थाटात पवाडे ऐकण्याची गोष्ट काही वेगळीच आहे. तिचे स्वारस्य ज्याने अनुभवले नसेल त्याला ते काय कळणार?
*लेखक पुणे विद्यापीठात तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक असून संतसाहित्याचे व्यासंगी व विचारवंत आहेत.
*उद्याच्या अंकात मुकुंद संगोराम यांचे ‘स्वरायन’ हे सदर

Story img Loader